सज्ञान महिलेने सहमतीने ठेवलेले शरीरसंबंध बलात्कार ठरत नाहीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2022 19:46 IST2022-02-18T19:43:38+5:302022-02-18T19:46:04+5:30
Nagpur News सज्ञान महिलेने स्वत:च्या सहमतीने शरीरसंबंध ठेवल्यास संबंधित पुरुषाला बलात्काराच्या गुन्ह्यात दोषी ठरवता येत नाही, असे सत्र न्यायालयाने एका प्रकरणावरील निर्णयात स्पष्ट करून संबंधित आरोपीला निर्दोष मुक्त केले.

सज्ञान महिलेने सहमतीने ठेवलेले शरीरसंबंध बलात्कार ठरत नाहीत
नागपूर : सज्ञान महिलेने स्वत:च्या सहमतीने शरीरसंबंध ठेवल्यास संबंधित पुरुषाला बलात्काराच्या गुन्ह्यात दोषी ठरवता येत नाही, असे सत्र न्यायालयाने एका प्रकरणावरील निर्णयात स्पष्ट करून संबंधित आरोपीला निर्दोष मुक्त केले. न्या. सुनील पाटील यांनी हा निर्णय दिला.
सागर चुन्नीलाल दडुरे असे आरोपीचे नाव असून, तो महादूला येथील रहिवासी आहे. खासगी नोकर असलेल्या सागरची शिक्षण घेत असताना फिर्यादी मुलीसोबत ओळख झाली होती. पुढे ते एकमेकांवर प्रेम करायला लागले. दरम्यान, त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला व भावनेच्या ओघात वारंवार शरीरसंबंध ठेवले. काही वर्षांनंतर सागरने कुटुंबीयांच्या विरोधामुळे फिर्यादीसोबत लग्न करण्यास नकार दिला. परिणामी, फिर्यादीने सागरविरुद्ध लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याची तक्रार नोंदविली होती.
न्यायालयात सागरचे वकील ॲड. आर. के. तिवारी यांनी फिर्यादीने सहमतीने शरीरसंबंध ठेवले होते व आरोपीने फसवणूक करण्याच्या उद्देशाने फिर्यादीला लग्नाचे आमिष दिले नाही, असा दावा केला. हा दावा गुणवत्ताहीन ठरवणारे पुरावे न्यायालयाला आढळून आले नाही. परिणामी, आरोपीला निर्दोष सोडण्यात आले.