सरपंच निवडणुकीत काँग्रेसची बाजी :  ६१ ग्रा.पं.मध्ये काँग्रेसचे सरपंच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 12:07 AM2021-02-12T00:07:21+5:302021-02-12T00:08:56+5:30

Sarpanch elections नागपूर जिल्ह्यात सरपंचपदाच्या निवडणुकीत काँग्रेससमर्थित पॅनलच्या उमेदवारांनी बाजी मारली आहे. जिल्ह्यात १२९ पैकी ६१ ग्रा.पं.वर काँग्रेससमर्थित पॅनलचे उमेदवार विजयी झाले आहेत.

Congress wins in Sarpanch elections: Congress Sarpanch in 61 villages | सरपंच निवडणुकीत काँग्रेसची बाजी :  ६१ ग्रा.पं.मध्ये काँग्रेसचे सरपंच

सरपंच निवडणुकीत काँग्रेसची बाजी :  ६१ ग्रा.पं.मध्ये काँग्रेसचे सरपंच

Next
ठळक मुद्दे ३५ ग्रा.पं.मध्ये भाजपचे सरपंच : १५ गावांत राष्ट्रवादीचा झेंडा

जितेंद्र ढवळे /लोकमत  न्यूज  नेटवर्क 
नागपूर : नागपूर जिल्ह्यात सरपंचपदाच्या निवडणुकीत काँग्रेससमर्थित पॅनलच्या उमेदवारांनी बाजी मारली आहे. जिल्ह्यात १२९ पैकी ६१ ग्रा.पं.वर काँग्रेससमर्थित पॅनलचे उमेदवार विजयी झाले आहेत. यासोबतच ३५ ग्रा.पं.मध्ये भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (१५), शिवसेना (३), वंचित बहुजन आघाडी (१), मनसे (१), तर सात ग्रा.पं.मध्ये महाविकास आघाडी समर्थित पॅनलचे उमेदवार सरपंचपदी विजयी झाले आहे. जिल्ह्यात दि. १५ जानेवारी रोजी निवडणूक झालेल्या १२९ ग्रा.पं.मध्ये सरपंच आणि उपसरपंचपदासाठी गुरुवारी निवडणूक झाली.
राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या काटोल मतदारसंघात काटोल तालुक्यात माळेगाव ग्रा.पं.च्या सरपंचपदी राष्ट्रवादीसमर्थित जया वानखेडे यांची वर्णी लागली. खंडाळा खुर्द येथे जनशक्ती पॅनेलच्या सुरेशा किशोर सय्याम, तर भोरगड येथे परिवर्तन पॅनलचे उमराव बकराम उईके यांनी सरंपच होण्याचा मान मिळाला आहे. खंडाळा (खुर्द) आणि भोरगड ग्रा.पं.वर भाजपने दावा केला. नरखेड तालुक्यात १७ पैकी १३ ग्रा.पं.मध्ये राष्ट्रवादीसमर्थित पॅनेलचे उमेदवार विजयी झाले आहे. येथे खैरगाव, पेठईस्लामपूर आणि मदना ग्रा.पं.चे सरपंचपद आरक्षित संवर्गातील उमेदवार नसल्याने रिक्त राहिले. उमठा ग्रा.पं.च्या सरपंचदी भाजपसमर्थित पॅनलचे प्रकाश पंजाबराव घोरपडे विजयी झाले.
पशुसंवर्धन आणि दुग्धविकासमंत्री सुनील केदार यांच्या सावनेर मतदारसंघातील कळमेश्वर तालुक्यात ५ ग्रा.पं.मध्ये काँग्रेससमर्थित उमेदवारांची सरपंचपदी वर्णी लागली. सावनेर तालुक्यात १२ पैकी ९ ग्रा.पं.मध्ये काँग्रसचे सरपंचपदाचे उमेदवार विजयी झाले. तीन ग्रा.पं.मध्ये आरक्षणानुसार उमेदवार नसल्याने सरपंच पदाची निवडणूक झाली नाही. या तिन्ही ग्रा.पं.मध्ये उपसरपंचपदी काँग्रेस समर्थित गटाच्या सदस्यांची वर्णी लागली आहे. केदार यांचे होमटाउन असलेल्या पाटणसावंगी येथे काँग्रेसच्या रोशनी ठाकरे यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाली.
उमरेड मतदारसंघात काँग्रेसचे आमदार राजू पारवे आणि भाजपचे नेते सुधीर पारवे यांनी ग्रा.पं.ची निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. उमरेड तालुक्यात सरपंचपदाच्या निवडणुकीत भाजपची कामगिरी दमदार राहिली. तालुक्यात निवडणूक झालेल्या १४ पैकी ११ ग्रा.पं.वर भाजप समर्थित गटाचे सरपंच विजयी झाले. काँग्रेसला केवळ तीन ग्रा.पं.मध्ये सरपंचपदासाठी संधी मिळाली. कुही तालुक्यात २४ पैकी १४ ग्रा.पं.मध्ये काँग्रेसचे, तर दहा ग्रा.पं.मध्ये भाजपचे सरपंच विजयी झाले आहेत.
भिवापूर तालुक्यात निवडणूक झालेल्या तीनपैकी दोन ग्रा.पं.मध्ये काँग्रेस समर्थित, तर एका ग्रा.पं.मध्ये भाजपसमर्थित गटाचे सरपंच विजयी झाले आहेत. पूल्लर येथे काँग्रेसचे हिरालाल राऊत आणि आलेसूर येथे दिलीप दोडके विजयी झाले. मोखाबर्डी ग्रा.पं.मध्ये भाजपाच्या रूपाली सोनटक्के यांनी बाजी मारली.
हिंगणा तालुक्यात निवडणूक झालेल्या पाच पैकी तीन ग्रा.पं.मध्ये महाविकास आघाडीचा, तर एका ग्रा.पं.मध्ये राष्ट्रवादीसमर्थित पॅनलचा उमेदवार विजयी झाला. तालुक्यातील सावंगी आसोला ग्रा.पं.च्या सरपंचपदी राष्ट्रवादीचे शेषराव नागमोते, तर दाभा ग्रा.पं.च्या सरपंचपदी भाजपसमर्थित शीला श्रावण मरपाची यांची वर्णी लागली.
पारशिवनी तालुक्यात दहा पैकी चार ग्रा.पं.मध्ये महाविकास आघाडीचे सरपंचपदाचे उमेदवार विजयी झाले आहेत. तालुक्यात तीन ग्रा.पं.मध्ये काँग्रेस, तर दोन ग्रा.पं.मध्ये शिवसेना समर्थित उमेदवार विजयी झाले आहेत. तालुक्यातील बोरी (सिंगारदीप) ग्रा.पं.चे सरपंच पद हे अनुसूचित जाती महिला करीता राखीव आहे. या प्रवर्गातील उमेदवार नसल्याने येथील सरपंचपद रिक्त राहीले. या तालुक्यात काही ग्रा.पं.मध्ये काँग्रेस,राष्ट्रवादी आणि शिवसेनने एकत्र निवडणूक लढविली होती. मौदा तालुक्यात ७ पैकी ५ ग्रा.पं.मध्ये काँग्रेससमर्थित गटाचे सरपंच विजयी झाले. दोन ग्रा.पं.मध्ये भाजापसमर्थित पॅनेलचे उमेदवार विजयी झाले. नागपूर ग्रामीण तालुक्यात ११ पैकी ७ ग्रा.पं.मध्ये काँग्रेस, ३ भाजप, तर एका ग्रा.पं.मध्ये वंचित बहुजन आघाडीला सरपंचपदी संधी मिळाली.

दवलामेटीत वंचित-काँग्रेसची आघाडी
नागपूर ग्रामीण तालुक्यात सर्वात मोठी ग्रा.पं. असलेल्या दवलामेटी येथे वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसने सरपंच आणि उपसरपंच पदाच्या निवडणुकीत आघाडी करीत भाजपाला धक्का दिला. १७ सदस्यीय असलेल्या या ग्रा.पं.त सरपंच पदाच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी समर्थित रिता प्रवीण उमरेडकर यांनी प्रतिस्पर्धी भाजप समर्थित पॅनेलचे गजानन रामेकार यांचा एक मताने पराभव केला. उमरेडकर यांना नऊ तर रामेकार यांना आठ मते मिळाली. उपसरपंच पदाच्या निवडणुकीत काँग्रेस समर्थित पॅनलचे प्रशांत केवटे यांनी भाजपाच्या उज्ज्वला भारत गजभिये यांचा पराभव केला. केवटे यांना नऊ तर गजभिये यांना आठ मते मिळाली. दवलामेटी ग्रा.पं.मध्ये वंचित आणि काँग्रेसने एकत्र येत सत्ता स्थापन केल्याने काही महिन्यांनी होणाऱ्या वाडी नगर परिषदेच्या निवडणुकीवर याचा प्रभाव पडेल, असे जाणकारांचे म्हणणे आहे. यापूर्वी दवलामेटी ग्रा.पं.वर भाजपाची सत्ता होती. ग्रा.पं.मध्ये वंचित आणि काँग्रेसला एकत्र आणण्यासाठी काँग्रेस नेते नाना गावंडे तर वंचितचे नेते राजू लोखंडे यांनी महत्त्वाची भूमिका वठविली.

कामठीत भाजपाचे वर्चस्व
कामठी तालुक्यात सरपंच आणि उपसरपंच पदाच्या निवडणुकीत भाजपाने बाजी मारली. येथे निवडणूक झालेल्या नऊपैकी सहा ग्रा.पं.वर भाजपा समर्थित गटाचे सरपंच आणि उपसरपंच विजयी झाले. काँग्रेस समर्थित गटाचा केवळ तीन गावात विजय झाला. भाजपाचे प्रदेश महामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे होमटाऊन असलेल्या कोराडी ग्रा.पं.च्या सरपंचपदी भाजपाचे नरेंद्र धानोले विजयी झाले.

बिनविरोेध आदासा येथे उपसरपंच पदासाठी निवडणूक
कळमेश्वर तालुक्यात पाचही ग्रा.पं.च्या सरपंचपदी काँग्रेस समर्थित उमेदवार विजयी झाले. तालुक्यात बिनविरोध निवडणूक झालेल्या सोनपूर (आदासा) ग्रा.पं.च्या सरपंचपदी काँग्रेसच्या नीतू सहारे बिनविरोध विजयी झाल्या. मात्र उपसरपंच पदाच्या निवडणुकीत येथे काँग्रेसचे दोन गट पडले. यात नीलेश कडू यांनी चेतन निंबाळकर यांचा एक मताने पराभव केला. कडू यांना पाच तर निंबाळकर यांना चार मते पडली.

सेनेच्या गडात काँग्रेसचे सरपंच, मनसेनेही उघडले खाते
शिवसेनाचा गड असलेल्या रामटेक मतदार संघातील नऊपैकी सात ग्रा.पं.मध्ये काँग्रेस समर्थित गटाचे सरपंच विजयी झाले आहेत. यासोबतच तालुक्यात पथरई ग्रा.पं.च्या सरपंचपदी मनसे समर्थित संदीप मनिलाल वासनिक विजयी झाले आहेत. मानापूर ग्रा.पं.मध्ये शिवसेना समर्थित संदीप मधुकर सावरकर यांची सरपंचपदी वर्णी लागली. जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या देवलापार ग्रा.पं.वर काँग्रेसने झेंडा फडकविला. येथे काँग्रेसच्या शाहिस्ता इलियाज खान पठाण यांची सरपंचपदी अविरोध निवड झाली. येथे १३ पैकी ११ जागांवर काँग्रेस समर्थित गटाचे सदस्य विजयी झाले आहेत. तालुक्यात दाहोदा ग्रा.पं.मध्ये आरक्षणानुसार उमेदवार नसल्याने सरपंचपदाच्या निवडणूक झाली नाही. येथे काँग्रेस समर्थित पॅनेलचे स्वप्निल सखाराम सर्याम उपसरपंचपदी विजयी झाले.

काँग्रेसचा ८३ तर भाजपाचा ७३ ग्रा.पं.वर दावा
सरपंचपदाच्या निवडणुकीनंतर राजकीय पक्षाकडून दावे-प्रतिदावे करण्यात आले. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक यांनी ८३ ग्रा.पं.मध्ये काँग्रेसचे तर भाजपाचे जिल्हाध्यक्ष अरविंद गजभिये यांनी ७३ ग्रा.पं.मध्ये भाजपाचे उमेदवार सरपंच झाल्याचा दावा केला आहे. या दोघांच्या दाव्यांची बेरीज १५६ इतकी होते. मात्र जिल्ह्यात प्रत्यक्षात १२९ ग्रा.पं.साठी निवडणुका झाल्या आहेत.

Web Title: Congress wins in Sarpanch elections: Congress Sarpanch in 61 villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.