बावनकुळेंविरोधात काँग्रेसची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; नवनीत राणांचे प्रकरण न्यायप्रविष्ठ असताना निकाल लागल्याचा बावनकुळेंचा दावा

By कमलेश वानखेडे | Published: March 28, 2024 06:49 PM2024-03-28T18:49:07+5:302024-03-28T18:49:26+5:30

लोंढे यांनी तक्रारीत म्हटले आहे की, २८ मार्च २०२४ रोजी खासदार नवनीत राणा यांच्या भाजप प्रवेशावेळी बावनकुळे यांनी सुप्रीम कोर्टाने खा. नवनीत राणाप्रकरणी निर्णय दिलेला आहे.

Congress complains to the Chief Electoral Officer against Bawankules | बावनकुळेंविरोधात काँग्रेसची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; नवनीत राणांचे प्रकरण न्यायप्रविष्ठ असताना निकाल लागल्याचा बावनकुळेंचा दावा

बावनकुळेंविरोधात काँग्रेसची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; नवनीत राणांचे प्रकरण न्यायप्रविष्ठ असताना निकाल लागल्याचा बावनकुळेंचा दावा

नागपूर : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्राचे प्रकरण सुप्रीम कोर्टात अद्याप प्रलंबित आहे, त्याचा निकाल लागलेला नाही असे असताना भाजपचे प्रदेश अध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी निकाल लागला असल्याचा दावा करून न्यायालयाचा अवमान केला आहे. हा गंभीर गुन्हा असून त्यांच्यावर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे.

लोंढे यांनी तक्रारीत म्हटले आहे की, २८ मार्च २०२४ रोजी खासदार नवनीत राणा यांच्या भाजप प्रवेशावेळी बावनकुळे यांनी सुप्रीम कोर्टाने खा. नवनीत राणाप्रकरणी निर्णय दिलेला आहे, अशा प्रकारचा चुकीचा व दिशाभूल करणारा खोटा दावा केला आहे. अशा पद्धतीचे विधान जाणीवपूर्वक करून खोटी माहिती पसरवली जात आहे. हा प्रकार मतदारांवर प्रभाव टाकणारा आहे, तसेच आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन असून भारतीय दंड संहितेअंतर्गत गुन्हा आहे. असे करून बावनकुळे यांनी आदर्श आचारसंहितेचा भंग केला असून निवडणूक आयोगाने त्यांच्यावर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी लोंढे यांनी केली आहे.

नवनीत राणा या अमरावती लोकसभा मतदारसंघातून २०१९ च्या निवडणुकीत विजयी झाल्या, अमरावतीची जागा अनुसूचित जाती या प्रवर्गासाठी राखीव आहे. या मतदारसंघातून विजयी झालेल्या नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र मा. मुंबई हायकोर्टाने २०२१ मध्ये रद्द ठरवत दोन लाखांचा दंडही ठोठावला आहे. त्यानंतर नवनीत राणा यांनी हायकोर्टाच्या निर्णयाला मा. सुप्रीम कोर्टात आव्हान दिले होते. २८ फेब्रुवारी २०२४ च्या सुनावणीनंतर मा. सुप्रीम कोर्टाने निकाल राखून ठेवलेला आहे, असे असतानाही चंद्रशेखर बावनकुळे यांनी निकाल लागलेला आहे, असे खोटे सांगून जनतेची दिशाभूल केली आहे, असा आरोप अतुल लोंढे यांनी केला आहे.

Web Title: Congress complains to the Chief Electoral Officer against Bawankules

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.