नरेश डोंगरे - नागपूरलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भारतीय रेल्वे प्रशासनाकडून रेल्वेला चकाचक ठेवण्यासंबंधाने रोज मोठमोठे दावे केले जातात. मात्र, वस्तुस्थिती वेगळीच आहे. रेल्वेचे कोच आणि प्रसाधने अस्वच्छ आणि घाणेरडे असतात आणि रेल्वे प्रवाशांकडून स्वच्छतेबाबत रोज त्या संबंधाने रेल्वे पोर्टलवर तक्रारीचा पाऊस पडतो. प्रवाशांच्या हाकेला ओ देणाऱ्या 'रेल मदत' या रेल्वे पोर्टलवरूनच ही अधिकृत माहिती उघड झाली आहे.
प्रवासी सेवा-सुविधा सुधारण्यासाठी आणि प्रवाशांच्या अडीअडचणी, तक्रारी ऐकून घेण्यासाठी रेल्वेने 'रेल मदत पोर्टल' सुरू केले आहे. या पोर्टलवर येणाऱ्या तक्रारीचे रेल्वे प्रशासनाकडून निराकरण केले जाते. मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात गेल्या वर्षभरात रेल मदत पोर्टलवर ३८,२०६ तक्रारी आल्या. त्यातील सर्वाधिक १,१९० तक्रारी रेल्वेच्या कोचमधील स्वच्छतेसंबंधातील आहे. यावरून रेल्वे गाड्यांमधील स्वच्छतेचे चित्र कसे असेल त्याची कल्पना येते.रेल्वे प्रशासनाच्या दाव्यानुसार, पोर्टलवर तक्रार आल्यानंतर जास्तीत जास्त १८ मिनिटांत संबंधित प्रवाशाला प्रतिसाद मिळतो आणि २२ मिनिटात त्या तक्रारीचे निराकरण करून संबंधित प्रवाशाचे समाधान करण्याचा आमचा प्रयत्न असतो, असा दावाही रेल्वे प्रशासनाने केला आहे. प्रवाशांनी या सेवेला उत्कृष्ट रेटिंग दिले असून, त्यातून सकारात्मक प्रतिसाद अधोरेिखत होतो, असेही रेल्वे प्रशासनाने म्हटले आहे.
तुलनेत स्थानकावरची स्वच्छता चांगलीरेल्वे स्थानकांवर आणि गाड्यांमध्ये चांगली स्वच्छता ठेवून 'उच्च स्वच्छता मानके राखण्याचा मुख्य उद्देश रेल मदत पोर्टलचा आहे. उपलब्ध माहितीनुसार, पोर्टलवर आलेल्या ३८,२०६ तक्रारींपैकी विविध रेल्वे स्थानकावरच्या स्वच्छतेबाबत केवळ ८३ तक्रारी आल्या आहेत. अर्थात कोच पेक्षा किती तरी जास्त पट रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची गर्दी असते. मात्र, कोचच्या तुलनेत रेल्वे स्थानकावरची साफसफाई, स्वच्छता चांगली असते, हे यातून स्पष्ट होते.
हेल्पलाईनवरही करा तक्रारप्रवाशांच्या तक्रारी जलद गतीने सोडवल्या जाव्यात यासाठी भारतीय रेल्वे 'रेल मदत पोर्टल' अधिक प्रभावी करण्यासाठी प्रयत्नशील आहे. दुसरे म्हणजे, प्रवासी त्यांच्या तक्रारी, सूचना रेल मदत अॅप सोबतच, १३९ क्रमांकाच्या हेल्पलाईनवर आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारेदेखिल नोंदवू शकतात. प्रवासी सुरक्षा, स्वच्छता, केटरिंग आणि सेवा सुधारणेला प्राधान्य देऊन रेल्वे प्रवाशांना अधिकाधिक चांगली सेवा देण्यास प्रशासन प्रयत्नशिल असल्याचा दावाही रेल्वेने केला आहे.