CoronaVirus in Nagpur :नागपुरात कोरोनाचा ब्लास्ट, १९ रुग्ण पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2020 00:07 IST2020-04-25T23:16:05+5:302020-04-26T00:07:43+5:30
पहिल्यांदाच नागपुरात एकाच दिवशी १९ रुग्णांची नोंद झाल्याने खळबळ उडाली. एकट्या वानाडोंगरी अलगीकरण कक्षातील १७ रुग्ण आहेत. यात १० पुरुष तर सात महिलांचा समावेश आहे. तर उर्वरीत दोन आमदार निवास व वनामती येथील आहेत. या रुग्णांसह नागपुरात रुग्णांची संख्या १२४ वर पोहचली आहे.

CoronaVirus in Nagpur :नागपुरात कोरोनाचा ब्लास्ट, १९ रुग्ण पॉझिटिव्ह
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पहिल्यांदाच नागपुरात एकाच दिवशी १९ रुग्णांची नोंद झाल्याने खळबळ उडाली. एकट्या वानाडोंगरी अलगीकरण कक्षातील १७ रुग्ण आहेत. यात १० पुरुष तर सात महिलांचा समावेश आहे. तर उर्वरीत दोन आमदार निवास व वनामती येथील आहेत. या रुग्णांसह नागपुरात रुग्णांची संख्या १२४ वर पोहचली आहे. गेल्या दीड महिन्यात हा रुग्ण संख्येचा उच्चांक आहे. हे सर्व रुग्ण सतरंजीपुऱ्यातील रहिवासी आहेत. सतरंजीपुरा नागपुरात हॉटस्पॉट ठरला आहे. या वसाहतीतील कोरोनाबाधित मृत व त्यांच्या नातेवाईकांच्या संपर्कात आलेल्या ३० घरातील १५० लोकांना २३ एप्रिल रोजी क्वारंटाइन केले. यातील १२६ संशयितांना वानाडोंगरी येथील समाजकल्याणच्या शासकीय वसतिगृहात क्वारंटाइन करण्यात आले. २४ मार्च रोजी मेडिकलच्या पथकाने या सर्वांचे नमुने घेऊन तपासणीसाठी पाठविले. शनिवारी रात्री यातील १७ नमुन्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. या शिवाय, इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेयो) विषाणू निदान प्रयोगशाळेत आज पहिल्या फेरीत ३० नमुने तपासण्यात आले. यात सतरंजीपुरा येथील २४ वर्षीय पुरुष पॉझिटिव्ह आला. पाच दिवसांपूर्वी या रुग्णाला संशयित म्हणून वनामती येथे दाखल करण्यात आले होते. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या (एम्स) प्रयोगशाळेने ५५ नमुने तपासले. यात यवतमाळ जिल्ह्यातील १९ तर नागपुरातील एक नमुना पॉझिटिव्ह आला. नागपुरातील ४० वर्षीय हा रुग्ण मोमीनपुरातील रहिवासी आहे. या रुग्णालही पाच दिवसांपूर्वी आमदार निवासात क्वारंटाइन करण्यात आले होते. १९ रुग्णाने नागपुरात रुग्णांची संख्या १२४ वर पोहचली आहे. यातील २२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.-वानाडोंगरी ते पाचपावली पोलीस क्वार्टरवानाडोंगरी अलगीकरण कक्षाला स्थानिक नागरिकांसह आमदारांनी विरोध केला. यामुळे जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी येथील १२६ संशयितांना शनिवारी पाचपावली पोलीस क्वार्टरमध्ये दाखल केले. रात्री यातील १७ संशयित पॉझिटिव्ह आल्याने प्रशासनामध्येही खळबळ उडाली आहे. या रुग्णामध्ये १० पुरुष व सात महिला आहेत. २९, ४२, १९, २७, १८, ३९, ५२, ७९, २५, २५, ४५, २५, ३२, १८, ४०, ५५ व ३५ वयोगटातील रुग्ण आहेत. सुत्रानूसार, शनिवारी रात्री यांच्या जेवणाची सोय झाली नसल्याने येथे तणावाचे वातावरण होते.
२०४३ नमुन्यांची तपासणीकोरोनाचा प्रादूर्भावाला आत दीड महिन्यावर कालावधी होत आहे. परंतु विदर्भात नागपूरसह अमरावती, यवतमाळ, बुलढाणा, अकोला, वाशिम व गोंदिया या सातच जिल्हात कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहे. या जिल्हामधून आलेल्या नमुन्यांची तपसणी नागपुरातील मेयो, मेडिकल, एम्स, निरी व माफसू विद्यापीठाच्या प्रयोगशाळेत होत आहे. आतापर्यंत येथे एकूण २०४३ नमुन्यांची तपासणी करण्यात असून २०७ पॉझिटिव्ह रुग्ण वगळात १८३६ नमुने निगेटिव्ह आले आहेत.
८१ संशयित घरीसंस्थात्मक अलगीकरणात सर्वाधिक रुग्ण सतरंजीपुरा, मोमीनपुरा, टिमकी, भालदारपुरा, शांतीनगर याच भागातील आहेत. सध्या ६५५ संशयित या अलगीकरणात दाखल आहे. यातील ८१ संशयितांचे नमुने १४ दिवसानंतर निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी पाठविण्यात आले. पुढील १४ दिवस ते होम क्वारंटाइन राहतील.
कोरोनाविषयक माहितीसाठी ‘एम्स’चा हेल्पलाइन नंबरकोरोनाविषयक माहिती, प्राथमिक स्तरावर मानसोपचार तज्ज्ञाचा सल्ला, तणावाचे व्यवस्थापन आणि आजाराच्या मार्गदर्शनासाठी ‘एम्स’ने हेल्पलाइन नंबर उपलब्ध करून दिला आहे. ‘९४०४०४४९४४’ हा क्रमांक २४बाय ७ लोकांच्या सेवेत असणार आहे.
कोरोनाची आजची स्थिती
दैनिक संशयित ८८
दैनिक तपासणी नमुने २००
दैनिक निगेटिव्ह नमुने १७९
नागपुरातील पॉझिटिव्ह नमुने १२४
नागपुरातील मृत्यू ०१
डिस्चार्ज केलेले पॉझिटिव्ह रुग्ण २२
डिस्चार्ज केलेले संशयित रुग्ण १२६७
कॉरन्टाईन कक्षात एकूण संशयित ६५५
पीडित-१२४-दुरुस्त-२२-मृत्यू-१