देशाच्या अखंडतेसाठी राष्ट्रवादाची संकल्पना एक असावी
By Admin | Updated: September 30, 2014 00:36 IST2014-09-30T00:36:43+5:302014-09-30T00:36:43+5:30
राष्ट्रवादाची संकल्पना एक असेल तर देशाची एकता, अखंडता टिकून राहते. परंतु भारतात महापुरुषांच्या राष्ट्रवादाच्या संकल्पना वेगवेगळ्या असून त्यामुळे राष्ट्रवादाची भावना लोप पावत चालली आहे,

देशाच्या अखंडतेसाठी राष्ट्रवादाची संकल्पना एक असावी
मान्यवरांचे मत : ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरप्रणीत राष्ट्रवाद’ यावर व्याख्यान
नागपूर : राष्ट्रवादाची संकल्पना एक असेल तर देशाची एकता, अखंडता टिकून राहते. परंतु भारतात महापुरुषांच्या राष्ट्रवादाच्या संकल्पना वेगवेगळ्या असून त्यामुळे राष्ट्रवादाची भावना लोप पावत चालली आहे, असे प्रतिपादन मान्यवर वक्त्यांनी येथे केले.निळाई सामाजिक, सांस्कृतिक परिवार नागपूरच्या वतीने समता सैनिक दलाचे धर्मपाल मून यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हिंदी मोरभवनात ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरप्रणीत राष्ट्रवाद’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी आंबेडकरी विचारवंत प्रा. रत्नाकर मेश्राम होते. व्यासपीठावर प्रा. अशोक गोडघाटे, प्रा. डॉ. वामन गवई, महालेखाकार दिनेश पाटील उपस्थित होते.
यावेळी बोलताना दिनेश पाटील म्हणाले, राज्यघटना कितीही चांगली असली तरी ते वापरणारे लोक चांगले असणे गरजेचे आहे, असे आंबेडकरांचे मत होते. भारतातील नागरिक मिळालेले स्वातंत्र्य गमावतील यासाठी बाबासाहेबांनी घटनेतच तरतूद केल्यामुळे हे स्वातंत्र अजूनही अबाधित आहे. गौतम बुद्धांच्या काळापासून भारतात लोकशाही होती. परंतु नागरिकांना ती टिकवता आली नाही. त्यामुळे लोकशाही टिकविण्यासाठी आंबेडकरांच्या विचारांवर वाटचाल करण्याची गरज आहे. प्रा. डॉ. वामन गवई म्हणाले, गौतम बुद्धांच्या मते मैत्रीभाव म्हणजे राष्ट्रवाद होय. भारतात स्वातंत्र्यवीर सावरकर, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची राष्ट्रवादाची संकल्पना वेगवेगळी आहे.
आंबेडकरांच्या मते सर्वसामान्य व्यक्तीला स्वातंत्र्य मिळावे हा त्यांचा राष्ट्रवाद होय. आधुनिक काळातील राष्ट्रवादाची संकल्पना विघटनाकडे घेऊन जाणारी आहे. ज्या देशात धर्म राष्ट्रवाद असतो त्या देशात संविधानापेक्षा धर्माचे कायदे श्रेष्ठ ठरतात. राष्ट्रधर्माचे नागरिक प्रथम आणि इतरांना दुय्यम स्थान मिळते. परंतु बाबासाहेबांना कायद्याचे राज्य हवे होते.
देशात हिंदू राष्ट्रवाद आल्यास मनुस्मृतीचा कायदा येणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रास्ताविक राहुल दहिकर यांनी केले. संचालन प्रा. प्रवीण कांबळे यांनी केले. व्याख्यानाला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)