कृषी पंप वीजजोडणीची कामे प्राधान्याने पूर्ण करा

By Admin | Updated: April 5, 2016 05:36 IST2016-04-05T05:36:32+5:302016-04-05T05:36:32+5:30

कृषी पंप वीज जोडणीला शेतकऱ्यांचा मिळणारा प्रतिसाद लक्षात घेता जिल्हाधिकाऱ्यांनी कृषी पंपाच्या वीज जोडणीची

Complete the work of agriculture pump power connection with priority | कृषी पंप वीजजोडणीची कामे प्राधान्याने पूर्ण करा

कृषी पंप वीजजोडणीची कामे प्राधान्याने पूर्ण करा

नागपूर : कृषी पंप वीज जोडणीला शेतकऱ्यांचा मिळणारा प्रतिसाद लक्षात घेता जिल्हाधिकाऱ्यांनी कृषी पंपाच्या वीज जोडणीची कामे प्राधान्याने पूर्ण करा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे जलयुक्त शिवार अभियान, धडक विहीर सिंचन योजना, सामूहिक धान खरेदी योजना आदींच्या सद्यस्थितीतबाबत विदर्भातील जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधून आढावा घेतला. यावेळी मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रवीण परदेशी तसेच इतर संबंधित विभागांचे सचिव व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, शेतकऱ्यांनी कृषी पंप वीज जोडणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्राप्त अर्जांची संख्या पाहता या उपक्रमाला मिळणारा प्रतिसाद लक्षणीय असल्याचे दिसते. या प्राप्त झालेल्या अर्जावर संबंधित शेतकऱ्यांना तातडीने कृषी पंप वीज जोडणी देण्यात यावी, अशी सूचनाही यावेळी मुख्यमंत्र्यांनी केली.
मेळघाट परिसरातील आरोग्य सुविधांबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, आरोग्य विभागातील रिक्त पदे तात्काळ भरण्यात येतील. तसेच या जिल्ह्यातील आरोग्य सुविधा बळकट करण्याच्या अनुषंगाने एकात्मिक आराखडा तयार करण्याचे निर्देशही यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले. गोंदिया येथील वैद्यकीय महाविद्यालय व अमरावती येथे सुपरस्पेशालिटी रुग्णालयाच्या निर्मितीला गती देण्याची सूचनाही त्यांनी यावेळी केली. गोसीखुर्द, काटेपूर्णा, बेंबळा, निम्म पैनगंगा या प्रकल्पांच्या भूसंपादन व पुनर्वसनाचा आढावा मुख्यमंत्र्यांनी यावेळी घेतला. (प्रतिनिधी)

गडचिरोलीतील वीजजोडणी
२०१७ पर्यंत पूर्ण करा
गडचिरोली जिल्ह्यातील विकास कामांचा आढावा घेताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, जिल्ह्यातील प्रलंबित ५२ गोदामांचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर तात्काळ आणावा. दुर्गम गावे एकात्मिक सौर प्रकल्पाद्वारे जोडण्याबाबत आराखडा सादर करून ३१ डिसेंबर २०१७ पर्यंत जिल्ह्यातील सर्व गावांत वीजजोडणी पूर्ण कराव्या. गडचिरोलीला करीमनगरशी जोडणाऱ्या गोदावरी नदीवरील पुलाचे काम तात्काळ पूर्ण करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या. गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागातील दळणवळणविषयक सुविधा निर्माण करण्यावर भर द्यावा, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

धडक विहीर कार्यक्रम राबवा
विदर्भातील काही जिल्ह्यातील पाण्याची पातळी लक्षात घेता चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया जिल्ह्यात धडक विहीर कार्यक्रम तयार करून त्याची तात्काळ अंमलबजावणी करण्याचे आदेशही यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले.

Web Title: Complete the work of agriculture pump power connection with priority

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.