CoronaVirus in Nagpur : वर्षभरानंतर कोरोनाच्या ३० रुग्णांची नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2021 20:49 IST2021-06-14T20:47:49+5:302021-06-14T20:49:45+5:30
CoronaVirus, Nagpur news तब्बल वर्षभरानंतर आज सोमवारी ३० रुग्ण आढळून आले. तीन रुग्णांचे जीव गेले. यात शहरामधील १८ रुग्ण, १ मृत्यू तर ग्रामीणमध्ये १० रुग्ण व पुन्हा शून्य मृत्यू आहे.

CoronaVirus in Nagpur : वर्षभरानंतर कोरोनाच्या ३० रुग्णांची नोंद
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाच्या प्रादुर्भावाला मार्च २०२० पासून सुरुवात झाली असली तरी जून महिन्यापासून रुग्ण वाढू लागले होते. ८ जून रोजी ३० रुग्णांची नोंद झाली होती. तब्बल वर्षभरानंतर आज सोमवारी ३० रुग्ण आढळून आले. तीन रुग्णांचे जीव गेले. यात शहरामधील १८ रुग्ण, १ मृत्यू तर ग्रामीणमध्ये १० रुग्ण व पुन्हा शून्य मृत्यू आहे.
कोरोनाचा पहिल्या लाटेत मे २०२० पर्यंत दैनंदिन रुग्णसंख्या १० ते २० दरम्यान राहत होती. परंतु जून महिन्यापासून रुग्ण वाढण्यास सुरुवात झाली. दिवसाला ३० ते ५० रुग्ण आढळून येत होते. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात रुग्ण व मृत्यूच्या संख्येने उच्चांक गाठला. परंतु ऑक्टोबर महिन्यापासून या दोन्ही संख्येत घट होऊ लागली. मात्र या कालावधीत दैनंदिन रुग्णसंख्या ५० च्या खाली आली नव्हती. सोमवारी पहिल्यांदाच एवढ्या कमी रुग्णांची नोंद झाली. विशेष म्हणजे, एप्रिल महिन्यात आठ हजारावर गेलेल्या रुग्णसंख्येत दीड महिन्यातच मोठी घट आल्याने वैद्यकीय क्षेत्रात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
पॉझिटिव्हिटीचा दर ०.४३ टक्के
नागपूर जिल्ह्यात आज सर्वात कमी ६,९२९ चाचण्या झाल्या. त्यातुलनेत ०.४३ टक्के रुग्ण पॉझिटिव्ह आले. मृत्यूचा दरही कमी होऊन १.८९ टक्क्यावर आला. शहरात पॉझिटिव्हिटीचा दर ०.२९ टक्के तर ग्रामीणमध्ये १.१५ टक्के आहे. आज १९३ रुग्ण बरे झाले असून, कोरोनातून मुक्त होणाऱ्या रुग्णांचा दर ९७.७४ टक्के आहे. कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्याही कमी होऊन १७७० वर आली आहे.
कोरोनाची सोमवारची स्थिती
दैनिक चाचण्या : ६,९२९
शहर : १८ रुग्ण व १ मृत्यू
ग्रामीण : १० रुग्ण व ० मृत्यू
ए. फबाधित रुग्ण : ४,७६,४४५
ए. सक्रिय रुग्ण : १,७७०
ए.बरे झालेले रुग्ण : ४,६५,६६८
ए. मृत्यू : ९,००७