मनपा महिलांना देणार प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:08 IST2021-06-24T04:08:23+5:302021-06-24T04:08:23+5:30
महिला व बालकल्याण समितीचा निर्णय लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर: महिलांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी महापालिकेतर्फे त्यांना शिवणकाम, कुकिंग, ब्युटीशियन, ...

मनपा महिलांना देणार प्रशिक्षण
महिला व बालकल्याण समितीचा निर्णय
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: महिलांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी महापालिकेतर्फे त्यांना शिवणकाम, कुकिंग, ब्युटीशियन, मेहंदी क्लासेस, संस्कार भारती रांगोळीचे प्रशिक्षण देण्याचा निर्णय महिला व बालकल्याण विशेष समितीच्या सभेत बुधवारी घेण्यात आला.
ऑनलाईन सभेमध्ये महिला व बालकल्याण समिती सभापती दिव्यात धुरडे, सदस्या सोनाली कडू, प्रणिता शहाणे, स्नेहा निकोसे आणि मंगला लांजेवार, समाज विकास विभागाचे उपायुक्त राजेश भगत, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. संजय चिलकर आणि समाज विकास अधिकारी दिनकर उमरेडकर उपस्थित होते.
महिलांचे आर्थिक उत्पन्न वाढले तर त्याचा लाभ त्यांच्या कुटुंबाला होईल. प्रत्येक प्रभागात महिलांना प्रशिक्षण देण्याची व्यवस्था केली जाईल. महिलांना शिवणयंत्र वाटप करण्यात येईल. प्रत्येक झोनमध्ये बचत गटाचा महिलांसाठी पोटोबा (कॅन्टीन) ची जागा उपलब्ध करण्याचे निर्देश धुरडे यांनी समाज विकास विभागाला दिले. दिव्यांगांसाठी तयार केलेल्या संकेतस्थळामध्ये दुरुस्ती करण्याचेही निर्देश दिले. ज्या दिव्यांगांचे स्वत:चे घर नाही त्यांना योजनेचा लाभ मिळत नाही. त्यामुळे स्वत:चे घर असावे ही अट शिथिल करुन नागपूरचा रहिवासी असावा, अशी अट टाका, नागपूर मनपा मुख्यालयात महिलांना त्यांच्या बाळांना स्तनपान करण्यासाठी वेगळी व्यवस्था करण्याचे निर्देश धुरडे यांनी दिले.