Composite response to Vanchit bandh in Nagpur: rally at various places | नागपुरात वंचितच्या बंदला संमिश्र प्रतिसाद : ठिकठिकाणी रॅली
नागपुरात वंचितच्या बंदला संमिश्र प्रतिसाद : ठिकठिकाणी रॅली

ठळक मुद्देसीएए, एनआरससह केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणाला विरोध

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वंचित बहुजन आघाडीतर्फे पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला नागपुरात संमिश्र प्रतिसाद मिळाला. काही काळ बाजारपेठा बंद राहिल्यानंतर पुन्हा सुरू झाल्या होत्या. खरबदारी म्हणून काही शाळांनीही विद्यार्थ्यांना सुट्टी दिली. शहरातील अनेक भागात रॅली काढून निदर्शनेही करण्यात आली. या बंदमध्ये विविध सामजिक संघटना सहभागी झाल्या होत्या. नागपुरात हा बंद शांततेत पार पडला.


केंद्र सरकारने पारित केलेल्या नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए), यासोबतच येऊ घातलेल्या एनपीआर व एनआरसी तसेच देशातील बुडालेली अर्थव्यवस्था, केंद्र सरकारच्या चुकीचे आर्थिक धोरण, शासकीय संस्थांचे होत असलेले खासगीकरण याविरुद्ध वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी शुक्रवारी महाराष्ट्र बंदचे आवाहन केले होते. या बंदला विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांनीही पाठिंबा दिला होता.
वंचित बहुजन आघाडीचे शहर अध्यक्ष रवी शेंडे यांच्या नेतृत्त्वात सीताबर्डी येथून रॅली काढण्यात आली. आनंद टॉकिजमार्गे संपूर्ण सीताबर्डी भागात ही रॅली काढण्यात आली. यात मोठ्या संख्येन कार्यकर्ते उपस्थित होते. रॅलीच्या माध्यमातून बाजारपेठ, दुकान बंद करण्याचे आवाहन करण्यात आले. याला दुकानदारांनी प्रतिसादही दिला.
भरत लांडगे यांच्या नेतृत्वात इंदोरा चौक येथील कार्यालयातून रॅली काढण्यात आली. इंदोरा चौक, कमाल चौक, आवळे बाबू चौक, लष्करीबागपासून पुन्हा कमाल चौक ते इंदोरा चौक अशी ही रॅली निघाली. या दरम्यान कार्यकर्त्यांनी व्यापाऱ्यांना प्रतिष्ठाने बंद ठेवण्याचे आवाहन केले.यात वंचित बहुजन आघाडीचे मिलिंद मेश्राम, आनंद चवरे, भरत लांडगे, गोवर्धन भेले, प्रशांत नारनवरे, गौतम शेंडे, प्रशांत खोब्रागडे, बबन बुरबुरे, प्रवीण पाटील, भोला शेंडे, संघपाल गडेकर, रोशन बेहरे, सतीश मोटघरे, विनीत मेश्राम, अविराज थूल, जीवन ऊके, लहानू बंसोड, सतपाल सिंह विर्दी यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
दक्षिण पश्चिम नागपुरातील लाँग मार्च चौकातून रॅली काढण्यात आली. बैद्यनाथ चौक, गणेशपेठ बस स्टेशन, मेडिकल चौक, जाटतरोडी चौक, मोक्षधाम चौक परिसरात बंद पाळण्यात आला. सुभाष नगर, माटे चौक, गोपाल नगर, प्रतापनगर आदी भागात रॅली काढण्यात आली व बंद पाळण्यात आला. पश्चिम नागपुरात जाफर नगर, अनंतनगर, अवस्थी चौक येथे शांततेत बंद पाळण्यात आला. या बंदमध्ये पक्षाचे वरिष्ठ नेते राजू लोखंडे, प्रा. रमेश पिसे, संजय हेडाऊ, राहूल वानखेडे, मिलिंद मेश्राम, बाळू हरखंडे, अश्विन मेश्राम, गौतम पिल्लेवान, धर्मपाल लामसोंगे, सती बावने, सुजाता सुरडकर, शुभम ढेंगरे, अंकुश मोहिले, धम्मा धाबर्डे, प्रदीप गणवीर, सिध्दांत पाटील आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

चार कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात
दरम्यान वंचित बहुजन आघाडीचे नागपूर शहर युवा अध्यक्ष भोला शेंडे यांच्यासह चार कार्यकर्त्यांना लकडगंज पोलिसांनी ताब्यात घेतले. इंदोरा चौकात आंदोलन करीत असताना त्यांना ताब्यात घेतले.

Web Title: Composite response to Vanchit bandh in Nagpur: rally at various places

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.