‘मॉडर्न’ वसतिगृहासाठी ‘कॉर्पोरेट्स’ची मदत

By Admin | Updated: August 20, 2014 01:06 IST2014-08-20T01:06:21+5:302014-08-20T01:06:21+5:30

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या वसतिगृहांमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांचे हाल लवकरच संपण्याची चिन्हे आहेत. अद्ययावत सोयीसुविधांनीयुक्त असे बहुमजली ‘मॉडर्न’ वसतिगृह उभारण्याच्या

Corporates' help for 'Modern Hostel' | ‘मॉडर्न’ वसतिगृहासाठी ‘कॉर्पोरेट्स’ची मदत

‘मॉडर्न’ वसतिगृहासाठी ‘कॉर्पोरेट्स’ची मदत

नागपूर विद्यापीठ : व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत विकासकामांना मंजुरी
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या वसतिगृहांमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांचे हाल लवकरच संपण्याची चिन्हे आहेत. अद्ययावत सोयीसुविधांनीयुक्त असे बहुमजली ‘मॉडर्न’ वसतिगृह उभारण्याच्या प्रस्तावाला मंगळवारी व्यवस्थापन परिषदेने मान्यता दिली. या वसतिगृहाच्या उभारणीसाठी ‘कॉर्पोरेट’ कंपन्यांसोबत प्रशासनाची चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे ‘सीएसआर’ (कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी) अंतर्गत मदतीचा हात देण्यासाठी दोन कंपन्यांनी सकारात्मकता दर्शवली आहे.
व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ.के.सी.देशमुख यांनी यासंदर्भात मंगळवारच्या बैठकीत ठराव मांडला. या प्रस्तावावर सखोल चर्चा करण्यात आली. विधी महाविद्यालय चौकातील विद्यापीठाच्या वसतिगृहाची इमारत जीर्ण होत असून विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अशा स्थितीत विद्यार्थ्यांसाठी सोयीसुविधांनी युक्त असे वसतिगृह बांधण्याची आवश्यकता आहेच असे मत सदस्यांनी व्यक्त केले. परंतु संबंधित ठिकाणची इमारत पाडून त्या ठिकाणी नवीन वसतिगृह बांधण्यासाठी बराच कालावधी लागू शकतो. अशा स्थितीत नवीन जागेवर २०० विद्यार्थी सामावू शकतील असे वसतिगृह बांधण्यास काहीच हरकत नाही असा सदस्यांचा सूर होता.
दरम्यान, या वसतिगृहासाठी साधारणत: ६ कोटी ५१ लाखांचा खर्च अपेक्षित आहे. यासाठी काही ‘कॉर्पोरेट’ कंपन्यांसोबतच विद्यापीठाची चर्चा सुरू असल्याची माहिती व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यांना प्रभारी कुलगुरू अनुपकुमार यांनी दिली. दोन मोठ्या ‘कॉर्पोरेट’ कंपन्यांनी यासंदर्भात सकारात्मकता दर्शवली असून लवकरच विद्यापीठ व विद्यार्थ्यांना ‘गुड न्यूज’ मिळू शकते असे अनुपकुमार यांनी सदस्यांना सांगितले. सोबतच डॉ.के.सी.देशमुख यांनी ‘इनोव्हेटिव्ह पार्क’साठी स्थायी इमारत बनविण्यासंदर्भात ठराव सादर केला. ‘डिस्कव्हरी पार्क’, ‘बायोडायव्हर्सिटी पार्क’ आणि ‘टेक्नॉलॉजी पार्क’साठी नवीन प्रशासकीय इमारत परिसरातच ही स्थायी इमारत बनविण्यात यावी असे सदस्यांचे मत पडले. या ठरावालादेखील मंजुरी देण्यात आली.
(प्रतिनिधी)

Web Title: Corporates' help for 'Modern Hostel'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.