लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सरकारकडून थकलेले कोट्यवधींचे बिले तत्काळ अदा करण्याच्या मागणीसाठी राज्यभरातील सरकारी कंत्राटदारांनी मंगळवारी संविधान चौकात अनोखे 'भीक मागो' आंदोलन केले. या आंदोलनात विविध ४० संघटनांचे पदाधिकारी व सदस्य सहभागी झाले. त्यांनी हातात पाट्या, काळे झेंडे व कटोरे घेऊन भीक मागितली आणि सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या आंदोलनादरम्यान २१४० रुपये भीक म्हणून जमा झाले असून, हे पैसे मुख्यमंत्री सहायता निधीत देण्यासाठी डिमांड ड्राफ्टद्वारे बुधवारी पाठवले जाणार आहेत.
मंगळवारी सकाळी १० वाजल्यापासून कंत्राटदार संविधान चौकात जमा होऊ लागले. बहुतांश कंत्राटदारांनी काळ्या रंगाचे टी शर्ट किंवा शर्ट घातले होते. सर्वांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करून आंदोलनाची सुरुवात केली. त्यानंतर रस्त्याच्या कडेला रांगा लावून 'पैसे द्या, पैसे द्या-देवा भाऊ पैसे द्या' अशा घोषणा देत हाती कटोरे घेऊन भीक मागण्यात आली. या आंदोलनात विदर्भ कंत्राटदार संघटना, बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया बुटीबोरी, कॉन्ट्रॅक्टर अँड इंजिनिअर असोसिएशन (जिल्हा परिषद नागपूर), विदर्भ हॉट मिक्स कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन, इंडियन अन एम्प्लॉइड इंजिनिअर्स असोसिएशन नागपूर, ग्रामीण कॉन्ट्रॅक्टर वेलफेअर असोसिएशन अशा अनेक संघटनांनी सहभाग घेतला. आंदोलनानंतर कंत्राटदार प्रतिनिधींनी जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या मागण्यांचे निवेदनही दिले. आंदोलनात विदर्भकंत्राटदार संघटनेचे अध्यक्ष नितीन हडाके, सचिव नितीन साळवे, महाराष्ट्र कंत्राटदार महासंघाचे कार्याध्यक्ष संजय मैंद, नागपूर कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे अध्यक्ष सुबोध सरोदे, इंडियन अनएम्प्लॉइड इंजिनिअर्स असोसिएशनचे अध्यक्ष शाकिर अली प्रशांत मसुमारे, प्रवीण खोब्रागडे, ग्रामीण वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष अभिषेक गुप्ता यांच्यासह सुमारे एक हजारावर कंत्राटदार सहभागी झाले.
८९ हजार कोटी रुपयांची बिले थकीत
- राज्यात विविध शासकीय विभागांची सुमारे ८९ हजार कोटी रुपयांची बिले ठेकेदारांना मिळालेली नाहीत.
- यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाची ४६ हजार कोटी, जलजीवन मिशनची १८ हजार कोटी, जलसंधारणाची १९७०० कोटी, ग्रामविकास विभागाची ८६०० कोटी व नगरविकास विभागाची १७०० कोटी रुपयांची बिले प्रलंबित आहेत.
- बिले न मिळाल्याने सांगलीतील हर्षल पाटील यांनी आत्महत्या केली, तर वर्ध्याचे बाबा जाकीर यांनी १५ ऑगस्ट रोजी आत्मदहनाचा प्रयत्न केला होता. अशा घटनांमध्ये वाढ होण्याची भीती ठेकेदारांनी व्यक्त केली आहे.
मुंबईत तीव्र आंदोलनाचा इशारानागपूरमधील आंदोलनासोबतच विदर्भ व महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्येही हे आंदोलन एकाच वेळी पार पडले. आता जर सरकारने याची दखल घेतली नाही, तर पुढील तीव्र आंदोलन मुंबईत छेडण्यात येईल, असा इशारा कंत्राटदार संघटनांनी यावेळी दिला.