संगणक शिक्षकांचे भविष्य टांगणीला
By Admin | Updated: December 8, 2014 00:52 IST2014-12-08T00:52:06+5:302014-12-08T00:52:06+5:30
संगणकाचा विविध क्षेत्रात वापर वाढला आहे आणि म्हणूनच संगणक क्षेत्रातील संधीही वाढत चालल्या आहेत. कार्यालय, दुकाने, संस्था, रुग्णालये, आस्थापने (कंपनी), इ. ठिकाणी संगणकाचा वापर

संगणक शिक्षकांचे भविष्य टांगणीला
स्थायी नियुक्तीची प्रतीक्षा : सरकार दखल घेणार का?
नागपूर : संगणकाचा विविध क्षेत्रात वापर वाढला आहे आणि म्हणूनच संगणक क्षेत्रातील संधीही वाढत चालल्या आहेत. कार्यालय, दुकाने, संस्था, रुग्णालये, आस्थापने (कंपनी), इ. ठिकाणी संगणकाचा वापर अनिवार्य होत चालला आहे. अशा या संगणकाच्या काळात विद्यार्थ्यांना संगणक साक्षर बनविण्यासाठी केंद्राच्या आयटीसी योजनेंतर्गत राज्य शासनाने प्रत्येक शाळेत कंत्राटी पद्धतीने संगणक शिक्षकांची नियुक्ती केली आहे़ परंतु अशा शिक्षकांच्या नियुक्तीचे अधिकार खासगी कंपनीला व या कंपन्या मनमर्जीने व्यवहार करीत असल्याने राज्यातील तब्बल आठ हजार संगणक शिक्षकांचे भविष्य टांगणीला लागले आहे़
या संगणक शिक्षकांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकानुसार, केंद्र शासनाच्या बूट मॉडेल तत्त्वावर राज्यभरातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना संगणक शिक्षण देण्याची महत्त्वाकांक्षी योजना २००८ पासून सुरू केली़ या योजनेंतर्गत फेज १, फेज २ व फेज ३ मधून राज्यातील सुमारे आठ हजारांपेक्षाही जास्त शिक्षक पाच वर्षांपर्यंत ११ महिन्यांच्या कराराने विविध खासगी कंपन्यांमार्फत नियुक्त करण्यात आले़ मात्र या खासगी कंपन्या सर्व नियमांचे उल्लंघन करून संगणक शिक्षकांना शेतमजुरापेक्षाही कमी वेतन देत असल्याचा आरोप या शिक्षकांनी केला आहे़ अशी पिळवणूक करणाऱ्या या खासगी कंपन्यांविरुद्ध अनेकदा संबंधित विभागाकडे तक्रारही करण्यात आली़ परंतु कुणीच या तक्रारींची दखल घ्यायला तयार नाही़ त्यामुळे राज्यभरातील संगणक शिक्षकांमध्ये संतापाचे वातावरण आहे़
राज्यात सत्तारूढ झालेल्या नवीन सरकारने तरी आमच्या मागण्यांची दखल घेऊन आम्हाला सेवेत कायम करावे व तसा निर्णय यंदाच्या नागपुरातील हिवाळी अधिवेशनातच घ्यावा, अशी मागणी जीवन सुरुदे, शरद संसारे, रेशमा हबीब शेख व राज्यभरातील संगणक शिक्षकांनी महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक संघटनेच्या माध्यमातून केली आहे़ (प्रतिनिधी)