नागपुरात विमानाच्या उड्डाणांवर कोरोना संक्रमणाचे सावट; मंगळवारी केवळ १२ विमानांचेच आगमन-प्रस्थान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2022 22:39 IST2022-01-11T22:38:41+5:302022-01-11T22:39:27+5:30
Nagpur News कोरोना संक्रमण आणि कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनचे सावट विमानांच्या उड्डाणांवर पडले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर मंगळवारी येणारी सहा विमाने रद्द झाली.

नागपुरात विमानाच्या उड्डाणांवर कोरोना संक्रमणाचे सावट; मंगळवारी केवळ १२ विमानांचेच आगमन-प्रस्थान
नागपूर : कोरोना संक्रमण आणि कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनचे सावट विमानांच्या उड्डाणांवर पडले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर मंगळवारी येणारी सहा विमाने रद्द झाली. शिवाय तीन विमानांचे उड्डाण नागपुरातून होऊ शकले नाही. मंगळवारी नागपूर विमानतळावरून केवळ १२ विमानांचे आगमन झाले आणि तेवढ्याच विमानांनी प्रस्थान केले.
मंगळवारी रद्द झालेल्या उड्डाणांमध्ये इंडिगो एअरलाईन्सची सिक्स ई ६७५४/२४१ पुणे-नागपूर-पुणे, सिक्स ई २४२/९०९ पुणे-नागपूर-बेंगळुरू, सिक्स ई ७०७३/७०७४ अहमदाबाद-नागपूर-अहमदाबाद, गो फर्स्ट २६०१/१४१ मुंबई-नागपूर-मुंबई, २८३/५०१ पुणे-नागपूर-पुणे या विमानांचा समावेश होता. याशिवाय, सिक्स ई ४८६ बेंगळुरू, सिक्स ई १९८ दिल्ली-नागपूर आणि सिक्स ई ५०१४/५०६२ दिल्ली-नागपूर व सिक्स ई ७०७ नागपूर-लखनौ हे विमान रद्द झाले.
शारजाह फ्लाईटमध्ये संक्रमित नव्हते
मंगळवारी पहाटे ३.४५ वाजता एअर अरेबियाचे विमान जी ९-४१५ शारजाह-नागपूर केवळ ५९ प्रवाशांना घेऊन नागपूरला पोहोचले. तीन दिवसापूर्वी याच विमानातून १४ प्रवासी कोरोना संक्रमित आढळले होते. त्यानंतर रविवारी आलेल्या याच विमानातून एक प्रवासी संक्रमित आढळला होता. या विमानातून ५१ प्रवासी नागपूरला पोहोचले होते. मंगळवारच्या विमानात एकही प्रवासी संक्रमित आढळला नाही. नागपुरातून संचालित होत असलेल्या या एकमात्र आंतरराष्ट्रीय उड्डाणात कोरोना संक्रमणाची धास्ती प्रचंड दिसून येत आहे. लॉकडाऊनच्या पूर्वी शारजाह-नागपूर विमान कायम प्रवाशांनी भरून असायचे. मात्र, पावणेदोन वर्षानंतर सुरू झालेल्या या उड्डाणात प्रवाशांची संख्या अर्ध्यावर आली आहे.
...........