नागपुरात मनपा रुग्णालयात कोरोनाबाधितांवर उपचारास नकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2020 20:07 IST2020-09-03T20:05:49+5:302020-09-03T20:07:58+5:30
आवश्यक मनुष्यबळही उपलब्ध करून देण्यात आले. असे असताना, नागपुरात मनपा रुग्णालयात बाधितांना दाखल करून घेण्यास नकार दिला जात असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.

नागपुरात मनपा रुग्णालयात कोरोनाबाधितांवर उपचारास नकार
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाबाधितांना उपचार मिळावा म्हणून लाखो रुपये खर्च करून महापालिकेचे इंदिरा गांधी रुग्णालय अद्ययावत करण्यात आले. कोविड हेल्थ सेंटरचा दर्जाही देण्यात आला. आवश्यक मनुष्यबळही उपलब्ध करून देण्यात आले. असे असताना, बाधितांना दाखल करून घेण्यास नकार दिला जात असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. रुग्णाच्या जीवावर बेतल्यास जबाबदार कोण, असा प्रश्न नागपूरकरांना पडला आहे.
शहरात मार्च महिन्यापासून कोरोनाच्या प्रादुर्भावाला सुरुवात झाली. परंतु कोविड रुग्णांसाठी मनपाचे दवाखाने खुले होण्यास तब्बल पाच महिन्यांचा कालावधी लागला. यावरून मनपाचा आरोग्य विभाग नागरिकांच्या आरोग्यासाठी किती गंभीर आहे, ते दिसून येते. मनपाच्या इंदिरा गांधी रुग्णालयातून कोविड रुग्णांची सेवा घडावी म्हणून रुग्णालयात आवश्यक बदलांसह आॅक्सिजन पाईपलाईन टाकण्यात आली. परंतु सर्व सोयी असताना कुठले तरी कारण समोर करून रुग्णांना मेयो, मेडिकलमध्ये पाठविण्याचा सपाटा सुरू आहे. १२५ खाटा असलेल्या या रुग्णालयात सध्या १२ कोविड रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती आहे.
या रुग्णालयासंदर्भात नगरसेवक संजय महाकाळकर यांनीही तक्रार केली आहे. बुधवारी कोरोनाबाधित रुग्णाला या रुग्णालयात उपचारासाठी नेले असता डॉक्टरांनी तपासणी न करताच त्याला दाखल करून घेण्यास नकार दिल्याचे त्यांचे म्हणणे आहे. एकीकडे मेयो, मेडिकलमधील खाटा कमी पडत असताना व खासगीमध्ये लाखो रुपये शुल्क आकारले जात असताना मनपा रुग्णालयाच्या चालढकलपणामुळे गरीब व सामान्य रुग्णांचा जीव धोक्यात आला आहे.
-‘सीसीसी’मधीलही रुग्णांसही नकार
कोविड रुग्णांवरील उपचारासाठी दिशादर्शक ठरवून दिले आहेत. लक्षणे नसलेल्या रुग्णांसाठी होम आयसोलेशन किंवा कोविड के अर सेंटर (सीसीसी), सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी कोविड हेल्थ सेटर व मध्यम व गंभीर रुग्णांसाठी कोविड हॉस्पिटल आहेत. ‘सीसीसी’मध्ये ज्या रुग्णांना ताप किंवा इतर लक्षणे दिसल्यास ऑक्सिजनची पातळी कमी होत असल्यास कोविड हेल्थ सेंटरमध्ये पाठविले जाते. परंतु सीसीसीच्या काही डॉक्टरांचे म्हणणे आहे, येथे पाठविलेल्या बहुसंख्य रुग्णांवर उपचार न करताच मेयो, मेडिकलमध्ये पाठविले जाते. यात लागणारा वेळ हा रुग्णाच्या जीवासाठी धोकादायक ठरत आहे.
-मनपाच्या हेल्थ सेंटरची ही जबाबदारी
कोविड पॉझिटिव्ह रुग्णांची ऑक्सिजन पातळी नियमित तपासणे उपचाराचा भाग आहे. ९४ किंवा त्यापेक्षा शरीरातील ऑक्सिजनची पातळी खाली जात असल्यास तातडीने ऑक्सिजन देण्याची गरज पडते. याची सोय मनपाच्या या इंदिरा गांधी रुग्णालयात करण्यात आली आहे. यासाठी ऑक्सिजनसह, औषधे व इतर साहित्य उपलब्ध करून देण्यात आली आहेत. परंतु रुग्णालय आपली जबाबदारी झटकत असल्याचे दिसून येत आहे. या संदर्भात रुग्णालयाच्या प्रमुख डॉ. कांचन किंमतकर यांना मोबाईलद्वारे संपर्क साधला असता व संदेशही दिला असतानाही त्यांनी बोलणे टाळले.