Corona virus: Gadkari takes initiative about remedisivir injection in nagpur | Corona Virus : गडकरींनी घेतला पुढाकार, नागपुरात रेमडीसिवीरचे 10 हजार डोस येणार

Corona Virus : गडकरींनी घेतला पुढाकार, नागपुरात रेमडीसिवीरचे 10 हजार डोस येणार

नागपूर : राज्यातील अनेक जिल्ह्यात रेमडेसिविर इंजक्शनचा तुटवडा जाणवत असल्याने रुग्णांच्या नातेवाईकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. महाराष्ट्राची उपराजधानी असेलल्या नागपूर शहरात निर्माण झालेली रेमडीसिविर इंजेक्शनची टंचाई संपविण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुढाकार घेतला आहे. नागपूरकरांना सन फार्मातर्फे या इंजेक्शनचे दहा हजार डोजेस लवकरच उपलब्ध करुन दिले जाणार आहेत. 

गडकरी यांनी शनिवारी रेमडेसिविर उत्पादक सन फार्मा कंपनीचे मालक दिलीप सांघवी यांच्याशी दूरध्वनीवर बोलणे केले आणि नागपुरात निर्माण झालेली परिस्थिती सांगून, रेमडेसिविर इंजेक्शन्स तातडीने उपलब्ध करुन देण्याचे आवाहन केले. संघवी यांनी गडकरी यांच्या आवाहनाला लगेच प्रतिसाद दिला आणि लागलीच ५ हजार डोजेस नागपुरात उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच, उर्वरित ५ हजार डोजेस येत्या दोन ते तीन दिवसांत पाठवले जातील, असेही स्पष्ट केले. 

गडकरींचे नागपूरकरांना आवाहन

नागपूरकरांनी कोरोनावर नियंत्रण मिळण्यासाठी सहकार्य करावे. सोशल डिस्टन्सिंग, मास्क घालणे, वारंवार हात धुणे या गोष्टींची सवय लावून घ्यावी. गरज नसेल, त्या लोकांनी अजीबात बाहेर पडू नये. घबराट पसरेल, असे कोणतेही कृत्य करु नये व डॉक्टरांचाच सल्ला ऐकावा, असे आवाहन गडकरी यांनी केले आहे.

नाशिकमध्ये रुग्णांचे नातेवाईक रस्त्यावर

नाशिक शहरात कोरोना बधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे परंतु रेमडीसीवर इंजेक्शन मिळत नसल्याने नातेवाईक गेल्या चार ते पाच दिवसांपासून वणवण भटकत आहेत. जिल्हा प्रशासनाने रुग्णालयात इंजेक्शन पुरवण्याचे नियोजन केले असले तरी प्रत्यक्षात डॉक्टर रुग्णांना इंजेक्शन आणण्यासाठी पाठवत आहेत. त्यामुळे निवडक मेडिकल दुकानांसमोर सकाळ पासून रात्री उशिरापर्यंत रांगा लागत आहेत. अन्न आणि औषध प्रशासनाने दिलेले हेल्पलाईन नंबरही कोणी उचलत नाही, त्यामुळे संतप्त नागरिकांनी आता महात्मा गांधी रोडवर आंदोलन सुरू केले आहे.
 

Web Title: Corona virus: Gadkari takes initiative about remedisivir injection in nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.