नागपुरात २४ तासात ९१ ‘कोरोना’बळी; ६८९० ‘पॉझिटिव्ह’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 21:05 IST2021-04-20T21:04:49+5:302021-04-20T21:05:11+5:30
Coronavirus in Nagpur news; सोमवारी ‘कोरोना’चा मोठा ‘ब्लास्ट’ झाल्यानंतर मंगळवारच्या अहवालात चाचण्यांची संख्या परत वाढली आणि बळींचा आकडा कमी झाला. २४ तासात जिल्ह्यामध्ये ६ हजार ८९० नवीन बाधितांची नोंद झाली तर, ९१ लोकांचा मृत्यू झाला.

नागपुरात २४ तासात ९१ ‘कोरोना’बळी; ६८९० ‘पॉझिटिव्ह’
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सोमवारी ‘कोरोना’चा मोठा ‘ब्लास्ट’ झाल्यानंतर मंगळवारच्या अहवालात चाचण्यांची संख्या परत वाढली आणि बळींचा आकडा कमी झाला. २४ तासात जिल्ह्यामध्ये ६ हजार ८९० नवीन बाधितांची नोंद झाली तर, ९१ लोकांचा मृत्यू झाला. ‘व्हेंटिलेटर्स’, ‘ऑक्सिजन’ यांच्या कमतरतेमुळे मृत्यूसंख्या जास्त असून, जोपर्यंत सुविधा मिळत नाही तोपर्यंत असे चित्र कायम राहू शकते, असा अंदाज वैद्यकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे.
मंगळवारी शहरात एकूण २६ हजार ८० चाचण्या झाल्या. त्यातील १६ हजार ११३ शहरात तर, ९ हजार ९६८ चाचण्या ग्रामीण भागात झाल्या. शहरात ४ हजार ८७८ व ग्रामीणमध्ये २ हजार ५ नवे बाधित आढळले. मृत्यूची संख्या ९१ होती. यातील ५० मृत्यू शहराच्या हद्दीतील होते व सात जण जिल्ह्याबाहेरील होते. तर २४ तासात ५ हजार ५०४ रुग्ण ठीक झाले.
मृत्यूसंख्या साडेसहा हजाराजवळ
जिल्ह्यात आतापर्यंत ३ लाख ३६ हजार ३६० बाधित आढळले. त्यातील २ लाख ४९ हजार ७१४ बाधित शहरातील आहेत, तर एकूण मृत्यूसंख्या ६ हजार ४७७ इतकी झाली आहे.
साडेपंधरा हजार रुग्ण रुग्णालयात
सद्यस्थितीत जिल्ह्यामध्ये ७१ हजार ६९२ ‘अॅक्टिव्ह’ रुग्ण आहेत. त्यातील ४३ हजार ६५७ रुग्ण शहरातील आहेत. जिल्ह्यात १५ हजार ५०० रुग्ण विविध रुग्णालयांमध्ये दाखल आहेत, तर ५६ हजार १९२ रुग्ण ‘होम आयसोलेशन’मध्ये आहेत.