खूर्चीसाठी मंत्र्यांसमोर रंगला राजकीय कलगीतुरा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2021 09:49 PM2021-06-14T21:49:09+5:302021-06-14T23:57:06+5:30

Colorful political squabble in front of ministers for chair! जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश भोयर यांनी सावरकर यांना बसण्यास सांगितले असता या दोघात शाब्दिक चकमक उडाली. जिल्ह्यातील प्रमुख अधिकारी व पदाधिकाऱ्यांच्या समोर झालेल्या या वादाचा व्हायरल झालेला व्हिडिओ जिल्ह्यात सोमवारी चर्चेचा विषय ठरला.

Colorful political squabble in front of ministers for chair! | खूर्चीसाठी मंत्र्यांसमोर रंगला राजकीय कलगीतुरा!

खूर्चीसाठी मंत्र्यांसमोर रंगला राजकीय कलगीतुरा!

googlenewsNext
ठळक मुद्देआ. सावरकर आणि भोयर यांच्यात शाब्दिक चकमक

लोकमत न्यूज नेटवर्क

कामठी : कामठी येथील कोविड परिस्थिती आणि विकासकामांचा आढावा घेण्यासाठी पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांच्या अध्यक्षतेतील बैठक वादळी ठरली. बैठकस्थळी शिष्टाचारानुसार (प्रोटोकॉल) बसण्याची (खुर्ची) व्यवस्था नसल्याचे सांगत भाजपचे आ. टेकचंद सावरकर यांनी आक्षेप घेतला. यासोबतच येथे बोलण्याची संधी नाकारण्यात आल्याचे सांगत सावरकर आक्रमक झाले. सावरकर यांनी ही बैठक काँग्रेसचा मेळावा असल्याचे सांगत बहिष्काराची भूमिका मांडली. तिथे उपस्थितीत जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश भोयर यांनी सावरकर यांना बसण्यास सांगितले असता या दोघात शाब्दिक चकमक उडाली. जिल्ह्यातील प्रमुख अधिकारी व पदाधिकाऱ्यांच्या समोर झालेल्या या वादाचा व्हायरल झालेला व्हिडिओ जिल्ह्यात सोमवारी चर्चेचा विषय ठरला.

कामठी मतदारसंघात काँग्रेस आणि भाजप नेत्यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्याचा प्रकार नवा नाही. भोयर काँग्रेसकडून विधानसभेचे उमेदवार झाल्यानंतर विविध विषयांवर येथे काँग्रेस आणि भाजप पदाधिकाऱ्यांत खटके उडाले आहेत. गतवर्षी मौदा येथील बैठकीत सावरकर आणि मंत्री केदार यांच्यात याच मुद्द्यावर वादही झाला होता, हे विशेष.
कामठी तालुक्याच्या सर्व शासकीय विभागांतील कामांचा आढावा घेण्यासाठी मंत्री केदार यांच्या अध्यक्षतेत राज रॉयल लॉन येथे सकाळी १० वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला आ. सावरकर यांनाही निमंत्रित करण्यात आले होते. ते या बैठकीला काहीवेळ उशिरा पोहोचले. तिथे उपस्थित तहसीलदार हिंगे यांच्याकडून त्यांनी स्वागतही नाकारले. सदर बैठक शासकीय विभागाची आहे की काँग्रेसचा मेळावा, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. यासोबतच येथे कोणत्याही शासकीय व संवैधानिक पदावर नसलेल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना व्यासपीठावर बसविण्यात आले. सोबतच लोकप्रतिनिधींच्या बसण्याची व्यवस्था प्रोटोकॉलनुसार नसल्याची भूमिका मांडली. ते बैठकस्थळी शेवटी बसले. काही वेळानंतर त्यांनी मंत्री केदार यांना आपल्यालाही बोलायचे आहे असे सांगितले. यावरही केदार आणि त्यांच्यात मोठ्या आवाजात चर्चा झाली. यावर उपस्थित काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून आवाज चढविण्यात आल्यावर काॅंग्रेसचा निषेध नोंदवीत सावरकर येथून बाहेर पडले. दरम्यान, मंत्री केदार यांनी झालेल्या प्रकारावर नाराजी व्यक्त करीत लोकप्रतिनिधींनी जनतेच्या प्रश्नांना प्राथमिकता देण्याची भूमिका याप्रसंगी मांडली.

 कामठी येथील विकास आढावा बैठक शासकीय होती? की काँग्रेसचा मेळावा? शासकीय बैठक होती? तर काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांची बसण्याची व्यवस्था स्टेजवर का होती? ज्या बैठकीत आमदारांना बोलण्याची संधी नाही आणि शासकीय प्रोटोकॉल पाळले जात नसेल तर अशा बैठकांचा निषेध केलेला बरा.

टेकचंद सावरकर, आमदार, कामठी


कामठी मतदारसंघातील विकासकामांच्या मुद्द्यावर आ. सावरकर नेहमीच आडकाठी घालतात. गतवर्षी मौदा येथील बैठकीतही त्यांनी असाच प्रकार केला होता. आजही ते बैठकीला उशिरा आले. बैठकीत मंत्र्यांचा अपमान होत असेल तर आम्ही गप्प बसायचे का?

सुरेश भोयर, माजी जि. प. अध्यक्ष, नागपूर

Web Title: Colorful political squabble in front of ministers for chair!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.