विकास कामे तातडीने पूर्ण करा

By Admin | Updated: May 7, 2017 02:27 IST2017-05-07T02:27:52+5:302017-05-07T02:27:52+5:30

उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याच्या टंचाईवर मात करण्यासाठी संभाव्य पाणीटंचाई उद्भवणाऱ्या गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी

Complete the development works promptly | विकास कामे तातडीने पूर्ण करा

विकास कामे तातडीने पूर्ण करा

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे : पाणीटंचाई निवारणार्थ योजनांचा आढावा
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याच्या टंचाईवर मात करण्यासाठी संभाव्य पाणीटंचाई उद्भवणाऱ्या गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्यासाठी कृती आराखडा ३० जूनपर्यंत पूर्ण करा. तसेच विविध विकास कामे तातडीने पूर्ण करा, अशा सूचना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
रविभवन येथे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली पाणीटंचाई, घरकूल योजना, जलसंपदा विभागातील मंजूर कामे तसेच दिव्यांग व्यक्तींच्या उपाययोजनांसंदर्भात लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आढावा घेण्यात आला. त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना पालकमंत्री बावनकुळे बोलत होते. यावेळी आमदार सुनील केदार तसेच जि. प.अध्यक्षा निशा सावरकर उपस्थित होते.
पिण्याच्या पाण्याचा टंचाईचा सामना करण्यासाठी कृती आराखडा तयार करण्यात आला असून, जूनअखेरपर्यंत उपाययोजना राबवून कामे तातडीने पूर्ण करण्यात यावी. पिण्याच्या पाण्याची टंचाई असलेल्या गावांमध्ये तात्काळ कामांना सुरुवात करण्याचे निर्देश देताना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, तहसीलदार तसेच गटविकास अधिकारी यांनी पाणीटंचाई निवारणासाठी उपाययोजनांचा व कामांचा वेळोवेळी आढावा घ्यावा व ३० जूनपर्यंत कामठी विधानसभेतील पाणीटंचाईसंबंधित कामे तातडीने पूर्ण करावीत.
जलसंपदा विभागांतर्गत चौराई धरण, कोच्छी बॅरेज प्रकल्प, पेंढरी पाटबंधारे प्रकल्प, कोराडी कॅनॉलवरील बॉक्स कॉन्ट्रॅक्टच्या कामांचा आढावा घेताना पालकमंत्री यांनी चौराई धरण महत्त्वाचा प्रकल्प असून त्यासंबंधित कामे त्वरित मार्गी लावण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. चौराई धरण प्रकल्पासंबंधित दिरंगाईमुळे शेतकऱ्यांना त्रास होत असून जलसंपदा विभागाने ही कामे तातडीने पूर्ण करावीत. तसेच संबंधित कामकाजाचे चित्रण करून संपूर्ण माहिती शासनाला सादर करण्याचे आदेश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अधिकाऱ्यांना दिले.
कोच्छी बॅरेज प्रकल्पाला १२९ कोटी रुपयांचा निधी मिळाला असून त्या माध्यमातून कामे त्वरित करण्यात यावीत. तसेच येथील नागरिकांचे पुनर्वसन व नागरी सुविधा या महत्त्वाच्या समस्या सोडविण्यात याव्यात. शेतकऱ्यांना जमिनीच्या पैशांचे वाटप करण्यात यावे. येथील नागरिकांना व शेतकऱ्यांना अ‍ॅडव्हान्स पझेशन, नागरी सुविधा व प्लॉट वाटप ही महत्त्वाची कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अधिकाऱ्यांना दिले.
प्रत्येकाला हक्काचे घर मिळावे याकरिता पंतप्रधान आवास योजना राबविण्यात येत आहे. या योजनेमधून ज्यांना घर नाही अशा व्यक्तींना पंतप्रधान घरकुल योजनेतून घर मिळत आहे.
ज्यांच्याकडे जागा नाही त्यांना जागा घेण्यासाठी ५० हजार रुपये या योजनेमार्फत देण्यात येत असून या योजनेचा लाभ सर्व नागरिकांपर्यंत पोहचावयास पाहिजे. तसेच एकही व्यक्ती घरकुल योजनेपासून वंचित राहता कामा नये. याकरिता कामठी विधानसभा क्षेत्रातील पंतप्रधान आवास योजनेतील घरकुल योजनेचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्र्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिले. जिल्ह्याकरिता १० हजार घरकुल वाढीव स्वरुपात देण्यात येतील, असे कामठी विधानसभा क्षेत्रातील पंतप्रधान आवास योजनेतील घरकुल योजनेचा आढावा घेताना त्यांनी सांगितले.

दिव्यांगांना रोजगार उपलब्ध करून द्या
समाजकल्याण विभागाद्वारे नागपूर जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांना रोजगार देण्यासाठी तसेच साहित्य वाटपासाठी येत्या तीन महिन्यात दिव्यांगांना रोजगार व साहित्य उपलब्ध करून देण्याचे आदेश पालकमंत्री यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. समाजकल्याण विभागाच्या विविध योजनांचा आढावा घेताना पालकमंत्री बावनकुळे यांनी दिव्यांगांचा रोजगार मेळावा आयोजित करण्याचे आदेश दिले तसेच डी.पी.सी. नाविण्यपूर्ण योजनेअंतर्गत साहित्य वाटप करण्यात यावे व ही सर्व कामे तीन महिन्याच्या आत करावी, तसेच दलित वस्त्यांचा प्रस्ताव लवकरात लवकर सादर करून ३० मे च्या आत कामे पूर्ण करण्यात यावी, असे निर्देश पालकमंत्री बावनकुळे यांनी अधिकाऱ्यांना दिले.
 

 

Web Title: Complete the development works promptly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.