कापूस खरेदी केंद्रांचा तिढा कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:11 IST2021-01-03T04:11:25+5:302021-01-03T04:11:25+5:30
राहुल पेटकर लाेकमत न्यूज नेटवर्क रामटेक : राज्य शासनाने कापूस खरेदीसाठी कापूस पणन महासंघाच्या माध्यमातून रामटेक तालुक्यात ऑनलाईन नाेंदणीला ...

कापूस खरेदी केंद्रांचा तिढा कायम
राहुल पेटकर
लाेकमत न्यूज नेटवर्क
रामटेक : राज्य शासनाने कापूस खरेदीसाठी कापूस पणन महासंघाच्या माध्यमातून रामटेक तालुक्यात ऑनलाईन नाेंदणीला सुरुवात केली. यात तालुक्यातील ७० शेतकऱ्यांनी कापूस विक्रीसाठी नाेंदणी केली. परंतु, तालुक्यात एकाही ठिकाणी सीसीआय (काॅटन कार्पाेरेशन ऑफ इंडिया) किंवा पणन महासंघाने खरेदी केंद्र सुरू केले नाही. दुसरीकडे, तालुक्यातील शेतकऱ्यांना सावनेर येथील खरेदी केंद्रांवर विकायला नेणे परवडण्याजाेगे नाही. त्यामुळे तालुक्यात पणन महासंघाने कापूस खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी कापूस उत्पादकांनी केली आहे.
रामटेक शहरापासून सावनेर येथील कापूस खरेदी केंद्र ५० किमी आहे. यात वाहतूक खर्च वाढत असल्यााने कापूस पणन महासंघाने मनसर (ता. रामटेक) येथे खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. विशेष म्हणजे, मनसर येथील जिनिंगमध्ये मागील वर्षी पणन महासंघाने कापूस खरेदी केंद्र सुरू केले हाेते. तालुक्यात शासनाने खरेदी केंद्र सुरू न केल्याने सध्या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या घरी २०० क्विंटलपेक्षा अधिक कापूस साठला आहे. शासकीय कापूस खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांना प्रति क्विंटल ५,७७५ रुपये भाव मिळू शकताे. त्यामुळे रामटेक तालुक्यात कापूस खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी केली जात आहे.
....
शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान
शासनाने आखून धाग्याच्या कापसाची किमान आधारभूत किंमत प्रति क्विंटल ५,५१५ रुपये तर लांब धाग्याच्या कापसाची किमान आधारभूत किंमत प्रति क्विंटल ५,८२५ रुपये जाहीर केली आहे. तालुक्यात शासनाने खरेदी केंद्र सुरू न केल्याने शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींमुळे व्यापाऱ्यांना कापूस विकावा लागत आहे. व्यापारी प्रति क्विंटल ५,००० रुपये ५,३०० रुपये दराने खरेदी करीत असल्याने शेतकऱ्यांना प्रति क्विंटल ५१५ ते ८२५ रुपयांचे नुकसान साेसावे लागते.
....
मनसर येथे कापूस खरेदी केंद्र सुरू करावे, यासाठी कापूस पणन महासंघाकडे प्रस्ताव पाठविला आहे. त्याचा पाठपुरावाही सुरू आहे. तालुक्यात खरेदी केंद्र सुरू झाल्यानंतर कापूस विक्रीसाठी नाेंदणीचे प्रमाण वाढणार आहे. शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांना कमी किमतीत कापूस विकण्यापेक्षा थाेडी प्रतीक्षा करावी.
- हनुमंता महाजन,
सचिव, कृउबास, रामटेक