Corona fear is less in Nagpur | नागपुरात कोरोनाची दहशत होत आहे कमी

नागपुरात कोरोनाची दहशत होत आहे कमी

ठळक मुद्देगेल्या आठवड्यात ५,२४६ रुग्ण व १७१ मृत्यू : या आठवड्यात ३,६७१ रुग्ण व १४५ मृत्यू

लोकमत  न्यूज  नेटवर्क

नागपूर : कोरोनाची दहशत हळूहळू कमी होत असल्याचे मागील काही आठवड्याच्या आकडेवारी वरून दिसून येत आहे. सप्टेंबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात रुग्णांची संख्या १२,४०३ व मृतांची संख्या ३५८ वर गेली होती, तर ऑक्टोबर महिन्याच्या या आठवड्यात रुग्णांची संख्या ३,६७१ तर मृतांची संख्या १४५वर आली आहे. एकूणच मागील तीन आठवड्यात ८,७३२ रुग्ण व २१३ मृत्यूची घट झाली. आरोग्य यंत्रणेसाठी ही समाधानकारक बाब आहे.

कोरोनाचा पहिला रुग्ण मार्च महिन्यात दिसून आला. या महिन्यात १६ रुग्णांची नोंद झाली. एप्रिल महिन्यात १३८ रुग्ण व दोन मृत्यू, मे महिन्यात ५४१ रुग्ण व ११ बळी, जून महिन्यात १५०५ रुग्ण व १५ मृत्यू, जुलै महिन्यात ५,३९२ रुग्ण ९८ मृत्यू, ऑगस्ट महिन्यात २९,५५५ रुग्ण व ९१९ मृत्यू, तर सप्टेंबर ७८,०१२ रुग्ण व सर्वाधिक १,४०६ रुग्णांचे मृत्यू झाले. ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ५,२४६ रुग्ण व १७१ मृत्यू तर या आठवड्यात ३,६७१ रुग्ण व १३५ मृत्यूची नोंद झाली. यावरुन कोरोनाचा विळखा सैल होत असल्याचे चित्र आहे. परंतु गाफील राहू नका, पुढे हिवाळा आहे. थंडीच्या दिवसात विषाणू अधिक काळापर्यंत जिवंत राहत असल्याने अधिक काळजी घेणे व प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञाचे म्हणणे आहे.

रुग्ण बरे होण्याचा दर ४१ वरून ८८ टक्क्यांवर

सप्टेंबर महिन्याच्या सुरुतीला रुग्ण बरे होण्याचा दर ४१ टक्क्यांवर असताना आता तो ८८ टक्क्यांवर पोहचला आहे. आतापर्यंत शहरातील ६३,३६७ व ग्रामीणमधील १६,४८६ असे एकूण ७९,८५३ रुग्ण कोरोनामुक्त झाले. सध्या शहरातील ४३९३ व ग्रामीणमधील २६०३ असे एकूण ६९९६ रुग्ण उपचार घेत आहेत. रुग्णसंख्या दुपटीने वाढण्याचा दरही १०६ दिवसांवर गेला आहे.

 

आठवडा       रुग्ण           मृत्यू

१३ ते १९ सप्टें. १२,४०३       ३८८

२० ते २६ सप्टें. ८,४४२       ३३०

२७ सप्टें. ते ३ ऑक्टो. ६,६१३    २३९

४ ते १० ऑक्टो. ५२४६             १७१

११ ते १६ ऑक्टो. ३६७१           १४५

Web Title: Corona fear is less in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.