नागपूर : प्रादेशिक मनोरुग्णालयात पुन्हा १५ रुग्ण पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली. महिनाभरात कर्मचाऱ्यांसह ५४ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. चार भिंतीच्या आत असलेल्या मनोरुग्णांना कोरोनाची लागण होतेच कशी, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
मनोरुग्णालयात मार्च महिन्याच्या सुरूवातीला दोन क्लार्क पॉझिटिव्ह आले. त्यानंतर १३ मार्च रोजी ३२ वर्षीय महिला पॉझिटिव्ह आली. महिलेच्या संपर्कात आलेल्या रुग्णांची तपासणी केली असता सात रुग्णांना बाधा झाल्याचे आढळून आले. याच दरम्यान आणखी दोन कर्मचारी पॉझिटिव्ह आले. पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांना स्वतंत्र कक्षात ठेवून त्यांच्यावर उपचार केले जात होते. आठवडाभराच्या कालावधीनंतर गुरुवारपासून काही रुग्णांना लक्षणे आढळून आली. यामुळे ६० रुग्णांची तपासणी केली असता १५ रुग्ण पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत १७ कर्मचारी व ३७ मनोरुग्ण असे एकूण ५४ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. मनोरुग्णांमध्ये २४ पुरुष व १३ महिला आहेत. यातील १० मनोरुग्ण बरे झाले आहेत. दोन मनोरुग्णांवर मेडिकलमध्ये उपचार सुरू आहेत. सध्या मनोरुग्णालयातील कोविड वॉर्डात १८ पुरुष व पाच महिला उपचार घेत आहेत. सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. परंतु मनोरुग्णालयात कोरोनाच्या वाढत्या प्रकोपामुळे प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित केले जात आहे. या संदर्भातील उपाययोजनांबाबत आरोग्य विभागाच्या सहसंचालक डॉ. पद्मजा जोगेवार यांना मोबाईलवर संपर्क साधला असता त्यांचा फोन बंद होता.
मनोरुग्णांच्या लसीकरणासाठी प्रयत्न
मनोरुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. पुरुषोत्तम मडावी यांनी ‘लोकमत’ला सांगितले, मनोरुग्णांच्या लसीकरणासाठीचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठविला आहे. जे अनोळखी आहेत त्यांची जबाबदारी रुग्णालय प्रशासन घेईल. इतर रुग्णांच्या नातेवाईकांना याची माहिती देऊन त्यांच्याकडून परवानगी घेतली जाईल.
आवश्यक खबरदारी घेतली जात आहे
मनोरुग्णालयात रुग्णांना भेटण्यासाठी येणाऱ्या नातेवाईकांना व इतर लोकांना बंदी घातली आहे. ज्या रुग्णांना लक्षणे दिसून येतात त्यांना वॉर्डातीलच स्वंतत्र खोलीत ठेवून दुसऱ्या दिवशी त्यांची चाचणी केली जाते. पॉझिटिव्ह आल्यास त्यांना कोविड वॉर्डात पाठविले जाते. कोरोनाचा हा संसर्ग मेडिकलमध्ये उपचारासाठी पाठविल्या जाणाऱ्या रुग्णांकडून होत असावा, असा प्राथमिक अंदाज आहे.
-डॉ. पुरुषोत्तम मडावी
वैद्यकीय अधीक्षक, प्रादेशिक मनोरुग्णालय