अंधांच्या आयुष्यात कोरोनामुळे दाटला अंधार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:06 IST2021-05-30T04:06:58+5:302021-05-30T04:06:58+5:30

नागपूर : वर्षभरापेक्षा अधिक काळापासून सर्वजण कोरोनाच्या संकटाचा सामना करीत आहेत. आधीपासूनच जगण्यासाठी संघर्ष सुरू असलेल्या अंधांच्या आयुष्यात तर ...

Corona causes darkness in the life of the blind! | अंधांच्या आयुष्यात कोरोनामुळे दाटला अंधार !

अंधांच्या आयुष्यात कोरोनामुळे दाटला अंधार !

नागपूर : वर्षभरापेक्षा अधिक काळापासून सर्वजण कोरोनाच्या संकटाचा सामना करीत आहेत. आधीपासूनच जगण्यासाठी संघर्ष सुरू असलेल्या अंधांच्या आयुष्यात तर या संकटाने पुन्हा भर घातली आहे. उपराजधानी नागपुरात केनिंगसारखी कामे करून सन्मानाने जगण्यासाठी आलेल्या या समाजघटकाचे हात काम करण्याऐवजी आता नाईलाजाने याचनेसाठी पुढे येत आहेत.

नागपूर जिल्ह्यात सुमारे ४० हजारांवर अंध व्यक्ती आहेत. यातील बहुतेक उपराजधानी नागपुरात कामानिमित्त आले आहेत. अनेक जण शासकीय-निमशासकीय कार्यालयांमध्ये केनिंगची कामे मोठ्या प्रमाणावर करतात. मात्र वर्षभरापासून कार्यालयांमध्ये प्रवेश नाही. प्लास्टिक खुर्च्यांचा वापर वाढल्याने हे काम म्हणावे तेवढे राहिलेले नाही. काही अंध रेल्वेमध्ये चणे, बिस्किट विकायचे. रेल्वे बंद असल्याने हे कामही हातचे गेले आहे. यामुळे अनेकांवर चक्क उपासमारीची वेळ आली आहे.

...

जिल्ह्यात २५० वर अंध पॉझिटिव्ह

पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत जिल्ह्यात जवळपास २५० च्यावर अंध व्यक्ती पॉझिटिव्ह आढळले. कुटुंबात सदस्यही अंध-अपंग असल्याने एकासोबत कुटुंबही बाधित झाले. उपचाराची प्रचंड गैरसोय झाली. मदतीला कुणी पुढे आले नसताना अंध, अपंगांनीच एकमेकांना रुग्णालयात पोहोचविण्यासारखी मदत केली.

...

(प्रतिक्रिया)

आधारही एकमेकांचाच!

आम्ही दोघेही पती-पत्नी केनिंगचे काम करायचो. पण लॉकडाऊनमुळे काम बंद पडले. उपजीविकेचा प्रश्न आला. अखेर ज्ञानज्योती अंध विद्यालयाचे सचिव लक्ष्मण खापेकर यांनी संस्थेच्या माध्यमातून धान्याची किट घरी पोहचविली.

- गोपाल कोत्रीवाल, हुडकेश्वर

..

आम्ही पती-पत्नी अंध आहोत. केनिंगचे काम करून भाड्याच्या घरात राहतो. आता हाताला काम नाही. भाडे द्यायलाही पैसा जवळ नाही. जगण्याचे हाल सुरू आहेत.

- मनोज सोनटक्के, कामठी

..

आंतरजातीय विवाह केला म्हणून वडिलांनी घराबाहेर काढले. अपंग पतीसोबत ऑनलाईन काम करून सुखाचा संसार करणार होतो. मात्र नेमके कोरोनाने स्वप्नांवर पाणी फेरले.

- संगीता साहू, मानेवाडा

...

कोट

राज्यातील अंध आज वाऱ्यावर आहेत. सरकारने अंध व्यक्तींना या काळात दरमहा तीन हजार रुपयाची मदत करावी. त्यांच्या उपचारासाठी स्पेशल वॉर्ड जाहीर करावा. रुग्णसेवा मिळावी.

- त्र्यंबक मोकासरे, अध्यक्ष, राष्ट्रीय विकलांग संस्था

...

Web Title: Corona causes darkness in the life of the blind!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.