CoronaVirus in Nagpur : Two more patients free from coronation in Nagpur | CoronaVirus in Nagpur : नागपुरात  आणखी दोन रुग्ण कोरोनामुक्त

CoronaVirus in Nagpur : नागपुरात  आणखी दोन रुग्ण कोरोनामुक्त

ठळक मुद्देमेडिकल : बाधित महिला रुग्णाच्या नमुन्याच्या अहवालाची प्रतीक्षा

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) गेल्या १४ दिवसांपासून भरती असलेल्या दोन्ही कोरोनाबाधित रुग्णांचे नमुने निगेटिव्ह आल्याने त्यांना शनिवारी सुटी देण्यात आली. रुग्णालयातून बाहेर पडताना या रुग्णांनी सेवा देणाऱ्या डॉक्टर, परिचारिका व कर्मचाऱ्यांचे आभार मानले. नागपुरात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या आता तीन झाली आहे. नागपुरात पहिला कोरोनाबाधित रुग्ण ११ मार्च रोजी आढळून आला. ४५ वर्षीय या व्यक्तीला मेयोच्या वॉर्ड क्र. २५मध्ये ठेवण्यात आले होते. याच्या दुसऱ्याच दिवशी त्यांची ४३ वर्षी पत्नी व अमेरिका प्रवासाची पार्श्वभूमी असलेले दोन ४५ वर्षीय पुरुष रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले. या तिघांवर मेडिकलमध्ये उपचार सुरू होते. पहिल्या रुग्णाचे तिन्ही नमुने निगेटिव्ह आल्याने त्यांना २६ मार्च रोजी रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तर दोन्ही पुरुषांचेही तिन्ही नमुने निगेटिव्ह आल्याने त्यांना आज सुटी देण्यात आली. महिला रुग्णाचा दुसरा नमुना शुक्रवारी निगेटिव्ह आला. तिसरा नमुना पाठविण्यात आला असून तो निगेटिव्ह आल्यास त्यांनाही सुटी होण्याची शक्यता आहे. कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांनी आजपासून नव्या जीवनाला सुरुवात करीत असल्याच्या भावना डॉक्टरांकडे व्यक्त केल्या. हे बंदिस्त १४ दिवस बरेच काही शिकवूनही गेले, असेही ते म्हणाले. त्यांनी लोकांना विशेषत: युवकांना घरीच राहण्याचे व भीती न बाळगता काळजी घेण्याचे आवाहनही केले. रुग्णालयातून सुटी झाले तरी पुढील १४ दिवस दोन्ही रुग्णांना घरीच राहण्यास सांगितले आहे. बाधित रुग्णांची सेवा करून त्यांना रोगमुक्त करणाऱ्या सर्व डॉक्टर, परिचारिका व कर्मचाऱ्यांच्या कार्याचे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांच्याकडून कौतुक करण्यात आले. रुग्ण बरा झाल्याने डॉक्टरांसोबतच कर्मचाऱ्यांचा आत्मविश्वास वाढतो. भीती दूर होते. उत्साह वाढतो, असेही डॉ. मित्रा म्हणाले. औषधवैद्यकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. राजेश गोसावी व वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे यांनीही डॉक्टरांपासून ते परिचारिका व कर्मचाऱ्यांच्या कार्याचे कौतुक केले आहे.

Web Title: CoronaVirus in Nagpur : Two more patients free from coronation in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.