मनपाचे इंदिरा गांधी रुग्णालय ‘डेडिकेटेड कोविड हेल्थ केअर’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2020 23:53 IST2020-09-15T23:52:03+5:302020-09-15T23:53:54+5:30
कोविड पॉझिटिव्ह रुग्णांना वेळेवर उपचार मिळावे यासाठी गांधीनगर येथील मनपाचे इंदिरा गांधी रुग्णालय आता यापुढे ‘डेडिकेटेड कोविड हेल्थ केअर’ म्हणून कार्यान्वित असेल. सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांच्या उपचाराकरिता येथे ऑक्सिजनसह ११० बेड्सची व्यवस्था करण्यात आली आहे.

मनपाचे इंदिरा गांधी रुग्णालय ‘डेडिकेटेड कोविड हेल्थ केअर’
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोविड पॉझिटिव्ह रुग्णांना वेळेवर उपचार मिळावे यासाठी गांधीनगर येथील मनपाचे इंदिरा गांधी रुग्णालय आता यापुढे ‘डेडिकेटेड कोविड हेल्थ केअर’ म्हणून कार्यान्वित असेल. सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांच्या उपचाराकरिता येथे ऑक्सिजनसह ११० बेड्सची व्यवस्था करण्यात आली आहे.
इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) या दोन्ही रुग्णालयांवरील ताण कमी करण्यासाठी व नव्या रुग्णांना वेळेवर उपचार मिळावे यासाठी डेडिकेटेड कोविड हेल्थ केअर सहायक ठरत आहे.
सध्या इंदिरा गांधी रुग्णालयात ८० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. रुग्णालयामध्ये तज्ज्ञ डॉक्टरांसह, आयुष मंत्रालयाचे १२ डॉक्टर आणि इतर वैद्यकीय चमू सेवा देत आहे. या रुग्णालयाचे नूतनीकरण करण्यात आले आहे. रुग्णांना आवश्यक त्या प्रकारच्या उत्तम भौतिक सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. रुग्णालयातील दुसऱ्या व तिसऱ्या माळ्यावर ७ वॉर्डमध्ये कोविड पॉझिटिव्ह रुग्णांची व्यवस्था करण्यात आली आहे.
महापौर संदीप जोशी व आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या पुढाकाराने पुढील काही दिवसात मनपाच्या इतरही रुग्णालयांमध्ये कोविड रुग्णांसाठी अशा प्रकारची सेवा उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
लक्षणे आढळल्यास त्वरित आपल्या जवळच्या कोविड चाचणी केंद्रात जाउन चाचणी करून घ्यावी व डॉक्टरांच्या सल्ल्याने पुढील उपचार करून घ्यावा, असे आवाहन मनपाचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी केले आहे.