कालवा दुरुस्ती कामात भ्रष्टाचार?

By Admin | Updated: December 2, 2014 00:33 IST2014-12-02T00:33:38+5:302014-12-02T00:33:38+5:30

सावनेर तालुक्यातील खेकरानाला प्रकल्पाच्या कालव्याच्या दुरुस्ती कामाचे कंत्राट देण्यात आले. सदर कंत्राटदार निकृष्ट दर्जाच्या साहित्याचा वापर करून दुरुस्तीचे काम करीत असल्याचा आरोप स्थानिक

Corruption in canal repair work? | कालवा दुरुस्ती कामात भ्रष्टाचार?

कालवा दुरुस्ती कामात भ्रष्टाचार?

खेकरानाला प्रकल्प : कंत्राटदाराची सिंचन विभागाकडे तक्रार
संजय पोफळी - खापा
सावनेर तालुक्यातील खेकरानाला प्रकल्पाच्या कालव्याच्या दुरुस्ती कामाचे कंत्राट देण्यात आले. सदर कंत्राटदार निकृष्ट दर्जाच्या साहित्याचा वापर करून दुरुस्तीचे काम करीत असल्याचा आरोप स्थानिक शेतकऱ्यांनी केला. या संदर्भात शेतकऱ्यांनी सिंचन विभागातील अभियंत्याकडे तक्रार केली. मात्र, याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
खेकरानाला हा मध्यम प्रकल्प असून, या प्रकल्पाच्या २६ कि.मी. लांबीच्या मुख्य कालव्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. सदर कामाचे कंत्राट देण्यात आले आहे. या कालव्याचे शेवटचे टोकावर नाला असल्याने नाला ओलांडून पाणी पलीकडे नेण्यासाठी नाल्याच्या दोन्ही बाजूंना भिंती बांधण्यात आल्या व मोठ्या पाईपद्वारे कालव्यातील पाणी पलिकडे नेण्यात आले. सध्या या भिंत व पाईपच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे.
कालव्याच्या या शेवटच्या टोकावर पूर्वी बांधण्यात आलेल्या भिंतीला पाण्याच्या दाबामुळे भगदाड पडले आणि त्यातून मोठ्या प्रमाणात पाणी नाल्यात वाहून जाऊ लागले. त्यामुळे कालव्याचे पाणी परिसरातील व नाल्याच्या काठी असलेल्या सावली येथील शेतकऱ्यांच्या शेतात शिरल्याने पिकांचे प्रचंड नुकसान झाले होते. हा प्रकार अडीच वर्षांपूर्वी घडल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. या भिंतीची दुरुस्ती करण्याची मागणी शेतकऱ्यांनी अनेकदा केली. मात्र, सिंचन विभागाने या मागणीकडे लक्ष दिले नाही.
वास्तवात या कालव्यातील पाण्यामुळे या परिसरातील २५० एकर शेतीचे सिंचन केले जाते. शेतकऱ्यांचा रेटा वाढल्याने सिंचन विभागाने दीड वर्षांपूर्वी सदर भिंतीच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले. त्याहीवेळी निकृष्ट दर्जाचे काम करण्यात आल्याने कालव्यातील पाणी नाल्यात वाहून जाऊ लागले. दुसरीकडे, प्रकल्पात व कालव्यात पाणी असूनही ते सिंचनासाठी मिळत नसल्याची परिस्थिती निर्माण झाली. सध्या याच भिंतीच्या दुरुस्तीचे काम कंत्राटदाराकरवी सुरू आहे. सदर कंत्राटदार निकृष्ट कामे करीत असल्याचा आरोप जाणकारांनी केला. त्यामुळे सावली शिवारातील पिकांना भविष्यात ओलितासाठी कालव्याचे पाणी मिळेल की नाही, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.
सध्या करण्यात येत असलेले दुरुस्तीचे काम सिंचन विभागाच्या नियंत्रणाखाली सुरू आहे. या कामात कंत्राटदार हयगय करीत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला असून, हा प्रकार सिंचन विभागातील अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिला.
यासंदर्भात सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता डब्ल्यू. एन. खापेकर यांनी सांगितले की, या संदर्भात आपल्याकडे कुणाची कसलीही तक्रार आली नाही. मात्र, स्थानिक अधिकाऱ्यांकडून या संदर्भात माहिती मागवून योग्य कार्यवाही करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Corruption in canal repair work?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.