वंचितकडून काँग्रेसला आघाडीचा प्रस्तावच नाही; बहुजन मतदारांची दिशाभूल करू नये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2022 21:48 IST2022-02-22T21:48:00+5:302022-02-22T21:48:22+5:30
Nagpur News आंबेडकर यांच्यासारख्या जबाबदार नेत्याने खोटे बोलून बहुजन मतदारांची दिशाभूल करणे योग्य नाही, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मंगळवारी केली.

वंचितकडून काँग्रेसला आघाडीचा प्रस्तावच नाही; बहुजन मतदारांची दिशाभूल करू नये
नागपूर : वंचित बहुजन आघाडीने काँग्रेसला आघाडी करण्याचा कुठलाही प्रस्ताव दिलेला नाही. ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी चर्चाही केलेली नाही. त्यामुळे आंबेडकर यांच्यासारख्या जबाबदार नेत्याने खोटे बोलून बहुजन मतदारांची दिशाभूल करणे योग्य नाही, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मंगळवारी केली.
ॲड. आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीने काँग्रेसला आघाडी करण्याचा प्रस्ताव दिला होता. मात्र, त्या प्रस्तावाला काँग्रेसकडून प्रतिसादच मिळाला नसल्याचा दावा केला होता. त्यामुळेच आपण आता स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला, असेही त्यांनी स्पष्ट केले होते. ॲड. आंबेडकर यांचा हा दावा पटोले यांनी खोडून काढला. पटोले म्हणाले, आंबेडकर यांनी तालुक्याच्या पातळीवर प्रस्ताव दिला असेल तर सांगता येत नाही. केवळ काँग्रेसला बदनाम करण्यासाठी चुकीची माहिती पसरविणे योग्य नाही. त्यांच्यासाठी चर्चेची दारे खुली आहेत. त्यांनी चर्चेसाठी यावे; पण तोवर बहुजन मतदारांची दिशाभूल करू नये, ही आपली नम्र विनंती आहे, असा टोलाही पटोले यांनी लावला.
एसटी कामगारांना भ्याडपणे उचकवले
एसटी कामगारांनी मागण्यासांठी लढा दिला. भाजपने ही संधी साधत त्यांना उचकवले आणि त्यांची साथ सोडली. आज त्यांच्या परिवाराची वाईट अवस्था आहे. यावर सकारात्मक तोडगा काढला पाहिजे, अशी मागणी आपण मुख्यमंत्र्यांना केली असल्याचेही पटोले यांनी स्पष्ट केले.