काँग्रेस आघाडीवर; भाजप पिछाडीवर
By Admin | Updated: August 7, 2015 02:59 IST2015-08-07T02:59:12+5:302015-08-07T02:59:12+5:30
नागपूर जिल्ह्यात सर्वाधिक ५४ ग्रामपंचायतीवर काँग्रेस समर्थित पॅनलने विजय मिळविला. तर ४७ ग्रामपंचायतीवर भाजपला समाधान मानावे लागले.

काँग्रेस आघाडीवर; भाजप पिछाडीवर
१२३ पैकी ५४ वर काँग्रेसचा ताबा : ग्रामपंचायत निवडणुकीत मतदारांचे धक्कातंत्र
नागपूर : नागपूर जिल्ह्यात सर्वाधिक ५४ ग्रामपंचायतीवर काँग्रेस समर्थित पॅनलने विजय मिळविला. तर ४७ ग्रामपंचायतीवर भाजपला समाधान मानावे लागले. नागपूर जिल्ह्यातील १२३ पैकी सर्वाधिक ५२ ग्रामपंचायतीवर कब्जा मिळवित काँग्रेसने पुन्हा एकदा वर्चस्व सिद्ध करून दाखविले. ४९ ग्रामपंचायती भाजपच्या ताब्यात आल्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे १३ ग्रामपंचायती आल्या. तर सहावर शिवसेनेला समाधान मानावे लागले. तीन ग्रामपंचायतीमध्ये इतरांनी बाजी मारली.कळमेश्वरमधील पाचपैकी चार ग्रामपंचायतीवर काँग्रेस उमेदवारांचा विजय झाल्याने आ. सुनील केदार यांनी या भागावर पकड असल्याचे दाखवून दिले. तर विधानसभा निवडणुकीत पराभव होऊनही नव्या दमाने माजी मंत्री अनिल देशमुख यांनी काम केल्याने नरखेड आणि काटोलमध्ये सर्वाधिक ग्रामपंचायती राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आल्या. मात्र उमरेड विधानसभेत मात्र भाजपचे विद्यमान आ. सुधीर पारवे यांना मतदारांच्या रोषाला सामोरे जावे लागले. भिवापूर तालुक्यातील तीन ग्रामपंचायतीपैकी तिन्हीवर काँग्रेसने ताबा मिळविला. उमरेड व कुही तालुक्यातीलही बहुतांश ग्रामपंचायती काँग्रेसने काबिज केल्या.
जिल्ह्यात सर्वाधिक २४ ग्रामपंचायतीसाठी कुही तालुक्यात मतदान झाले. तेथील १८ ग्रामपंचायतींवर काँग्रेसने दावा केला आहे. तर सहा ग्रामपंचायती भाजपच्या ताब्यात आल्या असून १२ ग्रामपंचायतीवर दावा ठोकला आहे. एका ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी समर्थित पॅनलने विजय मिळविला. भिवापूर तालुक्यातील तीनपैकी तिन्ही ग्रामपंचायतीवर काँग्रेस समर्थित पॅनलने विजय मिळविला. तर उमरेडमध्ये १३ पैकी १० ग्रामपंचायतीवर काँग्रेस, तीनवर भाजपला यश मिळाले.
मौदा तालुक्यातील सातपैकी सर्वाधिक तीन ग्रामपंचायतीवर भाजप, दोनवर शिवसेना तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने प्रत्येकी एक ग्रामपंचायतीवर कब्जा केला. कामठी तालुक्यात नऊपैकी सहावर भाजप आणि तीनवर काँग्रेस, रामटेक तालुक्यातील नऊपैकी सहावर भाजप, एकवर काँग्रेस, दोन ग्रामपंचायतीवर शिवसेना समर्थित उमेदवारांचा विजय झाला. पारशिवनी तालुक्यातील १० पैकी चार ग्रामपंचायतीवर शिवसेना तर भाजप आणि काँग्रेसने प्रत्येकी तीन ग्रामपंचायतीवर झेंडा फडकावला. कळमेश्वरातील पाच पैकी चारवर काँग्रेस, भाजपला एक, नरखेडमध्ये भाजपला आठ, राष्ट्रवादीला सहा, सावनेरात भाजपला दोन, काँग्रेसला आठ ग्रामपंचायतीवर विजय मिळविता आला. तर एका ग्रामपंचायतीमध्ये त्रिशंकू स्थिती आहे. नागपूर ग्रामीण तालुक्यातील ११ ग्रामपंचायतींपैकी सहा भाजप, तीन काँग्रेस आणि शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्येकी एका ग्रामपंचायतीवर यश मिळाले. हिंगणा तालुक्यातील चार पैकी तीनवर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसला एक तसेच काटोल तालुक्यातील तीनपैकी तिन्ही ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेस समर्थित गटाने विजय प्राप्त केला.
ग्रामपंचायत निवडणूक पक्षाच्या तिकिटवर ही लढविली जात नसली तरी पक्षाशी समर्थित पॅनलद्वारे निवडणूक लढविली जाते. राजकारणाची ती पहिली पायरी समजल्या जाते. त्यामुळे अत्यंत प्रतिष्ठेची निवडणूक मानल्या जाणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीत शेवटच्या क्षणापर्यंत बरीच उलथापालथ होते. त्यातही सरपंचपदावर विराजमान होईपर्यंत कोणत्या ग्रामपंचायतवर कुणाचा ताबा आहे, हे स्पष्ट होऊ शकत नाही. तोपर्यंत केवळ दावा-प्रतिदावाच केला जातो. (जिल्हा प्रतिनिधी)
प्रस्थापितांना धक्का
विधानसभा निवडणुकीनंतर अत्यंत प्रतिष्ठेची निवडणूक म्हणून नेत्यांनी या निवडणुकीकडे लक्ष दिले. विधानसभेतील पराभव काँग्रेसच्या जिव्हारी लागल्याने पाया मजबूत करण्याकडे काँग्रेसने लक्ष दिले असून त्यासाठीच ग्रामपंचायत निवडणुकीकडे नेते लक्ष ठेवून होते. अनेक नेते निवडणूक असलेल्या गावी, तालुक्याच्या मुख्यालयी तळ ठोकून होते. त्याचाच परिणाम म्हणून या निवडणुकीत प्रस्थापितांना काँग्रेसने धक्के दिले. उमरेड उपविभागात कुही, उमरेड, भिवापूर हे तालुके येत असून या तालुक्यांचा उमरेड विधानसभा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात सर्वाधिक ग्रामपंचायतीवर काँग्रेस समर्थित गटाने ताबा मिळविला आहे. त्यामुळे या भागाचे आमदार सुधीर पारवे यांना जबर धक्का मतदारांनी दिला. काँग्रेसकडून माजी राज्यमंत्री तथा विद्यमान आ. राजेंद्र मुळक हे उमेदवारांपर्यंतच नव्हे तर मतदारांपर्यंत पोहोचल्याने हा परिणाम दिसला.
हिंगणा
तालुक्यातील एकूण चार ग्रामपंचायतीची निवडणूक झाली. मतमोजणी गुरुवारी होऊन त्यात तीन ग्रामंपचायतवर भाजप तर एका ग्रामपंचायतवर राष्ट्रवादी काँग्रेस समर्थित पॅनलने विजय मिळविला. खडकी, दाभा, सावंगी या ग्रामपंचायतीवर भाजपने तर किन्ही (धानोली) वर राष्ट्रवादी काँग्रेस - काँग्रेस समर्थित पॅनलने दावा केला आहे.
खडकी ग्रामपंचायतमध्ये प्रभाग क्र. १ मधून राजेंद्र सोमनकर, विद्या मरसकोल्हे, छाया कुनघाटकर, प्रभाग क्र. २ मधून शरद कोटनाके, योगेश वानखेडे, कविता मसराम, प्रभाग क्र. ३ मधून त्र्यंबक वरकाडे, मीना भगत, अर्चना धुर्वे यांनी विजय मिळविला.
किन्ही (धानोली) येथे प्रभाग क्र. १ मधून अरविंद भोले, स्वाती कठाणे, पंचफुला कंगाले, प्रभाग क्र. २ मधून विनोद उमरेडकर, प्रेमकला उइके, बेबी तिलपाले, प्रभाग क्र. ३ मधून सुधाकर भोपे, ताराचंद निघोट, अर्चना बोंदाडे यांनी विजय संपादन केला. सावंगी (आसोला) येथील प्रभाग क्र. १ मधून सतीश गोरले, पपिता मरसकोल्हे, सुशीला चाटे, प्रभाग क्र. २ मधून पितांबर बिराताल, नेहा गहरुले, मंगला राऊत, प्रभाग क्र. ३ मधून कोमल गहरुले, श्यामू राठोड, मनीषा खळतकर विजयी झाले.
दाभा ग्रामपंचायतच्या प्रभाग १ मधून वसंता चव्हाण, निशा उइके, नानी राठोड, प्रभाग २ मधून सुखराम राठोड, अंतकला सलाम, इंदू राऊत, प्रभाग ३ मधून रामदास मसराम, रामराव राठोड, मालू पाचखेडे हे विजयी झाले.
नागपूर ग्रामीण
नागपूर ग्रामीण तालुक्यातील धामणा येथील प्रभाग क्र. १ मधून तेजराव सरोदे, वनिता उईके, नलू वागदे, प्रभाग २ मधून अविनाश पारधी, वर्षा भलावी, सुधाकर बावणे, प्रभाग ३ मधून आनंद येलेकर, चित्रकला नागपुरे, लक्ष्मी करडे, प्रभाग ४ मधून अंकुश शेंडे, माया कडू यांनी विजय मिळविला. पेठ कलडोंगरीच्या प्रभाग १ मधून वसंता बावणे, प्रवीण क्षीरसागर, अनिता बावणे, प्रभाग २ मधून पुरुषोत्तम सोनवणे, रमा बोरकर, मनीषा कोवे, प्रभाग ३ मधून प्रदीप डवरे, मंगला ठाकरे, प्रभा खांदारे विजयी झाले. द्रुगधामना येथील प्रभाग क्र. १ मधून शंकर गजभिये, दशरथ इटनकर, प्रियंका कुळमते, प्रभाग क्र. २ मधून कल्पना शेंडे, दुर्गा राऊत, सुधाकर राऊत, प्रभाग क्र. ३ मधून विद्या राऊत, रवी चव्हाण, सविता बोरकर विजयी झाले. दवलामेटी येथील प्रभाग क्र. १ मधून नितीन अरसड, रश्मी पाटील, सविता खोब्रागडे, प्रभाग २ मधून आनंदा तपनीचोर, आरती ढोके, प्रभाग ३ मधून गजानन रामेकर, रागिणी चांदेकर, निशांत गजभिये, प्रभाग ४ मधून शुभांगी फुलझेले, कमल पेंदाम, रमेश गोमासे, प्रभाग ५ मधून अशोक मडरेवार, सुनील महाजन, कल्पना गवई, प्रभाग ६ मधून प्रशांत केवटे, हेमलता खैरकर, प्रभा थोरात विजयी झाले. पांजरी (बु.) ग्रामपंचायतच्या प्रभाग १ मधून धार्मिक पारेकर, योगिता धीमे, जयश्री पराते, प्रभाग २ मधून चक्रधर गणोरकर, विद्या बाराहाते, लक्ष्मी ऊर्फ विमल कोराम, प्रभाग ३ मधून पुरुषोत्तम कांबळे, सुषमा बागडे, संगीता भोयर, प्रभाग ४ मधून मुरलीधर कोराम, आँचल भगत विजयी झाले. बहादुरा ग्रामपंचायतच्या प्रभाग १ मधून रमेश कुरळकर, राधिका ढोमणे, संगीता मांदाडे, प्रभाग २ मधून एजाज धानीवाला, पारबती गुजरकर, वनिता उरकुडकर, प्रभाग ३ मधून दिलीप चापेकर, राजू अन्सारी, गीता पराते, प्रभाग ४ मधून राजकुमार वंजारी, सुमन कुंभरे, पुष्पा गायधने, प्रभाग ५ मधून सिद्धार्थ नगरारे, नरेंद्र नांदूरकर, गीता सूर्यवंशी, प्रभाग ६ मधून विजय नाखरे, पुष्पा पांडे विजय झाले. बोथलीच्या प्रभाग १ मधून सुरेश वलीवकर, शालिनी कांबळे, मंजुळा झुरमुरे, प्रभाग २ मधून सुरेश जारोंडे, निर्मला भरडे, माया आंबागुहे, प्रभाग ३ मधून सुभाष कन्नाके, सीमा फुलझेले, रजनी हांडे, प्रभाग ४ मधून अरुण वानखेडे, मोरेश्वर कानतोडे, रत्नमाला धुर्वे, प्रभाग ५ मधून मंगेश रेवाडे, विजय मरसकोल्हे, रंजना वानखेडे विजयी झाले.
डोंगरगाव प्रभाग १ मधून अनिल परतेकी, रंजना आमटे, रजियासुल्तान पठाण, प्रभाग २ मधून देवेंद्रसिंग गौर, कांता मरसकोल्हे, रुखमा लाडेकर, प्रभाग ३ मधून विवेक बानाईत, प्रमोद कांबळे, प्रेमा दुधकवर विजयी झाले. सुराबर्डी ग्रामपंचायतच्या प्रभाग १ मधून कमलाकर मसराम, वनिता कापसे, हरजितकौर तिथ, प्रभाग २ मधून रमेश महाकाळकर, विनोद गुरनुले, वनिता गणवीर, प्रभाग ३ मधून ज्ञानेश्वर खाडे, भावना तायडे, नेहा कोकण विजयी झाले.
कापसी (खुर्द) ग्रामपंचायतच्या प्रभाग १ मधून गजानन कुथे,रिना जुमळे, कला भलावी, प्रभाग २ मधून संदीप पारधी, सीमा दुनेदार, सोनाली बेंदरे, प्रभाग ३ मधून अमित कुथे, शिवकुमार शाहू, मनीषा चिंचखेडे, प्रभाग ४ मधून आशा पाटील, कांता धुर्वे विजयी झाले.
सोनेगाव (निपाणी) ग्रामंपचायतमध्ये कमलाकर इंगळे, अश्विनी भोयर, संगीता काळे, प्रभाग २ मधून सतीश डुकरे, वनिता वलके, सुनीता मोहोड, प्रभाग ३ मधून प्रकाश गवळी, शकुंतला वाळके, प्रभाग ४ मधून प्रशांत म्हैसकर, किरण सिंह, नंदा गडेकर, प्रभाग ५ मधून विनोद लंगोटे, शशिकला चापले, सुशीला भिवणकर, प्रभाग ६ मधून विजय सोनकांबळे, नलिनी धोटकर, हेमलता सरिन विजयी झाले. (प्रतिनिधी)
१९ ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीचा दावा
काटोल विधानसभा मतदारसंघातील एकूण २१ पैकी १९ ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेस समर्थित पॅनलला बहुमत मिळाल्याचा दावा माजी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांनी केला आहे. यात नरखेड तालुक्यातील १५ आणि काटोल तालुक्यातील चार ग्रामपंचायतींचा समावेश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नरखेड तालुक्यातील अंबाडा, सायवाडा, खरबडी, महेंद्री, पेठमुक्तापूर, उमठा, दातेवाडी, थडीपवनी, जलालखेडा, खैरगाव, देवळी, सिंजर, येरला (इंदोरा), माणिकवाडा व जामगाव (खुर्द) आणि काटोल तालुक्यातील भोरगड, खंडाळा, माळेगाव व नागपूर (ग्रामीण) तालुक्यातील धामना ग्रामपंचायतवर राष्ट्रवादी काँग्रेस समर्थित पॅनलला स्पष्ट बहुमत मिळाल्याचा दाख अनिल देशमुख यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे.
आठ ग्रामपंचायतींवर भाजपचा दावा
हिंगणा विधानसभा मतदारसंघातील नऊपैकी आठ ग्रामपंचायतींवर भाजप समर्थित पॅनलला बहुमत मिळाल्याचा दावा आ. समीर मेघे यांनी केला आहे. यात नागपूर (ग्रामीण) तालुक्यातील बोथली, दवलामेटी, सोनेगाव (निपाणी), सुराबर्डी व द्रुगधामना तसेच हिंगणा तालुक्यातील सावंगी - आसोला, दाभा येरणगाव व खडकी या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
अन् ईश्वरचिठ्ठी झालीच नाही
दोन्ही उमेदवारांच्या पारड्यात समसमान मते पडूनही ईश्वरचिठ्ठी होऊ शकली नाही, असा अफलातून प्रकार उमरेड तालुक्यातील कळमना (बेला) ग्रामपंचायतीमधील निवडणुकीत बघावयास मिळाला. येथील वॉर्ड क्रमांक ३ मध्ये एकूण ४ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. मतमोजणीअंती वैशाली खडसे आणि अर्चना क्षीरसागर यांना प्रत्येकी १५७ मते पडलीत. प्रथम सगळेच बुचकळ्यात पडले. ईश्वरचिठ्ठी होणार असा सर्वांचाच समज झाला. परंतु, या वॉर्डातून दोनच उमेदवार निवडावयाचे असल्याने लागलीच दोघींनाही विजयी घोषित करण्यात आले. तेही ईश्वरचिठ्ठी न करताच!