कोरोनामुळे प्रवासी वाहतुकीला ब्रेक; घराघरात वाढली चारचाकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:08 IST2021-07-28T04:08:01+5:302021-07-28T04:08:01+5:30
नागपूर : गेल्या वर्षी २० मार्चनंतर देशात लॉकडाऊन लावल्यानंतर जवळपास चार महिने सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ठप्प होती. त्यानंतर, सरकारचे ...

कोरोनामुळे प्रवासी वाहतुकीला ब्रेक; घराघरात वाढली चारचाकी
नागपूर : गेल्या वर्षी २० मार्चनंतर देशात लॉकडाऊन लावल्यानंतर जवळपास चार महिने सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ठप्प होती. त्यानंतर, सरकारचे मार्गदर्शक तत्त्व आणि नियमांतर्गत वाहतूकसेवा सुरू झाली, पण प्रवासी संख्येच्या निर्बंधामुळे लोकांनी सार्वजनिक सेवेचा उपयोग टाळला. याशिवाय नोकरी, व्यवसाय आणि कामानिमित्त ये-जा करण्यासाठी, तसेच सहकुटुंब बाहेरगावी जाण्यासाठी लोकांचा कार खरेदीकडे ओढा वाढल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे.
नागपूर जिल्ह्यात कारच्या तुलनेत दुचाकीची सर्वाधिक विक्री होते. शहराच्या विस्तारासोबतच पाच वर्षांपासून कार विक्री वाढली आहे. दुचाकी व कार विक्रेते डॉ.पी.के. जैन म्हणाले, गेल्या वर्षी लॉकडाऊनमध्ये मार्चनंतर शोरूम बंद होत्या. त्यामुळे जून महिन्यापर्यंत विक्री झालीच नाही, याशिवाय शाळा आणि कॉलेज बंद असल्याने व सर्व शैक्षणिक व्यवस्था ऑनलाइनवर झाल्याने स्कूटरेटला मागणीच नव्हती, पण ग्रामीण भागात मोटारसायकलला मागणी वाढली. दसरा आणि दिवाळीत वर्ष २०१९च्या तुलनेत गेल्या वर्षी विक्रीला फटका बसला. दुचाकी आणि चारचाकी वाहनांची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांचे उत्पादन बंद असल्याने, ग्राहक आवडत्या गाडीच्या खरेदीसाठी थांबले. चार-चार महिने वेटिंग होते. या वर्षी जानेवारी महिन्यापासून चांगली बुकिंग येऊ लागली होती, पण या वर्षी मार्चच्या दुसऱ्या आठवड्यापासून पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या वाढल्यानंतर सरकारने लॉकडाऊन लावले. त्याचाही फटका वाहन विक्रीला बसला. मार्चच्या तिसऱ्या आठवड्यापासून मे महिन्यापर्यंत वाहन विक्री झालीच नाही. जून महिन्यापासून पुन्हा बाजारपेठा सुरू झाल्या. आता कुठे वाहन विक्रीने वेग पकडला आहे. जुलै महिन्यात चांगली विक्री होत आहे.
सरकारने तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता, दुकाने आणि शोरूमवर वेळेचे बंधन टाकले आहे. आता ४ वाजता शोरूम बंद कराव्या लागत आहे. त्यामुळे विक्रीवर बंधने आली आहेत. तसे पाहता, गेल्या वर्षी मार्चपासून आतापर्यंत वाहन विक्रीचा उद्योग व व्यवसाय मंदीतच आहे.
ऑटो चालक-टॅक्सी चालक त्रस्त :
शाळा आणि कॉलेज बंद असल्याने गेल्या वर्षी ऑटो बंद होते. कोरोना काळात कुटुंबाचा खर्च कसा चालवायचा, असा गंभीर प्रश्न होता. नातेवाइकांकडून उधार घेऊन घरखर्च चालविला. आता ऑटोला प्रवासी मिळणे कठीण झाले आहे. पेट्रोलचे दर वाढल्याने आणि प्रवासी योग्य भाडे देत नसल्याने ऑटो चालविणे परवडत नाही.
नरेश कांबळे, ऑटो चालक़
नोकरी सुटल्यानंतर दोन वर्षांपासून टॅक्सी कार चालवतो, पण गेल्या वर्षी कोरोनामुळे टॅक्सी बंद झाली. चार महिने टॅक्सी बंद असल्यामुळे बँकांचे हप्ते भरणे, शिवाय कुटुंबाचा खर्च चालविणे कठीण झाले. आता व्यवसाय सुरू झाला आहे, पण पूर्वीच्या तुलनेत प्रवासी मिळत नाहीत. त्यामुळे उत्पन्न कमी झाले आहे. टॅक्सीचा व्यवसाय महाग झाला आहे.
शैलेश वर्मा, टॅक्सी चालक.
म्हणून घेतली चारचाकी :
गेल्या वर्षी टॅक्सी कारवर प्रवासी संख्येची बंधने आली होती. ती आताही आहे. त्यामुळे बाहेरगावी वा सहकुटुंब प्रवासासाठी कार खरेदी केली आहे. त्यामुळे सुविधा झाली आहे. ५० ते ६० किमीचे अंतर स्वत:च्या कारने सहजरीत्या कापता येते, याशिवाय कुठलीही अडचण येत नाही. एक प्रकारे कार खरेदीनंतर प्रवासाची सोय झाली आहे.
संजय खानोरकर, खरेदीदार.
कोरोना काळात टॅक्सी कारवर बंधने होती. त्यामुळेच कार खरेदी केली. याशिवाय टॅक्सी कारचे दर मोठ्या प्रमाणात वाढले असून, परवडणारे नाही. थोड्या अंतरासाठी जास्त पैसे मोजावे लागतात, पण आता कारमुळे सहकुटुंब निवांतपणे प्रवास करता येतो. शहराचा विस्तार झाल्याने जास्त अंतरासाठी कारचा उपयोग होतो. कार फायद्याची आहे.
सत्यम बांगरे, खरेदीदार.
दुचाकी-चारचाकी विक्री वाढली :
२०१९
दुचाकी ९२,२७६
चारचाकी ३८,५३९
२०२०
दुचाकी ६८,८५२
चारचाकी २५,५९२
२०२१ (जुलै)
दुचाकी३८,१४६
चारचाकी१३,७२९
ऑटो-टॅक्सी कार विक्री घटली :
२०१९
ऑटो २,८२१
टॅक्सी कार १,९५३
२०२०
ऑटो १,९७२
टॅक्सी कार१,१०८
२०२१ (जुलै)
ऑटो ५३७
टॅक्सी कार ३८२