CoronaVirus in Nagpur: Shocking! 25 deaths in a single day in Nagpur | CoronaVirus in Nagpur : धक्कादायक! नागपुरात एकाच दिवशी २५ मृत्यू

CoronaVirus in Nagpur : धक्कादायक! नागपुरात एकाच दिवशी २५ मृत्यू

ठळक मुद्दे २५० नव्या रुग्णांची भर : सहा दिवसात १०३ रुग्ण बाधित : दोन पोलिसांचा मृत्यू

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : कोरोना संसर्गाचा वेग नागपूर जिल्ह्यात कमालीचा वाढला असताना मृतांच्या वाढत्या संख्येने आरोग्य यंत्रणेसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. गुरुवारी तब्बल २५ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली, तर २५० नव्या रुग्णांची भर पडली. मृतांची संख्या २२९ झाली असून रुग्णांची संख्या ७,२९१ वर पोहचली आहे. धक्कादायक म्हणजे, गेल्या सहा दिवसात १०३ कोरोनाबाधितांचे बळी गेले. यात दोन पोलिसांच्या मृत्यूने खळबळ उडाली आहे.
मेयो, मेडिकल व खासगी रुग्णालयांमध्ये मृत्यूची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. आता कोविड केअर सेंटरमध्येही रुग्णांचा मृत्यू होऊ लागल्याने चिंतेचे वातावरण आहे. मेयोमध्ये आज सहा कोरोनाबाधित रुग्णांचे मृत्यू झाले. यात मोमिनपुरा येथील ४४ वर्षीय पुरुषाचा पहाटे १.३० वाजताच्या सुमारास मृत्यू झाला. या रुग्णाला अस्थमासोबतच इतरही आजार होते. तांडापेठ जुनी वसाहती येथील ५६ वर्षीय पुरुषाला उच्च रक्तदाब व अनियंत्रित टाईप टू मधुमेह होता. सारीचा रुग्ण असलेल्या रुग्णावर उपचार सुरू असताना पहाटे मृत्यू झाला. कळमेश्वर येथील २६ वर्षीय महिलेला श्वसनाचा त्रास होता. उपचार सुरू असताना पहाटे मृत्यू झाला. कळमना येथील ६४ वर्षीय पुरुषाला न्युमोनियासोबतच टाईप टू मधुमेह व उच्च रक्तदाब होता. आज दुपारी त्यांचा मृत्यू झाला. तेलंगखेडी हनुमानमंदिर परिसरातील ६० वर्षीय महिलेला न्युमोनियासोबतच उच्च रक्तदाबाचा विकार होता. दुपारी त्यांचा मृत्यू झाला. महाजनपुरा पारडी येथील ६८ वर्षीय पुरुषाला न्युमोनिया, उच्च रक्तदाबासोबतच हृदयविकाराचा झटका आला होता. उपचार सुरू असताना त्यांचा सायंकाळी मृत्यू झाला. मेडिकल व खासगी हॉस्पिटलमधील उर्वरित मृतांची माहिती जिल्हा शल्यचिकित्सा कार्यालयातून उपलब्ध होऊ शकली नाही.

मेडिकलमधून १२५ रुग्ण पॉझिटिव्ह
मेडिकलच्या प्रयोगशाळेत चाचण्यांचा वेग वाढला. आज १२५ रुग्ण पॉझिटिव्ह आले. या प्रयोगशाळेतील आतापर्यंतच्या पॉझिटिव्ह रुग्णांचा हा उच्चांक आहे. या शिवाय, मेयोच्या प्रयोगशाळेत १०२, एम्सच्या प्रयोगशाळेतून ६८, नीरीच्या प्रयोगशाळेतन ७५, माफसुच्या प्रयोगशाळेतून २५, खासगी लॅबमधून ५८, अ‍ॅण्टिजेन चाचणीतून ८६ असे एकूण ५३९ रुग्ण पॉझिटिव्ह आले. १५२ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले. आतापर्यंत ४,०८५ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या २,९७७ रुग्ण उपचाराखाली आहेत.

फाईल अदलाबदल झाल्याने जिवंत रुग्णाची मृत्यूची नोंद
मेडिकलमध्ये कोरोनाबाधित रुग्णासोबतच इतरही आजारांच्या रुग्णांची संख्या वाढल्याने रुग्णसेवेचा प्रचंड ताण वाढला आहे. यातूनच फायलीची अदलाबदल झाल्याने एका रुग्णांच्या नातेवाईकांना मनस्तापाला सामोर जावे लागले. झाले असे की, गुरुवारी कामठी येथील ७० वर्षीय रुग्णाला मेडिकलच्या कोविड हॉस्पिटलमध्ये दाखल केले. याचदरम्यान ताजबाग येथील ६५वर्षीय पुरुष रुग्णालाही भरती केले. ७० वर्षीय रुग्णाची प्रकृती गंभीर झाल्याने तातडीने आयसीयूमध्ये दाखल केले. दाखल करीत असताना ६५ वर्षीय रुग्णाची फाईल ७० वर्षीय रुग्णासोबत गेली. उपचार सुरू असताना या रुग्णाचा मृत्यू झाला. मृताच्या नातेवाईकांना याची माहिती दिल्यावर त्यांच्यात शोककळा पसरली. मृतदेह ताब्यात देण्यापूर्वी ओळख पटवली जात असताना नातेवाईंकानी मृतदेह आपल्या ओळखीचा नसल्याचे सांगताच, गोंधळ उडाला.

Web Title: CoronaVirus in Nagpur: Shocking! 25 deaths in a single day in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.