सीईटीच्या बंपर रिझल्टनंतरही कॉलेजेस चिंतित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 04:07 IST2020-12-02T04:07:06+5:302020-12-02T04:07:06+5:30
आशिष दुबे/लाेकमत न्यूज नेटवर्क नागपूर : यंदा विद्यार्थ्यांना एमएचटी-सीईटीमध्ये बंपर गुणांक मिळाले असले तरीदेखील विभागातील अभियांत्रिकी व फार्मसी कॉलेजची ...

सीईटीच्या बंपर रिझल्टनंतरही कॉलेजेस चिंतित
आशिष दुबे/लाेकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : यंदा विद्यार्थ्यांना एमएचटी-सीईटीमध्ये बंपर गुणांक मिळाले असले तरीदेखील विभागातील अभियांत्रिकी व फार्मसी कॉलेजची चिंता वाढली आहे. महाविद्यालयांना जागा रिकाम्या राहण्याची भीती वाटत आहे. ही भीती कोरोना संक्रमणामुळे नव्हे तर सीईटीचे आयोजन आणि निकाल जाहीर करण्यात उशीर झाल्याची आहे. सीईटीला उशीर झाल्याने परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी झाली. सीईटीसाठी आवेदन देणाऱ्या एकूण विद्यार्थ्यांपैकी ३५ टक्के विद्यार्थी अनुपस्थित राहिले. यापूर्वी काही विद्यार्थ्यांनी जेईई-मेन व नीटचे निकाल जाहीर झाल्यानंतर अभियांत्रिकी व वैद्यकीय अभ्यासक्रमात प्रवेश घेतला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विश्वविद्यालयाने पदवीस्तरावरील अभ्यासक्रमात प्रवेश घेण्यासाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविली होती. सीईटीमध्ये होत असलेल्या विलंबामुळे विद्यार्थ्यांनी अभियांत्रिकी किंवा फार्मसीऐवजी फॉरेन्सिक सायन्स व बीएस्सी अभ्यासक्रमात प्रवेश घेतला. बोर्डाच्या परीक्षेत उत्तम गुण मिळाल्याने विद्यार्थ्यांनाही त्यांच्या आवडीच्या महाविद्यालयात प्रवेश मिळाला. त्यामुळे अभियांत्रिकी व फार्मसी अभ्यासक्रम संचालित करणाऱ्या महाविद्यालयांना यंदा विद्यार्थी परत येतील, अशी अपेक्षा राहिली नाही.
त्यातच यंदा सीईटीमध्ये चांगले गुण मिळाल्याने कोरोना संक्रमणाच्या काळातही पुणे व मुंबईकडे अनेक विद्यार्थी जातील. सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, ऑगस्ट महिन्यापासूनच अनेक अभियांत्रिकी व फार्मसी महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांशी फोनद्वारे संपर्क साधला जात होता. सीईटीचे निकाल जाहीर होण्यापूर्वीच महाविद्यालयात प्रवेश घेण्यास सांगितले जात होते, परंतु यातही महाविद्यालयांच्या पदरी निराशाच पडली. विद्यार्थ्यांनी येथील महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यास नकार दिला. महाविद्यालयांकडून मिळालेल्या ऑफरला विसरून काही विद्यार्थी प्रवेश घेण्यास तयार झाले आहेत. काही विद्यार्थी असेही आहेत, ज्यांना शहरातील प्रसिद्ध विज्ञान महाविद्यालयांमध्ये अतिशय कमी शुल्कात प्रवेश मिळाला आहे. त्यामुळेच अनेक विद्यार्थी अभियांत्रिकीपेक्षा बीएस्सीकडे वळले आहेत.
-------------
बॉक्स...
१७ हजार जागा
नागपूर विभागात अभियांत्रिकी महाविद्यालयात १७ हजार जागा आहेत. या जागांसाठी २३ हजार विद्यार्थ्यांनी सीईटी दिली होती. यातील बहुतांश विद्यार्थ्यांना ६० पेक्षा अधिक पर्सेंटाईल मिळाले असल्याने, हे विद्यार्थी नागपूरऐवजी पुणे व मुंबईमध्ये जाण्यास इच्छुक आहेत. त्या कॉलेजेसमध्ये कोरोना संक्रमणामुळे ऑनलाईन शिक्षण सुरू असल्याने विद्यार्थ्यांना सुविधा झाल्याचे विद्यार्थी सांगत आहेत. त्यामुळेच येथे प्रवेश घेण्यापेक्षा शासकीय अभियांत्रिकीनंतर पुणे व मुंबईच्या टॉप महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्याचा विचार पक्का झाला आहे.
............