नवमाध्यमांचा समाजमनावर संमिश्र परिणाम
By Admin | Updated: December 8, 2014 00:54 IST2014-12-08T00:54:15+5:302014-12-08T00:54:15+5:30
माध्यमांचे स्वरूप आता बदलले आहे. केवळ प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक वाहिन्या एवढेच ते मर्यादित नसून इंटरनेट, सोशल साईटस् आणि मोबाईल यामुळे माहितीचा स्फोट होतो आहे.

नवमाध्यमांचा समाजमनावर संमिश्र परिणाम
मैत्री परिवार संस्था : हेमंत व्याख्यानमाला
नागपूर : माध्यमांचे स्वरूप आता बदलले आहे. केवळ प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक वाहिन्या एवढेच ते मर्यादित नसून इंटरनेट, सोशल साईटस् आणि मोबाईल यामुळे माहितीचा स्फोट होतो आहे. यात खाजगी वाहिन्यांना आणि प्रिंट माध्यमांना अधिक जबाबदारीने वागण्याची गरज आहे. मुळात प्रसार माध्यमांचा समाजमनावर परिणाम होतो, हे अनेक उदाहरणांनी सिद्ध झाले आहे. सध्या वेगवेगळ्या स्वरूपात येणाऱ्या नवमाध्यमांमुळे समाजमन घुसळून निघते आहे. या नवमाध्यमांचा समाजावर होणारा परिणाम सध्या तरी संमिश्रच आहे, असे मत आयबीएन-लोकमतचे कार्यकारी संपादक मंदार फणसे यांनी व्यक्त केले.
मैत्री परिवार संस्थेच्यावतीने हेमंत व्याख्यानमालेचे आयोजन साई सभागृह, शंकरनगर येथे करण्यात आले. यात ‘नवमाध्यमांचा समाजमनावर होणारा परिणाम’ या विषयावर मंदार फणसे तर ‘बदलत्या राजकीय स्थितीत माध्यमांकडून अपेक्षा’ या विषयावर भाजपचे प्रदेश प्रवक्ते माधव भंडारी यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी मंदार फणसे म्हणाले, प्रिंट माध्यमांना मात्र स्वत:चे अस्तित्व आहे, ते केव्हाही तपासता येऊ शकते. येणाऱ्या काळात ४ जी आणि ७ जी मुळे माहिती तंत्रज्ञानात क्रांती होणार आहे. त्याचा परिणाम समाजमनावर होईलच. त्यामुळे कुठलीही माहिती कुणाची मक्तेदारी राहिलेली नाही. अशा स्थितीत माध्यमांना अधिक जबाबदारीने काम करावे लागणार असून, प्रत्यक्ष जनतेशी संवादाची प्रक्रियाही वाढवावी लागणार आहे. येणाऱ्या काळात मोबाईलच्या स्क्रीनवरच सारे जग सामावण्याचे चिन्ह आहे, असे ते म्हणाले.
माध्यमांनी विश्वासार्हता गमावू नये : माधव भंडारी
माध्यमांची निर्मितीच समाजमनाला प्रभावित करून निकोप समाजनिर्मितीसाठी झाली आहे. पण तोच उद्देश केवळ व्यावसायिकता पाहताना हरवीत चालला असून, त्यामुळे माध्यमांची विश्वासार्हता संपत आहे, ही गंभीर बाब आहे.
माध्यमांनी जबाबदारीने वृत्त संकलन करून लोकांपर्यंत पोहोचविले पाहिजे. माध्यमांनी आपली विश्वासार्हता गमावू नये, असे मत माधव भंडारी यांनी व्यक्त केले. टीआरपीच्या चक्रात फसण्यापेक्षा आपली बातमीच इतकी पक्की आणि प्रगल्भ असली तर ती नक्कीच विकल्या जाते. प्रसार माध्यमांनी विरोधाचा सूर लावल्यावरही सत्ताबदल झाला. राजकीय पक्षांवर टीका करा, त्यांना चुका दाखवा, पण जनतेला ग्राह्य धरण्याची चूक करू नका, हे या सत्ताबदलाने सिद्ध झाले आहे. समाजाची प्रगल्भता आता माध्यमांनी स्वीकारण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)