Coronavirus in Nagpur; कोरोना काळात निद्रानाशाच्या समस्या वाढल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 07:30 IST2021-05-10T07:30:00+5:302021-05-10T07:30:03+5:30
Nagpur News कोरोना काळात सर्वाधिक प्रमाण वाढले आहे ते निद्रानाशाचे. डॉक्टरांकडे येणाऱ्या रुग्णांमध्ये निद्रानाश झालेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे.

Coronavirus in Nagpur; कोरोना काळात निद्रानाशाच्या समस्या वाढल्या
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना संक्रमणामुळे वाढलेली आरोग्याची धास्ती आणि टाळेबंदीमुळे निर्माण झालेली पोकळी नैराश्येस कारणीभूत ठरत आहे. नैराश्य हा एक आजार आहे आणि एकटेपणा आला की नैराश्य वाढते, असा सर्वसाधारण अनुभव आहे. मात्र, कोरोना काळात सर्वाधिक प्रमाण वाढले आहे ते निद्रानाशाचे. डॉक्टरांकडे येणाऱ्या रुग्णांमध्ये निद्रानाश झालेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. स्वाभाविकच निद्रानाश हा वाढलेल्या अनावश्यक तणावामुळे होतो आणि हा तणाव सद्यस्थितीत वाढलेल्या एकलेपणामुळे वाढत आहे.
तणावाची कारणे
- लॉकडाऊनमुळे घरात बंदिस्त असणे
- घरात राहायची सवय नसल्याने आणि बाहेर पडता येत नसल्याने नैराश्य वाढणे
- वेळ कसा घालवायचा हा प्रश्न पडणे
- मित्र/मैत्रिणींशी संवाद तुटल्याने किंवा संवाद साधण्यासाठी कुणीच नसल्याने
- साचेबद्ध आयुष्य झाल्याने तणाव वाढत जातो.
तणावापासून दूर कसे राहता येईल
- सर्वप्रथम जे घडत आहे किंवा होत आहे, त्याचा स्वीकार करणे
- माझा लाभ कशात आहे, याचे चिंतन करणे
- संकटाला देवाने दिलेली संधी समजून वागणे
- असा वेळ कधीच भेटणार नव्हता, तो मिळाला म्हणून जे शक्य नव्हते ते काम करणे. उदा. सिनेमे बघणे, पुस्तके वाचणे, छंदोपासना आदी.
- सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे चिंता नको तर काळजी घ्या.
सर्वाधिक विचारले जाणारे प्रश्न
- मला झोप का येत नाही?
- ही अनिश्चितता कधी संपेल?
- दिवस कसा काढावा, समजत नाही?
- घरात राहून कोणती कामे करू?
दुसऱ्याला मदत करा आणि इम्युनिटी वाढवा
रोगप्रतिकारक शक्तीचे गणित तुमच्या समाधानाशी निगडित आहे. एका अर्थी संकटात दुसऱ्याला मदत करण्याचा आनंद सर्वाधिक असतो. त्यामुळे मदतीसाठी सज्ज राहा, तुमची इम्युनिटी नक्की वाढेल. सोबतच रडगाणे न गाताच वास्तवाचा सामना करा आणि मला हे बदलवता येते, हे स्वत:लाच सांगा. योग शिकण्याची ही सर्वोत्तम संधी आहे. आशेवर जगणे हे उत्तम टॉनिक आहे.
- डॉ. अविनाश जोशी, मानसोपचारतज्ज्ञ
हल्लीच्या समस्या क्लिनिकल डिप्रेशन नव्हेत
हल्ली मानसिक स्वास्थ्यासाठी येणाऱ्यांची संख्या वाढली नक्कीच आहे. मात्र, खूप गंभीर असे विषय नाहीत. सर्वाधिक रुग्ण केवळ आणि केवळ झोपेच्या तक्रारी घेऊन येत आहेत. या तक्रारी क्लिनिकल डिप्रेशनच्या नाहीत. सवय नसलेल्या गोष्टी अचानक जीवनात आल्या की या समस्या येतात. लॉकडाऊन ही अनपेक्षित घडलेली क्रिया आहे आणि त्यामुळे अशा क्षुल्लक तक्रारी घेऊन येणाऱ्यांची संख्याही वाढल्याचे डॉ. अविनाश जोशी यांनी सांगितले.