कोरोनाग्रस्त कामगारांना ईएसआयसी हॉस्पिटलमध्ये उपचार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:07 IST2021-04-17T04:07:13+5:302021-04-17T04:07:13+5:30

नागपूर : बुटीबोरी पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत २५ हजारांपेक्षा जास्त कामगार कार्यरत असून ईएसआयसी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी त्यांच्या पगारातून दरमहा चार ...

Corona-affected workers are not treated at ESIC Hospital | कोरोनाग्रस्त कामगारांना ईएसआयसी हॉस्पिटलमध्ये उपचार नाही

कोरोनाग्रस्त कामगारांना ईएसआयसी हॉस्पिटलमध्ये उपचार नाही

नागपूर : बुटीबोरी पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत २५ हजारांपेक्षा जास्त कामगार कार्यरत असून ईएसआयसी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी त्यांच्या पगारातून दरमहा चार टक्के रक्कम कापली जाते. त्यातून २ कोटींपेक्षा जास्त रक्कम ईएसआयसीकडे जमा होते. पण कोरोना काळात कोरोनाग्रस्त कामगारांवर ईएसआयसीच्या हॉस्पिटलमध्ये सुविधांअभावी उपचार करण्यात येत नाहीत. त्यामुळे त्यांची स्थिती गंभीर असून अनेकांचा उपचाराअभावी मृत्यू झाल्याची माहिती आहे.

विदर्भातील कामगारांसाठी ईएसआयसीचे सोमवारीपेठ येथे एकमेव हॉस्पिटल आहे. पूर्वी येथे १५० बेड होते. त्यातील दोन वाॅर्ड बंद झाले असून आता ५० बेड उरले आहेत. एवढे बेड विदर्भातील ३ लाख कर्मचाऱ्यांसाठी आहेत. त्यांच्याकडून दरमहा १६ ते १८ कोटी रुपये जमा होतात. कामगारांची आर्थिक स्थिती चांगली नसून कोरोना आजार झाल्यास त्यांना खासगी हॉस्पिटलमध्ये भरती करण्यास सांगितले जाते. उपचाराचा खर्च स्वत: करावा लागतो. पण परतफेड करताना संपूर्ण पैसे त्यांना मिळत नाहीत. कोरोना काळात स्थिती आणखी गंभीर झाली आहे.

कामगारांना ईएसआयसीमध्ये सुविधा मिळाव्यात, अशी मागणी वर्ष २०१० पासून करण्यात येत आहे. व्हीआयए, बीएमए, एमआयए, केआयए या उद्योगांच्या संघटनांनी ही बाब दिल्लीतील मुख्यालयात नेण्यासह लेखी स्वरूपात मागण्या केल्या आहेत. ईएसआयसीचे वरिष्ठ अधिकारी व मंत्रिमंडळासमोर या समस्या ठेवण्यात आल्या आहेत. त्यानंतरही सुविधांचा अभाव आहे. बीएमएचे माजी उपाध्यक्ष प्रदीप राऊत म्हणाले, ईएसआयसीच्या मुंबई, अंधेरी, कांदिवली आणि दिल्ली, उत्तर प्रदेश, हरियाणा, केरळ, आंध्र प्रदेश या राज्यांतील हॉस्पिटलमध्ये कामगारांसाठी सर्वोत्तम सोई-सुविधा आहेत. संपूर्ण देशातील कामगारांच्या पगारातून होणा-या कपातीतून मिळणाऱ्या सुविधांसाठी एकसमान कायदा आहे. त्यानंतरही विदर्भातील कामगारांसोबत भेदभाव करण्यात येतो. गेल्यावर्षी आणि सध्या कोरोना काळात अनेक कामगारांचा जीव गेला आहे. विदर्भातील ३०० पेक्षा जास्त कामगार कोरोनाग्रस्त आहेत. त्यांना कोणत्याही सुविधा मिळत नाहीत. बुटीबोरीसाठी करण्यात आलेल्या घोषणांच्या आधारावर जर हॉस्पिटल तयार झाले असते तर विदर्भातील अनेक कामगारांचा जीव वाचला असता. ईएसआयसीच्या कामगारांना अन्य हॉस्पिटल दारातही उभे करीत नाहीत. तसेच करारबद्ध हॉस्पिटलही उपचार करीत नाहीत. बेड न मिळाल्याने अनेक कामगार घरीच उपचार करीत आहेत.

कामगारांना पूर्ण खर्च मिळावा

घरीच उपचार करणा-या कामगारांना उपचाराचा पूर्ण खर्च मिळावा, शिवाय त्यांना रेमडेसिविर इंजेक्शन उपचार करून द्यावे. लसीकरण व आरटी-पीसीआर टेस्ट प्रत्येक ईएसआयसी डिस्पेन्सरी व मोठ्या कंपन्यांमध्ये त्वरित सुरू कराव्या. शिवाय सोमवारीपेठ हॉस्पिटलमध्ये बंद असलेल्या दोन वाॅर्डात १०० बेडचे कोरोना हॉस्पिटल सुरू करावे. शिवाय कामगारांना भरती होण्यासाठी ईएसआयसीच्या टायअप हॉस्पिटलचे दर बदलावे, बुटीबोरी येथे हॉस्पिटलचे बांधकाम सुरू करावे, ईएसआयसीसोबत टायअप हॉस्पिटलची नवीन यादी घोषित करावी, बुटीबोरी एमआयडीसीसाठी दोन कार्डियाक अ‍ॅम्ब्युलन्स उपलब्ध कराव्या तसेच ईएसआयसीच्या अधिका-यांनी कोरोनाग्रस्तांच्या संपर्कासाठी फोन नंबरची यादी घोषित करण्याची मागणी कामगारांनी केली आहे.

१०० बेडेड कोरोना हॉस्पिटल सुरू करा

सोमवारीपेठ येथील ईएसआयसी हॉस्टिपलमध्ये कामगारांसाठी १०० बेड कोरोना वाॅर्ड सुरू करावे. अन्य हॉस्पिटलमध्ये उपचार केल्यास कामगारांना पूर्ण पैसे मिळावेत म्हणून ईएसआयसीने दर बदलवावेत. कोरोना हॉस्पिटल तयार करण्यासाठी मनपा व जिल्हाधिकाऱ्यांनी समोर यावे, असे अधिकाऱ्यांचे मत आहे. ही बाब गांभीर्याने घ्यावी.

प्रदीप खंडेलवाल, अध्यक्ष, बुटीबोरी मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीज असोसिएशन.

- बुटीबोरी एमआयडीसीमधून महिन्याला दोन कोटींचे योगदान

- विदर्भात ३ लाख तर बुटीबोरीत २५ हजार कामगार

- सोमवारीपेठ येथे १०० बेडेड कोरोना हॉस्पिटल सुरू करावे

- वर्ष २०१० पासून अद्ययावत हॉस्पिटल उभारण्याची मागणी

Web Title: Corona-affected workers are not treated at ESIC Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.