भिन्न संस्कृतीत सेतू बांधण्याचे काम अनुवादानेच शक्य

By Admin | Updated: May 31, 2014 01:05 IST2014-05-31T01:05:07+5:302014-05-31T01:05:07+5:30

अनेक ठिकाणी वेगवेगळ्या संस्कृती आणि परंपरा अस्तित्वात आहेत. प्रत्येक संस्कृतीचा कस घेऊनच तेथली भाषा जन्माला येते. संबंधित संस्कृतीची अभिव्यक्तीही भाषेच्याच माध्यमातून होत असते.

The construction of bridges in different cultures is possible only through translation | भिन्न संस्कृतीत सेतू बांधण्याचे काम अनुवादानेच शक्य

भिन्न संस्कृतीत सेतू बांधण्याचे काम अनुवादानेच शक्य

रामप्रकाश सक्सेना : ‘बुजगावणे आणि इतर व्यंग लेख’ पुस्तकाचे प्रकाशन
नागपूर : अनेक ठिकाणी वेगवेगळ्या संस्कृती आणि परंपरा अस्तित्वात आहेत. प्रत्येक संस्कृतीचा  कस घेऊनच तेथली भाषा जन्माला येते. संबंधित संस्कृतीची अभिव्यक्तीही भाषेच्याच माध्यमातून  होत असते. संस्कृतीचा मूळ आधारबिंदू आणि संस्कृती प्रवाही ठेवण्याचे कार्यही भाषेच्या  माध्यमातूनच होत असते. प्रत्येकाला प्रत्येक भाषा येत नाहीत. पण एखाद्या संस्कृतीची माहिती  आणि ज्ञान करून घेण्यासाठी अनुवादित साहित्य म्हणजे भिन्न संस्कृती आणि परंपरा यातला सेतूच  असतो, असे मत सुप्रसिद्ध ज्येष्ठ साहित्यिक डॉ. रामप्रकाश सक्सेना यांनी व्यक्त         केले.
    विदर्भ साहित्य संघ आणि विसा बुक्स प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने शोभा उबगडे लिखित  ‘बुजगावणे आणि इतर व्यंग लेख’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. हे अनुवादित पुस्तक  होते. हा प्रकाशन समारंभ विदर्भ साहित्य संघाच्या सांस्कृतिक संकुलातील सभागृहात पार पडला.  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष मनोहर म्हैसाळकर तर प्रमुख अतिथी  म्हणून समीक्षक डॉ. प्रज्ञा आपटे, सेवानवृत्त विंग कमांडर अशोक मोटे, लेखिका शोभाताई उबगडे  आणि प्रकाशक विनोद लोकरे उपस्थित होते.
डॉ. सक्सेना म्हणाले, लेखिकेच्या विविध व्यंग लेखमालेतून एक वेगळा विचार त्यांनी मांडला  आहे. यातील व्यंग प्रातिनिधिक आणि सार्वत्रिक आहेत. त्यामुळेच हे पुस्तक अधिक वाचनीय झाले  आहे. साहित्याचा अनुवाद हा वैचारिक गतिमानतेचे निदर्शक आहे.
त्यामुळे एखाद्या संस्कृतीच्या स्थित्यंतराचे दर्शन होते.  सुप्रसिद्ध ज्योतिषी उमर खय्याम यांच्या  साहित्यकृतींना इंग्रजीत अनुवादित करण्यात आले तेव्हाच त्यांची जगात ओळख झाली; अन्यथा  त्यांची ओळखच झाली नसती. अनुवाद ही वैश्‍विकतेची व्यापक कृती आहे.
या अनुवादामुळे मला मराठी वाचकांपर्यंंंंत पोहोचता आले याचे समाधान वाटते, असे ते म्हणाले.  स्वभाषेबाबत अनास्था वाढत असून हिंदीला आजही राजभाषेचा दर्जा मिळत नसल्याची खंत त्यांनी  यावेळी व्यक्त केली.
शोभा उबगडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. डॉ. प्रज्ञा आपटे व सेवानवृत्त विंग कमांडर अशोक  मोटे यांनी पुस्तकावर भाष्य केले. प्रास्ताविक विनोद लोकरे यांनी तर कार्यक्रमाचे निवेदन श्‍वेता  शेलगावकर यांनी केले.  (प्रतिनिधी)

Web Title: The construction of bridges in different cultures is possible only through translation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.