नागपूरच्या मनोरुग्णालयातही कोरोनाचा शिरकाव; महिला रुग्णाला लागण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2020 11:23 IST2020-08-06T11:23:01+5:302020-08-06T11:23:20+5:30
नागपूरच्या प्रादेशिक मनोरुग्णालयातील एका महिला रुग्णाला कोरोनाचे निदान झाल्याने खळबळ उडाली.

नागपूरच्या मनोरुग्णालयातही कोरोनाचा शिरकाव; महिला रुग्णाला लागण
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ठाणे येथील प्रादेशिक मनोरुग्णालयात दोन रुग्णांचा कोरोनाच्या संसर्गाने मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना नागपूरच्या प्रादेशिक मनोरुग्णालयातील एका महिला रुग्णाला कोरोनाचे निदान झाल्याने खळबळ उडाली. या महिलेची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. मनोरुग्णालयात कोरोनाचा शिरकाव झाल्याने खबरदारी म्हणून बुधवारी मनोरुग्णालयातील १०० वर मनोरुग्ण, कर्मचारी, परिचारिका व डॉक्टरांची तपासणी करण्यात आली.
अनोळखी मनोरुग्ण म्हणून ६० वर्षीय या महिलेला १३ जानेवारी रोजी नागपूरच्या मनोरुग्णालयात पोलिसांनी दाखल केले. उपचारानंतर तिच्यात बराच सुधार झाला. रुग्णालय प्रशासनाने तिला घरी सोडण्याचा निर्णय घेतला. तिने सांगितलेल्या गोरखपूर येथील पत्त्यावरील नातेवाईकांशी संपर्क साधण्यात आला. नातेवाईक मार्च महिन्यात तिला घेऊन जाणार होते, परंतु याच दरम्यान लॉकडाऊन लागले. यामुळे ती रुग्णालयातच राहिली.
गेल्या काही दिवसापासून तिची प्रकृती खालावली होती. आजाराचे निदान करण्यासाठी २४ जुलै रोजी महिलेला मेडिकलमध्ये पाठविण्यात आले. साधारण दोन तास मेडिकलमध्ये होती. येथेच तिला कोरोनाची लागण झाली असावी, अशी शंका उपस्थित केली जात आहे. मेडिकलच्या डॉक्टरांनी जाँडिस असल्याचे निदान करीत पुन्हा मनोरुग्णालयात पाठविले. रुग्णालयात उपचार सुरू असताना ३ आॅगस्ट रोजी तिची प्रकृती ढासळली. पुन्हा मेडिकलमध्ये दाखल केले. येथील डॉक्टरांनी तिची लक्षणे पाहत कोविडची चाचणी केली. मंगळवारी रात्री उशिरा अहवाल पॉझिटिव्ह येताच मनोरुग्णालय प्रशासन हादरले. मनोरुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. माधुरी थोरात यांनी तातडीने रुग्णाच्या संपर्कात आलेल्या महिला कर्मचारी, डॉक्टर, परिचारिका व काही रुग्ण असे १०० लोकांची बुधवारी चाचणी केली. यातील काही जणांना सात दिवसासाठी क्वारंटाईन केल्याचे डॉ. थोरात यांनी ‘लोकमत’ला सांगितले.