नागपूर मध्यवर्ती कारागृहातही कोरोनाचा शिरकाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2020 10:40 PM2020-06-30T22:40:35+5:302020-06-30T22:45:27+5:30

मध्यवर्ती कारागृहातील एका अधिकाऱ्यासह नऊ कर्मचारी मंगळवारी पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली. या रुग्णांसह नागपूर जिल्ह्यात ३३ रुग्ण पॉझिटिव्ह आले. रुग्णांची संख्या १५०५ वर पोहचली आहे.

Corona infiltrated Nagpur Central Jail too | नागपूर मध्यवर्ती कारागृहातही कोरोनाचा शिरकाव

नागपूर मध्यवर्ती कारागृहातही कोरोनाचा शिरकाव

Next
ठळक मुद्देएका अधिकाऱ्यासह नऊ कर्मचारी पॉझिटिव्ह : ३३ रुग्णांची नोंदरामदासपेठेत पुन्हा एक रुग्ण

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : मध्यवर्ती कारागृहातील एका अधिकाऱ्यासह नऊ कर्मचारी मंगळवारी पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली. या रुग्णांसह नागपूर जिल्ह्यात ३३ रुग्ण पॉझिटिव्ह आले. रुग्णांची संख्या १५०५ वर पोहचली आहे. रामदासपेठ येथून पुन्हा एक रुग्ण खासगी प्रयोगशाळेतून पॉझिटिव्ह आला. विशेष म्हणजे, आज मेयोमधून ७, एम्समधून १० तर मेडिकलमधून ४१ असे ५८ रुग्णांना सुटी देण्यात आली. मध्यवर्ती कारागृहातील एका कर्मचाऱ्याची २५ जूनपासून प्रकृती खालावली होती. २७ जून रोजी कर्मचाऱ्याला मेडिकलमध्ये भरती केले. कर्मचाऱ्याची लक्षणे पाहत कोविड चाचणी केली, असता २८ जून रोजी पॉझिटिव्ह अहवाल आला. यामुळे कारागृह अधीक्षकांच्या विनंतीवरून २९ जून रोजी कारागृहातच नमुने घेण्याची सोय करण्यात आली. यात कारागृह अधीक्षकांसह, अधिकारी व कर्मचारी अशा ३० जणांनी आपले नमुने दिले. यात आज नऊ पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले. यात एक पोलीस निरीक्षकासह शिपाई, हवालदार व कर्मचारी आहेत. तूर्तास तरी कुठल्याही कैद्याला कोविडची लागण झालेली नाही. विदर्भात आतापर्यंत केवळ अकोल्यात कैद्यांना कोविडची लागण झाली आहे. नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहातील अधीक्षक अनुपकुमार कुमरे म्हणाले, कारागृह हे गेल्या १ मेपासून लॉकडाऊन करण्यात आले आहे. यामुळे ‘टीम ए’ आणि ‘टीम बी’ अशी वर्गवारी करून २१-२१ दिवसाचा कालावधी निश्चित करून व्यवस्थापन करण्यात आले होते. त्यानुसार २६ जून रोजी माझ्यासह २१ लोकांच्या टीमने कारागृहाचा चार्ज घेतला. पॉझिटिव्ह आलेल्यांकडून तूर्तास तरी कुठल्या कैद्याला लागण झालेली नाही. तरीही खबरदारीचे उपाय घेतले जात आहे. पॉझिटिव्ह आलेले सर्व कर्मचारी जेल क्वॉर्टरमध्ये राहतात. यामुळे त्यांच्या कुटुंबाना क्वारंटाईन करण्यात आले आहे.
कामठी येथून पुन्हा आठ तर झिंगबाई टाकळी येथून एक रुग्ण
कामठी येथून आज पुन्हा आठ रुग्ण पॉझिटिव्ह आले. कामठी शहर व तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या २५ झाली आहे. यातील २० रुग्ण हॉस्पिटलमधील तर पाच सामान्य नागरिक आहेत. या शिवाय, मोमीनपुरा येथील पाच, मिनीमातानगर, टिमकी, झिंगाबाई टाकळी व रामटेक येथील प्रत्येकी एक रुग्ण पॅझिटिव्ह आला आहे. मेडिकलच्या प्रयोगशाळेतून नाईक तलाव-बांगलादेश येथील तीन रुग्ण, एम्सच्या प्रयोगशाळेतून नरखेड येथील एक तर खासगी प्रयोगशाळेतून रामदासपेठ येथील ४० वर्षीय रुग्ण पॉझिटिव्ह आला.

५८ रुग्णांना डिस्चार्ज
मेयोतून अमरावती, एसआरपीएफ कॅम्प हिंगणा, कामठी, गणेशपेठ व वर्धा येथील एक अशा सात रुग्णांना सुटी देण्यात आली. मेडिकलमधून ४१ रुग्णांना सुटी देण्यात आली. यात नाईक तलाव-बांगलादेश, लष्करीबाग, धंतोली, प्रेमनगर, खरबी, गणेशपेठ, चंद्रमणीनगर, इसासनी हिंगण रोड, त्रिमूर्तीनगर, पाचपावली येथील रुग्ण आहेत. एम्समधून १० रुग्णांना सुटी देण्यात आली. एकूण ५८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. १२३२ रुग्ण बरे झाले आहेत.

संशयित : १७८५
अहवाल प्राप्त : २४५००
बाधित रुग्ण : १५०५
घरी सोडलेले : १२३२
मृत्यू : २५

Web Title: Corona infiltrated Nagpur Central Jail too

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.