नागपूर जिल्ह्यातील सावनेर उपविभागीय दंडाधिकाऱ्यांना अवमानना नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 22:12 IST2018-02-14T22:11:17+5:302018-02-14T22:12:33+5:30
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणात आदेशाचे पालन न झाल्यामुळे सावनेरच्या उपविभागीय दंडाधिकारी वर्षादेवी भोसले यांना अवमानना नोटीस बजावून २७ फेब्रुवारीपर्यंत स्पष्टीकरण सादर करण्याचे निर्देश दिलेत.

नागपूर जिल्ह्यातील सावनेर उपविभागीय दंडाधिकाऱ्यांना अवमानना नोटीस
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणात आदेशाचे पालन न झाल्यामुळे सावनेरच्या उपविभागीय दंडाधिकारी वर्षादेवी भोसले यांना अवमानना नोटीस बजावून २७ फेब्रुवारीपर्यंत स्पष्टीकरण सादर करण्याचे निर्देश दिलेत.
वाकीजवळील रिसॉर्टला ‘लॉजिंग व बोर्डिंग’ परवाना मिळण्यासाठी सावनेर उपविभागीय दंडाधिकाऱ्यांकडे अर्ज सादर करण्यात आला होता. परंतु, भविष्यात या रिसॉर्टचा चुकीच्या गोष्टींसाठी वापर होऊ शकतो असा संशय व्यक्त करून परवाना नाकारण्यात आला. त्यामुळे रिसॉर्टचे मालक रसपालसिंग मरास यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाने भविष्यात घडू शकणाऱ्या गोष्टींसाठी वर्तमान परिस्थितीत परवाना नाकारता येणार नाही असा निष्कर्ष नोंदवून उपविभागीय दंडाधिकाऱ्यांचा वादग्रस्त आदेश रद्द केला होता. तसेच, याचिकाकर्त्याच्या परवाना देण्यासह सर्व मागण्या मंजूर केल्या होत्या. त्यामुळे उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी रिसॉर्टला परवाना देणे आवश्यक होते. परंतु, त्यांनी परवाना दिला नाही. परिणामी, मरास यांनी न्यायालयात अवमानना याचिका दाखल केली आहे. याचिकेवर न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांच्यासमक्ष सुनावणी झाली. याचिकाकर्त्यातर्फे अॅड. शशिभूषण वाहणे व अॅड. रसपालसिंग रेणू यांनी कामकाज पाहिले.