संविधान प्रास्ताविका पार्क एप्रिल-२०२० पर्यंत उभारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2019 09:07 PM2019-11-26T21:07:17+5:302019-11-26T21:08:45+5:30

राज्यातील एकमेव असे संविधान प्रास्ताविका पार्क येत्या एप्रिल-२०२०च्या पूर्वी उभारले जाईल, एवढेच नाही तर १४ एप्रिलला त्याचे उद्घाटनही केले जाईल, असा विश्वास मंगळवारी या पार्कच्या भूमिपूजन समारंभात व्यक्त करण्यात आला.

Constitution Preamble Park to be set up by April 2020 | संविधान प्रास्ताविका पार्क एप्रिल-२०२० पर्यंत उभारणार

संविधान प्रास्ताविका पार्क एप्रिल-२०२० पर्यंत उभारणार

Next
ठळक मुद्देभूमिपूजन समारंभात निर्धार : सरकारकडून मिळाला २.५३ कोटींचा निधी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्यातील एकमेव असे संविधान प्रास्ताविका पार्क येत्या एप्रिल-२०२०च्या पूर्वी उभारले जाईल, एवढेच नाही तर १४ एप्रिलला त्याचे उद्घाटनही केले जाईल, असा विश्वास मंगळवारी या पार्कच्या भूमिपूजन समारंभात व्यक्त करण्यात आला. संविधान दिनाचे औचित्य साधून या पार्कचा पायाभरणी सोहळा पार पडला.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयाच्या प्रांगणात हे संविधान प्रास्ताविका पार्क उभारले जाणार आहे. दोन कोटी ५३ लाख रुपये खर्चाच्या या पार्कचा पायाभरणी समारंभ मंगळवारी माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि राजकुमार बडोले यांच्या उपस्थितीत कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांच्या हस्ते पार पडला. समारंभाच्या अध्यक्षस्थानी प्रास्ताविका पार्क समितीचे अध्यक्ष गिरीश गांधी होते. प्र-कुलगुरू डॉ. विनायक देशपांडे यांच्यासह पार्क समितीचे सदस्य आ. अनिल सोले, आ. प्रा. जोगेंद्र कवाडे, आ. प्रकाश गजभिये, माजी न्यायमूर्ती किशोर रोही, डॉ. पूरणचंद्र मेश्राम, डॉ. अनिल हिरेखण, डॉ. श्रीकांत कोमावार आणि नागपूर महानगर विकास प्रधिकरणच्या अधीक्षक अभियंता लीला उपाध्ये उपस्थित होते.
यावेळी चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, हे पार्क म्हणजे नागपूरच्या इतिहासातील नवे शिल्प असणार आहे. जगभरातील नागरिक दीक्षाभूमीवर नतमस्तक होण्यासाठी येतात. संविधान पार्कही तेवढेच भव्य असावे. राज्य सरकारकडून समितीने निधी मिळविला. यापुढेही आपले सहकार्य राहील, असे आश्वासन त्यांनी दिले.
राजकुमार बडोले म्हणाले, समाजात संवैधानिक मूल्ये रुजविण्यासाठी या पार्क ची संकल्पना आहे. सर्वांनीच सकारात्मकपणे निधीसाठी प्रयत्न केले. मुख्यमंत्री फडणवीस यांचेही पाठबळ यासाठी लाभले. न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधूता ही मूल्ये दृढ करण्यासाठी कार्य व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
गिरीश गांधी यांनी या पार्कच्या निर्मितीसाठी समितीने केलेल्या कार्याची माहिती दिली. पार्कच्या उभारणीसाठी शासनाने निधी दिला आहे. त्यामुळे पुतळा उभारणी आणि उर्वारित काम लवकर पूर्ण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कुलगुरू डॉ. काणे म्हणाले, विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने २०१६ मध्ये घेतलेल्या निर्णयाची पूर्तता आज होत आहे. विद्यापीठाच्या १२५ व्या जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या अनेक उपक्रमांपैकी हा एक उपक्रमाचा भाग आहे. संविधान हा देशाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला एक दागिना असून त्यात समान संधी, समान कायदा, न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधूता असे अनेक हिरे जडलेले आहेत. त्यांचा अभ्यास आणि दर्शन या पार्कमधून होणार आहे.
कार्यक्रमादरम्यान डॉ. अनिल हिरेखण यांनी संविधान गीत सादर केले. आभार कुलसचिव नीरज खटी यांनी मानले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिक, विद्यार्थी, प्राध्यापक उपस्थित होते.

असे असेल प्रास्ताविका पार्क
विधी महाविद्यालयाच्या प्रांगणात उभारल्या जाणाऱ्या या पार्कचे डिझाईन वास्तुशास्त्रज्ञ संदीप कांबळे यांनी केले आहे. पार्कच्या मध्यभागी सात फूट उंचीचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ब्रान्झचा पुतळा राहणार असून, त्यामागे संसद भवनाची प्रतिकृती राहणार आहे. प्रवीण गेडाम हे कंत्राटदार असून, एप्रिल २०२० पर्यंत या पार्कची उभारणी करण्याचे नियोजन आहे. साऊंड, व्हिडीओ, चित्र देखावे, प्रकाशयोजना असे या पार्कचे वैशिष्ट्य राहणार आहे.

Web Title: Constitution Preamble Park to be set up by April 2020

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.