रवी भवनात उपविभागीय अभियंत्यांच्या ‘चार्ज’वरून गोंधळ; बदली आणि रुजू होण्यावर स्थगिती
By आनंद डेकाटे | Updated: November 8, 2025 19:30 IST2025-11-08T19:27:06+5:302025-11-08T19:30:53+5:30
Nagpur : ८ नोव्हेंबर हा महिन्याचा दुसरा शनिवार होता. सुट्टीचा दिवस. पण हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पीडब्ल्यूडी विभाग १ मधील सर्व कार्यालये सुरू होती. दुपारी सुमारास १२ वाजता संजय उपाध्ये उपविभागीय अभियंता कार्यालयात पोहोचले, पण तिथे कुलूप होते.

Confusion over 'charge' of sub-divisional engineers in Ravi Bhavan; Suspension on transfers and re-joining
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन येत्या ८ डिसेंबरपासून सुरू होत आहे. २७ नोव्हेंबरपासून सचिवालय येथे कामकाज सुरू होईल. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रवी भवन येथील उपविभाग १ मधील उपविभागीय अभियंता पदावर सुरू असलेला संघर्ष संपत नाहीये. येथे नेमणूक झालेल्या उपविभागीय अभियंता अजय पाटील (घाटे) आणि माजी उपविभागीय अभियंता संजय उपाध्ये यांच्यात ‘चार्ज’ घेणे–देणे यावरून वाद चिघळला आहे.
८ नोव्हेंबर हा महिन्याचा दुसरा शनिवार होता. सुट्टीचा दिवस. पण हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पीडब्ल्यूडी विभाग १ मधील सर्व कार्यालये सुरू होती. दुपारी सुमारास १२ वाजता संजय उपाध्ये उपविभागीय अभियंता कार्यालयात पोहोचले, पण तिथे कुलूप होते. त्यामुळे त्यांनी शाखा अभियंता राहुल ठाकूर यांच्या कार्यालयात जाऊन चौकशी केली. त्यावेळी त्यांना समजले की महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने (मॅट) त्यांच्या बदलीवर आणि पाटील यांच्या रुजू होण्यावर स्थगिती दिली आहे. त्यामुळे उपाध्ये यांनी त्याच दिवशी शाखा अभियंता कार्यालयातूनच आपले कामकाज सुरू केले आणि गोंधळलेल्या कनिष्ठ अभियंत्यांची बैठक घेतली.
दरम्यान, ३० ऑक्टोबर रोजी पदभार स्वीकारलेले अजय पाटील (घाटे) यांनी सांगितले की, त्यांना या घडामोडींबद्दल काही माहिती नाही. “हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर खूप काम आहे, त्यामुळे मी सकाळपासून फील्डवर आहे, पण या घडामोडी दुःखद आहेत. पदभाराबाबत वरिष्ठ अधिकारी जे निर्देश देतील, त्याचे पालन मी करेन,” सूत्रांच्या माहितीनुसार, आता उपाध्ये यांच्या सेवानिवृत्तीपर्यंत पाटील यांच्याकडे रजेचा पर्यायच उरला आहे.
३० नोव्हेंबरला सेवानिवृत्ती
उपाध्ये यांनी सांगितले की, ते ३० नोव्हेंबर रोजी सेवानिवृत्त होणार आहेत. सेवानिवृत्तीला अवघा एक महिना बाकी असताना त्यांची बदली मुख्य अभियंता कार्यालयात करण्यात आली होती, जी नियमबाह्य होती. “मी दिव्यांग अधिकारी असून माझ्याशी अन्याय झाला,” त्यामुळे मॅटमध्ये दाद मागितली. ते म्हणाले ‘चार्ज’ घेण्याची प्रक्रिया अत्यंत मनःस्तापदायक होती. त्यांच्या केबिनवरील नेमप्लेट काढून ती कचऱ्याच्या पेटीत फेकण्यात आली होती. त्या नेमप्लेटवर त्यांच्या आई-वडिलांची नावे होती. त्यामुळे त्यांच्या मनाला ठेस पोहोचली. मात्र अजय पाटील यांनी अशा कोणत्याही घटनेचे खंडन केले. दरम्यान पीडब्ल्यूडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, त्यांना अद्याप मॅटचा आदेश प्राप्त झालेला नाही; मात्र न्यायाधिकरणाच्या आदेशाचे काटेकोर पालन केले जाईल.