Corona Virus in Nagpur: The number of corona viruses free in Nagpur is higher than the number of infected | CoronaVirus in Nagpur : नागपुरात बाधितांच्या तुलनेत कोरोना मुक्तांची संख्या अधिक

CoronaVirus in Nagpur : नागपुरात बाधितांच्या तुलनेत कोरोना मुक्तांची संख्या अधिक

ठळक मुद्दे३६ रुग्णांचा गेला जीव : १,०३१ रुग्ण पॉझिटिव्ह, १,१९७ रुग्ण बरे

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाबाधितांचा वेग मागील १२ दिवसांपासून मंदावला आहे. यातच रोजच्या बाधितांच्या तुलनेत कोरोनामुक्तांची संख्याही अधिक राहू लागली आहे. परिणामी, आरोग्य यंत्रणेला काहीसा दिलासा मिळाला आहे. गुरुवारी १,०३१ नव्या रुग्णांची नोंद तर १,१९७ रुग्ण बरे झाले आहेत. मृत्यूच्या संख्येतही घट आली आहे. आज ३६ रुग्णांचे मृत्यू झाले. रुग्णांची एकू ण संख्या ७९,०४३ तर मृतांची संख्या २,५४६ वर पोहचली आहे.
नागपूर जिल्ह्यात ६,३०० रुग्णांच्या कोविड चाचण्या करण्यात आल्या. यात शहरातील ३,२५५ तर ग्रामीणमध्ये ३८९ रुग्णांची आरटीपीसीआर चाचणीत ६५८ रुग्ण पॉझिटिव्ह आले. तर रॅपिड अ‍ॅन्टिजेन चाचणी शहरातील १,९८८ तर ग्रामीणमध्ये ६६८ रुग्णांची करण्यात आली. या चाचणीत ३७३ रुग्ण पॉझिटिव्ह तर २,२८३ रुग्ण निगेटिव्ह आले. आज बाधित आलेल्या रुग्णांमध्ये ७०८ रुग्ण शहरातील, ३२० रुग्ण ग्रामीणमधील तर तीन रुग्ण जिल्ह्याबाहेरील आहेत. मृतांमध्ये शहरातील २९, ग्रामीणमधील चार तर जिल्ह्याबाहेरील तीन मृतांचा समावेश अहे. आतापर्यंत ६३,६६४ रुग्ण बरे झाले आहेत. याचे प्रमाण ८०.५५ टक्के आहे.

चाचण्यांची संख्या कमी, तरी ३० तासानंतर रिपोर्ट
शहरात पाच शासकीय व चार खासगी प्रयोगशाळा असताना आणि महानगरपालिकेने प्रत्येक झोनमध्ये चाचणी केंद्र सुरू केले असतानाही चाचण्यांची संख्या वाढलेली नाही. यातच आजपासून १२ फिरत्या बसेसमधून कोविडची चाचणीला सुरुवात झाली. परंतु याचा फारसा प्रभावही दिसून आलेला नाही. विशेष म्हणजे, अलीकडे रोज १००० रुग्णांची भर पडत असताना त्यांच्या संपर्कातील किमान आठ संशयितांची तपासणी होणे गरजेचे आहे. परंतु तसे होताना दिसून येत नाही. शिवाय, मागील आठवड्यापासून रुग्णांना नमुन्यांचा रिपोर्ट मिळण्यास तब्बल ३० तासांचा वेळ लागत आहे.

मेयो, मेडिकलमध्ये मृतांचा आकडा हजारावर
मार्च महिन्यापासून नागपूर जिल्ह्यात कोरोनाच्या प्रादुर्भावाला सुरुवात झाली. एप्रिल महिन्यात पहिल्या कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू मेयो रुग्णालयात झाला. तेव्हापासून मृत्यूचे सत्र सुरू झाले. या सात महिन्याच्या कालावधीत मेयो, मेडिकलमध्ये मृतांचा आकडा हजारावर गेला आहे. मेयोमध्ये १०१४ तर मेडिकलमध्ये १,१११ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. एम्समध्ये ११ मृत्यू झाले आहेत.

कोरोनाची आजची स्थिती
दैनिक संशयित : ६,३००
बाधित रुग्ण : ७९,०४३
बरे झालेले : ६३,६६४
उपचार घेत असलेले रुग्ण : १२,८३३
मृत्यू :२,५४६

Web Title: Corona Virus in Nagpur: The number of corona viruses free in Nagpur is higher than the number of infected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.