नऊ वस्त्या कोरोनाच्या नवीन ‘हॉटस्पॉट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:09 IST2021-02-13T04:09:55+5:302021-02-13T04:09:55+5:30

नागपूर : चार दिवसांत १३९८ नव्या रुग्णांची भर पडल्याने आरोग्य विभागात खळबळ उडाली. यामुळे मागील सात दिवसांत पॉझिटिव्ह आलेल्या ...

Corona's new 'hotspot' of nine settlements | नऊ वस्त्या कोरोनाच्या नवीन ‘हॉटस्पॉट’

नऊ वस्त्या कोरोनाच्या नवीन ‘हॉटस्पॉट’

नागपूर : चार दिवसांत १३९८ नव्या रुग्णांची भर पडल्याने आरोग्य विभागात खळबळ उडाली. यामुळे मागील सात दिवसांत पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांच्या वस्त्यांची माहिती घेतली असता नऊ वस्त्या कोरोनाच्या नवीन हॉटस्पॉट ठरल्याचे सामोर आले. याला मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी दुजोरा दिल्याने गंभीरता वाढली आहे. शुक्रवारी ३१९ नवे रुग्ण व ४ रुग्णांचे बळी गेले. रुग्णांची एकूण संख्या १३७८१४, तर मृतांची संख्या ४२१९ झाली.

कोरोनाच्या आणीबाणीच्या काळात सर्वाधिक रुग्णांची नोंद मनपाच्या गांधीबाग व सतरंजीपुरा झोनमध्ये झाली होती. मोमीनपुरा, तकीया, भानखेडा, टिमकी, हंसापुरी, कसाबपुरा, नाईक तलाव, बांग्लादेश व सतरंजीपुरा आदी वसाहती हॉटस्पॉट ठरल्या होत्या. ऑगस्ट महिन्यापासून तर नागपूरच्या सर्वच वसाहतींमधून रुग्ण आढळून येत असल्याने ‘हॉटस्पॉट’ मागे पडले. आता पुन्हा याची चर्चा होत आहे. मनपा प्रशासनानुसार खामला, स्वावलंबीनगर, जयताळा, अयोध्यानगर, न्यू बीडीपेठ, वाठोडा, दिघोरी, जरीपटका, जाफरनगरात मागील सात दिवसांत रुग्ण वाढले. येथील रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांची कोरोना चाचणी करण्याचे निर्देश मनपा आयुक्तांनी दिले आहे. वाढत असलेल्या रुग्णसंख्येला घेऊन गुरुवारी अधिकाऱ्यांची बैठक झाली, तर शुक्रवारी हॉटेल व्यावसायिक व व्यापाऱ्यांशी चर्चा करून कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांची कठोरतेने पालन करण्याचे निर्देश मनपा आयुक्तांनी दिले.

-चाचण्यांची संख्या कमी, रुग्णसंख्येतही घट

गुरुवारी पाच हजारांवर चाचण्या झाल्याने रुग्णसंख्या वाढली होती. परंतु आज चाचण्यांची संख्या कमी होताच रुग्णसंख्येतही घट झाली. ४०२३ आरटीपीसीआर, ४८३ रॅपिड अँटिजेन असे एकूण ४५०६ चाचण्या झाल्या. यात आरटीपीसीआरमध्ये ३०३, तर अँटिजेनमधून १६ रुग्ण पॉझिटिव्ह आले. बाधितांमध्ये शहरातील २६८, ग्रामीणमधील ४९, तर जिल्हाबाहेरील २ रुग्णांचा समावेश आहे. मृतांमध्ये शहर व ग्रामीणमध्ये प्रत्येकी एक तर जिल्हाबाहेरील २ मृत्यू आहे. आज २२५ रुग्ण बरे झाले. कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या १,२९,९६१ झाली. सध्या ३,६३४ रुग्ण उपचाराखाली आहेत. यातील १०३९ रुग्ण रुग्णालयात, तर २,५९५ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहे.

-कारागृहात पुन्हा सहा पॉझिटिव्ह

मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असलेला कुख्यात डॉन अरुण गवळीसह पाच बंदिवान पॉझिटिव्ह आल्याने बुधवारी खळबळ उडाली. गुरुवारी त्यांच्या संपर्कातील १५ संशयितांची तपासणी केली असता आज सहा रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. यात ५ बंदिवान, तर एक कारागृहातील कर्मचारी आहे. शनिवारी यांच्या प्रकृतीची तपासणी मेडिकलमध्ये केली जाणार असल्याची माहिती आहे.

-तर दुकानदारांवर थेट कारवाई

दुकानांमध्ये होत असलेली गर्दी, मास्कचा होत नसलेला वापर व गायब झालेल्या सॅनिटायझरला मनपा आयुक्तांनी गंभीरतेने घेतले आहे. पोलीस प्रशासनाला सोबत घेऊन ‘न्यूसेंस डिटेक्शन स्क्वॉड’ ला (एनडीएस) थेट कारवाईचे निर्देश दिले.

-भाजी, दूधविक्रेत्याची नियमित तपासणी

भाजी, दूधविक्रेत्यांसह, दुकानदार, घर कामगार दिवसभरात अनेकांच्या संपर्कात येतात. यामुळे खबरदारी म्हणून आरोग्य विभागाला यांची नियमित तपासणी करण्याचेही निर्देश देण्यात आले. जनावरांच्या गोठ्यांची तपासणीसाठी वेगळे पथक तयार करण्यात येणार असल्याचीही माहिती मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी दिली.

-दैनिक चाचण्या : ४,५०६

-बाधित रुग्ण : १,३७,८१४

_-बरे झालेले : १,२९,९६१

- उपचार घेत असलेले रुग्ण : ३,६३४

- मृत्यू : ४,२१९

Web Title: Corona's new 'hotspot' of nine settlements

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.