वन विभागाच्या रोपवनात भ्रष्टाचार !
By Admin | Updated: September 16, 2015 03:29 IST2015-09-16T03:29:31+5:302015-09-16T03:29:31+5:30
वन विभागाच्या माध्यमातून दक्षिण-उमरेड वन परिक्षेत्रातील मौजा चनोडा येथे लागवड करण्यात आलेल्या रोपवनात लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप .....

वन विभागाच्या रोपवनात भ्रष्टाचार !
वन कामगार संघटनेचा आरोप :
दक्षिण उमरेड वन परिक्षेत्रातील घटना
नागपूर : वन विभागाच्या माध्यमातून दक्षिण-उमरेड वन परिक्षेत्रातील मौजा चनोडा येथे लागवड करण्यात आलेल्या रोपवनात लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप वन कामगार संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष सिराज पटेल यांनी केला आहे. विशेष म्हणजे, त्यांनी यासंबंधी संघटनेतर्फे मुख्य वन संरक्षक (प्रादेशिक)टी. एस. के. रेड्डी यांच्याकडे लेखी तक्रार सुद्धा केली आहे. त्या तक्रारीनुसार दक्षिण उमरेड वन परिक्षेत्रातील चनोडा येथील कक्ष क्र. ३६४ मधील १७२ हेक्टर क्षेत्रात रोपवन करण्यात आले आहे.
मात्र ही सर्व कामे अंदाजपत्रकीय तरतुदीनुसार पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु येथे मजुरांना कमी दराने मजुरी देण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. यात खड्ड्याचे दर ९ ते १० रुपये असताना मजुरांना केवळ ४ रुपयांप्रमाणे मजुरी देण्यात आली. संपूर्ण रोपवनासाठी एकूण ४ लाख ३० हजार खड्डे खोदायचे होते. त्यासाठी ४१ लाख १९ हजार ४०० रुपयांची मजूरी देणे अपेक्षित होते, परंतु प्रत्यक्षात मजुरांना केवळ १७ लाख २० हजार रुपयेच देण्यात आले असून, इतर २३ लाख ९९ हजार ४०० रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा उल्लेख करण्यात आला आहे.
याशिवाय मजुरी दर २७९.१३ रू पये असताना प्रत्यक्षात मजुरांना केवळ २०० रुपये देण्यात आले. एवढेच नव्हे, तर सदर रोपवन संयुक्त वन व्यवस्थापन समितीतर्गंत घेण्यात आले आहे. त्यामुळे स्थानिक लोक सहभागातून रोपवनाची सर्व कामे होणे अपेक्षित होते. परंतु संबंधित अधिकाऱ्यांनी छत्तीसगड, मध्य प्रदेश व चिखलदरा येथील मजूर आयात करू न त्यांच्या माध्यमातून कामे पूर्ण केल्याची माहिती पुढे आली आहे.
त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करू न दोषी अधिकाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी, अशी पटेल यांनी मागणी करू न आंदोलन करण्याचा इशाराही दिला. (प्रतिनिधी)