नागपुरात कंत्राटदाराने केले लैंगिक शोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2020 23:25 IST2020-10-30T23:23:35+5:302020-10-30T23:25:26+5:30
Contractor sexually exploited , crime news कंत्राटदार तरुणाने प्रेमपाशात ओढून लग्नाचे आमिष दिल्यानंतर अडीच वर्षे लैंगिक शोषण केले आणि नंतर लग्नास नकार दिला. त्यामुळे तरुणीने गिट्टीखदान ठाण्यात बलात्काराची तक्रार नोंदवली आहे.

नागपुरात कंत्राटदाराने केले लैंगिक शोषण
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कंत्राटदार तरुणाने प्रेमपाशात ओढून लग्नाचे आमिष दिल्यानंतर अडीच वर्षे लैंगिक शोषण केले आणि नंतर लग्नास नकार दिला. त्यामुळे तरुणीने गिट्टीखदान ठाण्यात बलात्काराची तक्रार नोंदवली आहे. नीलेश संजय रामटेके (वय ३१) असे या प्रकरणातील आरोपीचे नाव असून त्याचे वडील निवृत्त तहसीलदार असल्याचे समजते.
तरुणीच्या तक्रारीनुसार मार्च २०१८ मध्ये फेसबुकच्या माध्यमातून तरुणी आणि नीलेशची ओळख झाली. नीलेश अभियंता असून तो कंत्राटदारी करतो. काही दिवसांतच त्याने तरुणीला प्रपोज करून अमरावती मार्गावरच्या एका हॉटेलमध्ये नेले. तेथे हे दोघे दारू प्यायले. तरुणीने नंतर मैत्रिणीकडे सोडून मागितले असता नीलेशने तिला दारू जास्त झाल्याचे सांगून काटोल मार्गावरील वेलकम सोसायटीतील एका सदनिकेत नेले. तेथे पुन्हा हे दोघे दारू प्यायले अन् त्याने तिच्यासोबत रात्रभर शरीरसंबंध प्रस्थापित केले. शुद्धीवर आल्यानंतर या दोघांमध्ये वाद झाल्याने नीलेशने तिला लग्नाचे आमिष दाखवून गप्प केले. त्यानंतर हे दोघे वेगवेगळ्या ठिकाणी गेले. वारंवार त्यांच्यात शरीरसंबंध प्रस्थापित झाल्याने ती गर्भवती बनली. ते माहीत पडताच नीलेशने तिचा गर्भपात केला. त्यानंतरही या दोघांचे संबंध सुरळीत होते. अलीकडे तिने लग्नासाठी तगादा लावल्याचे पाहून नीलेश तिला टाळू लागला. त्याने गेल्या महिन्यात लग्नाला स्पष्ट नकार दिल्याने तरुणीने २९ सप्टेंबरला गिट्टीखदान ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी प्रदीर्घ चौकशी केल्यानंतर गेल्या आठवड्यात या प्रकरणी नीलेशविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला. आरोपी फरार असून पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात आहे.