खासगी शाळांच्या तुलनेत सरकारी शाळांमधील दप्तर भारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 11:10 IST2018-12-01T11:09:49+5:302018-12-01T11:10:19+5:30
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी मार्गदर्शक नियमावली तयार केली आहे. त्यासाठी राज्यातील ५० शाळांतील विद्यार्थ्यांच्या दप्तराच्या तपासणीचे निर्देश देण्यात आले होते.

खासगी शाळांच्या तुलनेत सरकारी शाळांमधील दप्तर भारी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी मार्गदर्शक नियमावली तयार केली आहे. त्यासाठी राज्यातील ५० शाळांतील विद्यार्थ्यांच्या दप्तराच्या तपासणीचे निर्देश देण्यात आले होते. यात नागपुरातील दोन शाळांचा समावेश होता. शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी या दोन शाळांच्या केलेल्या तपासणीत सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे हे नियमाला धरून नव्हते, तर खासगी शाळेतील विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे नियमात असल्याचे आढळून आले.
शिक्षण विभागातील अधीक्षक गौतम गेडाम व शिक्षण विस्तार अधिकारी आर. जी. हरडे यांच्या पथकाने शहरातील दोन शाळांची निवड केली. यात खासगी शाळांमध्ये उमरेड मार्गावरील संजूबा हायस्कूल व अजनीतील केंद्रीय विद्यालय या शाळांचा समावेश होता. हरडे यांनी सांगितले की, संजूबा शाळेतील इयत्ता १ ते १० च्या वर्गनिहाय भेटी देऊन विद्यार्थ्यांच्या दप्तराची तपासणी केली असता ते नियमात असल्याचे आढळून आले. याचे कारण म्हणजे शाळेने डेस्क बेंचमध्येच पाठ्यपुस्तके ठवण्यासाठी सोय केली आहे. तर केंद्रीय विद्यालयातील इयत्ता १ ते ८ या वर्गातील विद्यार्थ्यांच्या दप्तरांची तपासणी केली असता ते नियमाला धरून नसल्याचे आढळून आले.
त्यात अंमलबजावणीची गरज आहे. या दोन्ही शाळांचा तपासणी अहवाल तयार करून तो शासनाकडे सादर केला असून, शासनस्तरावर शाळांना याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार असल्याचे हरडेंनी सांगितले.
वर्गनिहाय दप्तराचे वजन
इयत्ता वजन (किलोग्रॅम)
१ ते २ री - १.५
३ ते ५ वी - २ ते ३
६ ते ७ वी - ४
८ ते ९ वी - ४.५
१० वी - ५