पुस्तक वाहतुकीचा खर्च मुख्याध्यापकांच्या माथी
By Admin | Updated: May 31, 2014 00:56 IST2014-05-31T00:56:38+5:302014-05-31T00:56:38+5:30
पंचायत समिती स्तरावरून शाळेपर्यंत पुस्तके पोहोचविण्याचा मागील वर्षीचा खर्च प्राप्त न झाल्याने जिल्ह्यातील बहुतांश गटशिक्षणाधिकार्यांनी यावर्षी शाळेपर्यंत पुस्तके पोहोचवून देण्यास नकार दिला आहे.

पुस्तक वाहतुकीचा खर्च मुख्याध्यापकांच्या माथी
अग्रीम रक्कम देण्यासही नकार : मागील वर्षीचा वाहतूक खर्च अप्राप्त
दिगांबर जवादे - गडचिरोली
पंचायत समिती स्तरावरून शाळेपर्यंत पुस्तके पोहोचविण्याचा मागील वर्षीचा खर्च प्राप्त न झाल्याने जिल्ह्यातील बहुतांश गटशिक्षणाधिकार्यांनी यावर्षी शाळेपर्यंत पुस्तके पोहोचवून देण्यास नकार दिला आहे. नाईलाजास्तव मुख्याध्यापकांना स्वत:च्या खिश्यातले पैसे खर्च करून पुस्तके शाळेत आणावी लागत आहेत.
सर्व शिक्षा अभियानांतर्गत वर्ग १ ते ८ पर्यंतच्या सर्वच विद्यार्थ्यांंना मोफत शालेय पुस्तकांचे वाटप करण्यात येते. ही पुस्तके बालभारतीकडून गटसाधन केंद्रापर्यंत पोहोचवून देण्यात आली. त्यानंतर ही पुस्तके प्रत्येक शाळेपर्यंंत पोहोचवून देण्याची जबाबदारी संबंधित पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकार्यावर सोपविण्यात आली आहे. वाहतूक खर्च म्हणून प्रती टन १ हजार २00 रूपये देण्याचे मंजूर करण्यात आले आहे.
मागील वर्षी जिल्ह्यातील सर्वच गटशिक्षणाधिकार्यांनी वाहने भाड्याने घेऊन शाळेपर्यंंत पुस्तके पोहोचवून दिली. त्याचे बिल शिक्षण संचालक पुणे यांच्याकडे पाठविण्यात आले आहे. मात्र वर्ष लोटूनही सदर बिलाचे पैसे प्राप्त झाले नाही. गडचिरोली जिल्ह्यातील सर्व शाळांचे मिळून सुमारे ६ लाख रूपयाचे बिल मिळाले नाही. वाहतूकदार गटशिक्षणाधिकार्यांना धारेवर धरत आहेत. हीच स्थिती राज्याच्या सर्वच जिल्ह्यांमध्ये दिसून येते.
मागील वर्षीचेच पैसे प्राप्त न झाल्याने यावर्षी गटशिक्षणाधिकार्यांनी पुस्तके शाळेपर्यंंत पोहोचवून देण्यास स्पष्ट नकार दिला आहे. मुख्याध्यापकांनी स्वत: पुस्तके घेऊन जाण्याचे फर्मान सोडले आहे. त्याचबरोबर गटशिक्षणाधिकारी मागील वर्षीची आपबितीही मुख्याध्यापकांना सांगत आहेत.
त्यामुळे बरेचसे मुख्याध्यापक स्वत:कडचे पैसे खर्च करून पुस्तके शाळेपर्यंंत आणत आहेत. मुख्याध्यापकांनी खर्च केलेले पैसे परत मिळणार काय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.