उमेदवारी अर्ज वितरणात घोळ : उमेदवार संभ्रमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2019 10:08 PM2019-09-30T22:08:05+5:302019-09-30T22:10:16+5:30

उमेदवारी अर्ज वितरणात घोळ झाल्याने उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. यासंदर्भात दोन व्यक्तींनी जिल्हाधिकाऱ्यांपासून तर निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे.

Confusion in distribution of nomination forms: Candidate confused | उमेदवारी अर्ज वितरणात घोळ : उमेदवार संभ्रमात

उमेदवारी अर्ज वितरणात घोळ : उमेदवार संभ्रमात

Next
ठळक मुद्देनिवडणूक आयोगाकडे तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विधानसभा निवडणुकीला सुरुवात झाली आहे. आतापर्यंत शेकडो लोकांनी नामनिर्देशन पत्र (उमेदवारी अर्ज) नेले, परंतु एकानेही उमेदवारी अर्ज भरलेला नाही. दरम्यान उमेदवारी अर्ज वितरणात घोळ झाल्याने उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. यासंदर्भात दोन व्यक्तींनी जिल्हाधिकाऱ्यांपासून तर निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे.
नीलेश नागोलकर आणि विजय मारोडकर असे तक्रारकर्त्यांचे नाव आहे. या दोघांनीही विधानसभा निवडणुकीत उभे राहण्यासाठी उमेदवारी अर्ज (नामनिर्देशन पत्र) घेतले. नीलेश नागोलकर हे एक सामाजिक कार्यकर्ते आहेत. त्यांनी नागपूर पश्चिम आणि नागपूर दक्षिण-पश्चिम या दोन मतदार संघातून लढण्यासाठी अर्ज घेतले. तेव्हा दोन्ही अर्जात तफावत दिसून आली. नामनिर्देशन पत्रासोबत दिली जाणारी आवश्यक कागदपत्रे एका मतदार संघाच्या अर्जासोबत होती तर दुसऱ्या मतदार संघातील अर्जासोबत नव्हती. तेव्हा त्यांनी इतरही मतदारसंघातील नामनिर्देशन पत्राचा संच घेऊन तपासणी केली. तेव्हा त्यातही हाच प्रकार आढळून आला. उदाहरणार्थ नामनिर्देशन पत्रासोबत निवडणूक प्रतिनिधीचे नेमणूक पत्र, प्रतिनिधीची नेमणूक रद्द करणे, उमेदवारी मागे घेण्यासंबंधीची सूचना, अमानत रक्कम परत करण्यासाठीचा अर्ज नागपूर पश्चिम मतदार संघाच्या संचात आहे. परंतु नागपूर दक्षिण पश्चिमच्या संचात नाही. तीच बाब स्वतंत्र बँक खाते उघडण्याबाबतचे पत्र दक्षिण-पश्चिममध्ये आहे तर पश्चिममध्ये नाही. तसेच निवडणूक आयोगाच्या निर्देशांची कॉपी दक्षिण-पश्चिमच्या संचात आहे, पण पश्चिममध्ये नाही. वृत्तपत्रात जाहिरात प्रसिद्ध करणेबाबतचे प्रपत्र दिले आहे. ते दक्षिण-पश्चिममध्ये नाही. वाहन परवान्याचा नमुना नाही. निवडणूक चिन्हांचा नमुना आदी आवश्यक कागदपत्रे काही मतदार संघाच्या संचासोबत जोडली आहेत तर काहींसोबत नाही. यासंदर्भात त्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांना समाधानकारक उत्तर मिळाले नाही. अखेर त्यांनी जिल्हाधिकारी, अतिरिक्त जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. तसेच या तक्रारीची एक प्रत निवडणूक आयुक्त व मुख्य निवडणूक आयुक्तांकडेही पाठविली आहे.

अपक्षांना निवडणुकीतून बाद करण्याचे षडयंत्र
नामनिर्देशन वितरणात अधिकाऱ्यांनी जो घोळ घातला आहे, तो जाणीवपूर्वक असल्याचे दिसून येते. अपक्ष उमेदवार नवीन असतात. त्यांना यासंदर्भात काही समजत नाही. त्यांना निवडणुकीतूनच बाद करण्याचे हे षडयंत्र असावे. कारण यासंदर्भात मी जेव्हा निवडणूक विभागातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तेव्हा माझ्याशी कुणी बोलायलाही तयार नव्हते. निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली तेव्हा कुठे अधिकारी भेटले. परंतु ते मला समाधानकारक उत्तर देऊ शकले नाही. यासंदर्भात आपण सर्व संबंधितांकडे तक्रार केली असून उमेदवारांनी योग्यप्रकारे नामनिर्देशनपत्राचे वाटप व्हावे आणि योग्य मार्गदर्शन मिळावे, अशी मागणी केली आहे.
नीलेश नागोलकर (तक्रारकर्ते)
सचिव, राष्ट्रनिर्माण संघटन

निवडणूक विभाग म्हणतो घोळ नाही
यासंदर्भात उपजिल्हा निवडणूक अधिकारी राजलक्ष्मी शहा यांना विचारणा केली असता त्यांनी उमेदवारी अर्जाच्या वितरणात कुठलाच घोळ नसल्याचे सांगितले. त्यांचे म्हणणे होते की, नामनिर्देशनपत्रातील भाग एक व फॉर्म नंबर २६ हे दोनच आवश्यक आहे. इतर फॉर्म हे उमेदवारी अर्ज भरल्यानंतरचे आहेत. काही मतदारसंघातील अधिकाऱ्यांनी संपूर्ण फॉर्म एकाचवेळी वितरित केले. त्यामुळे यात घोळ किंवा त्रुटीचा संबंधच येत नाही.

मग प्रशिक्षणाचा फायदा काय
निवडणुकीसंदर्भात प्रत्येक गोष्टीची नियमावली निवडणूक आयोगाने ठरवून दिलेली आहे. यासंदर्भात अधिकारी-कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणही दिले जाते. यावेळी नामनिर्देशनपत्र वितरणाबाबतही सर्व अधिकाऱ्यांना एकच निर्देश मिळालेले असतील. अशावेळी नामनिर्देशनपत्राचे वितरण करण्यासंदर्भातच एकवाक्यता नसेल तर मग अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या प्रशिक्षणाचा लाभ तरी काय, असा प्रश्न निर्माण होतो.

 

Web Title: Confusion in distribution of nomination forms: Candidate confused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.