काँग्रेसचा हल्लाबोल : गरीब, वंचितांचे शोषण हाच भाजपाचा ‘डीएनए’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2018 19:06 IST2018-10-01T19:04:19+5:302018-10-01T19:06:51+5:30
सेवाग्राम येथे गांधी जयंतीच्या मुहूर्तावर होत असलेल्या केंद्रीय कार्यकारी समितीच्या ऐतिहासिक बैठकीअगोदर काँग्रेसने केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. देशातील गरीब, अल्पसंख्याक, वंचित, महिला यांचे शोषण करणे हाच भाजपाचा ‘डीएनए’ आहे. इंग्रज शासनकर्ते व भाजपाचे राज्यकर्ते यांच्यात काहीच फरक नाही. इंग्रजांप्रमाणेच देशात अराजकतेचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे, असा आरोप काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केला.

काँग्रेसचा हल्लाबोल : गरीब, वंचितांचे शोषण हाच भाजपाचा ‘डीएनए’
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सेवाग्राम येथे गांधी जयंतीच्या मुहूर्तावर होत असलेल्या केंद्रीय कार्यकारी समितीच्या ऐतिहासिक बैठकीअगोदर काँग्रेसने केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. देशातील गरीब, अल्पसंख्याक, वंचित, महिला यांचे शोषण करणे हाच भाजपाचा ‘डीएनए’ आहे. इंग्रज शासनकर्ते व भाजपाचे राज्यकर्ते यांच्यात काहीच फरक नाही. इंग्रजांप्रमाणेच देशात अराजकतेचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे, असा आरोप काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केला.
‘यूपीए’च्या अध्यक्षा सोनिया गांधी, कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी, माजी पंतप्रधान डॉ.मनमोहनसिंग यांच्या उपस्थितीत सेवाग्राम येथे होणारी काँग्रेसची बैठक, शांती पदयात्रा व जाहीर सभेबाबत माहिती देण्यासाठी आयोजित पत्रपरिषदेदरम्यान ते बोलत होते. पत्रपरिषदेला प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, आ.विजय वडेट्टीवार, आ.यशोमती ठाकूर, प्रदेश प्रवक्ते सचिन सावंत, अतुल लोंढे प्रामुख्याने उपस्थित होते. महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त कॉंग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारी समितीची बैठक सेवाग्राम येथे होत आहे. महात्मा गांधी यांच्याच नेतृत्वात इंग्रज शासनाविरोधात रणशिंग फुंकण्यासाठी १४ जुलै १९४२ रोजी सेवाग्राम येथूनच ‘भारत छोडो’चा नारा देण्यात आला होता. आजची देशातील स्थिती लक्षात घेता त्याच भूमीतून जनविरोधी सरकारविरोधात ‘मुक्तिसंग्राम’ सुरू करण्यात येईल, असे रणदीप सुरजेवाला यांनी सांगितले. देश आज राजकीय, सामाजिक व आर्थिक संक्रमण काळातून जात आहे. इंग्रजांच्या शासन काळाप्रमाणे आज देशाची स्थिती आहे व राज्यकर्तेदेखील तशाच पद्धतीने वागत आहेत. इंग्रजांप्रमाणे देशातील आर्थिक स्रोतांना बाहेर पाठविले जात आहे, देशात फूट पाडली जात आहे, लोकतांत्रिक मूल्यांचे दमन होत आहे, काही मूठभर श्रीमंतांसाठी जनतेला दावणीला बांधण्यात येत आहे व सर्वात महत्त्वाचे म्हणजे विरोधात आवाज उचलणाऱ्यांचे तोंड दाबण्यात येत आहे, असा आरोप सुरजेवाला यांनी लावला.
विचारधारांचा संघर्ष सुरू राहील
हिंसेच्या विचारधारेवर चालणाऱ्या सध्याच्या शासनकर्त्यांकडून महात्मा गांधी यांचे नाव समोर करण्यात येत आहे. मात्र गांधी यांचे संस्कार मनात उतरावे लागतात. केवळ दिखावा करून काहीच होत नाही. काँग्रेसची विचारधारा ही अहिंसेवर आधारित आहे. देशात विचारधारांचा हा संघर्ष सुरूच राहील, असे सुरजेवाला म्हणाले.
संघ व पाकिस्तान एकमेकांना पूरक
यावेळी रणदीप सुरजेवाला यांनी सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांच्याबद्दल व्यक्ती म्हणून आदर असल्याचे मत व्यक्त केले. मात्र संघाची विचारधारा देश कधीच मान्य करणार नाही. पाकिस्तान व संघ दोघेही द्वेष पसरवितात, दोघेही हिंसेचे समर्थक आहे आणि फूट पाडण्यावर त्यांचा विश्वास आहे. अशा स्थितीत दोघेही एकमेकांना पूरक तर नाही ना, असा प्रश्न उपस्थित होत असल्याचे प्रतिपादन रणदीप सुरजेवाला यांनी केले.