बुद्धिस्ट सर्किटची संकल्पना सात वर्षापासून धुळखात; जागृत नागरिक मंचने वेधले लक्ष

By निशांत वानखेडे | Published: October 18, 2023 06:47 PM2023-10-18T18:47:34+5:302023-10-18T18:47:45+5:30

ऐतिहासिक दीक्षाभूमीसोबत शांतिवन चिचोली, कामठी, रामटेक व इतर महत्त्वपूर्ण बौद्ध स्थळांना जोडून बुद्धिस्ट सर्किट तयार करण्याची प्रस्ताव २०१६ साली तयार झाला होता.

concept of a Buddhist circuit has been in the air for seven years Jagurt Nagarik Manch attracted attention | बुद्धिस्ट सर्किटची संकल्पना सात वर्षापासून धुळखात; जागृत नागरिक मंचने वेधले लक्ष

बुद्धिस्ट सर्किटची संकल्पना सात वर्षापासून धुळखात; जागृत नागरिक मंचने वेधले लक्ष

नागपूर : ऐतिहासिक दीक्षाभूमीसोबत शांतिवन चिचोली, कामठी, रामटेक व इतर महत्त्वपूर्ण बौद्ध स्थळांना जोडून बुद्धिस्ट सर्किट तयार करण्याची प्रस्ताव २०१६ साली तयार झाला होता. मात्र प्रशासनाचा हलगर्जीपणा व शासनाच्या दुर्लक्षितपणामुळे गेल्या सात वर्षापासून ही संकल्पना धुळखात पडली आहे. ही संकल्पना पूर्णत्वास येण्यासाठी इतर गोष्टीप्रमाणे यासाठीही आंबेडकरी अनुयायांना आंदोलन करावे लागू नये, याकडे नागपूर जागृत नागरिक मंचने लक्ष वेधले आहे.

मंचचे संयोजक व माजी उपजिल्हाधिकारी आर. एस. आंबुलकर यांनी या संकल्पनेकडे लक्ष वेधले. नागपूर नगरीला प्राचीन गौरवशाली संस्कृतीचा दैदिप्यमान वारसा आहे. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १९५६ साली घडविलेल्या धर्मातरानंतर ती दिव्यभव्यता पुनश्च प्रदीप्त होत आहे. अशोक विजयादशमीच्या पावनपर्वावर नागपुरात केवळ भारतातूनच नव्हे तर जगभरातून लक्षावधी लोक येतात. या अनुयायी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी येथे बुद्धिस्ट सर्किट तयार व्हावे, अशी संकल्पना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आखली होती. त्यानंतर पालकमंत्र्यांच्या निर्देशानुसार नागपूर सुधार प्रन्यासने ९३७.३८ कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार करून २०१६ साली राज्य सरकारच्या पर्यटन विभागाकडे पाठविला होता. पुढे नवी दिल्ली येथे नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी पर्यटन विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठकही झाली. मात्र त्यानंतर हा प्रस्ताव धुळखात पडला असल्याचे आंबुलकर म्हणाले. डॉ. मुकुंद मेश्राम, पुरुषोत्तम गायकवाड, डी. एम. बेलेकर, हुकुमचंद मेश्राम, प्रकाश सोनटक्के, दिलीप पाटील, राजुकमार मेश्राम, मनोहर गजभिये, हरिष जानोरकर, लहानू बन्सोड, राजेंद्र टेंभुर्णे, रमेश ढवळे, भीमराव म्हैसकर आदी मंचच्या सदस्यांनी ही संकल्पना लवकरात लवकर पुर्णत्वास यावी, अशी मागणी केली.

त्यावेळी झालेल्या घडामोडी

  • - पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेत २६ ऑगस्ट २०१६ रोजी विभागीय आयुक्त कार्यालयात पर्यटन समितीची बैठक.
  • - बैठकीत दीक्षाभूमी, ड्रॅगन पॅलेस कामठी, शांतिवन चिचोली आदी स्थळांचा बुद्धिस्ट सर्किट अंतर्गत विकास व्हावा असे ठरले.
  • - पालकमंत्र्यांच्या निर्देशानुसार नासुप्रने ९३७.३८ कोटींचा प्रस्ताव तयार करून पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव यांना ६ सप्टेंबर २०१६ रोजीच्या पत्राद्वारे पाठविला.
  • - ७ सप्टेंबर २०१६ रोजी नवी दिल्ली येथे नितीन गडकरींच्या निवासस्थानी बैठक झाली.
  • - पर्यटन विभागाने दखल घेत नियुक्त केलेल्या सल्लागारांनी तिन्ही स्थळांची पाहणी केली.
  • - ९ सप्टेंबर २०१९ राेजीच्या पत्राद्वारे पर्यटन संचालनालयाने नासुप्रला अतिरिक्त माहिती मागविली. नासुप्र सभापती यांनी ती सादर केली.
  • - यानंतर पुढे काय झाले, ते कळण्यास मार्ग नसल्याचे आंबुलकर म्हणाले.

Web Title: concept of a Buddhist circuit has been in the air for seven years Jagurt Nagarik Manch attracted attention

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :nagpurनागपूर