कारची धडक, कॉलेजला जाणारी विद्यार्थिनी गंभीर जखमी
By दयानंद पाईकराव | Updated: April 14, 2024 15:05 IST2024-04-14T15:04:59+5:302024-04-14T15:05:36+5:30
जखमी तृप्तीला धडक दिलेल्या कारचालकाने मेयो रुग्णालयात दाखल करून तिच्या कुटुंबीयांना घटनेची माहिती दिली.

कारची धडक, कॉलेजला जाणारी विद्यार्थिनी गंभीर जखमी
दयानंद पाईकराव, नागपूर : कॉलेजला जाण्यासाठी रस्ता ओलांडत असताना भरधाव कारने धडक दिल्यामुळे एक विद्यार्थिनी गंभीर जखमी झाली. ही घटना कोराडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी १३ एप्रिलला सकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली.
तृप्ती मारोतराव ढोले (१९, रा. हनुमान गल्ली गौरीपूरा, ता. कारंजा, जि. वर्धा) ही विद्यार्थिनी महादुला कोराडी येथील वसतीगृहात राहते. ती कॉंग्रेसनगर येथील शिवाजी विज्ञान महाविद्यालयात बीएस्सी फायनल इयरला शिकते तसेच पोलिस भरतीची तयारी करीत आहे. शनिवारी ती कॉलेजला जाण्यासाठी निघाली. कोराडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत भारत सेलिब्रेशन हॉलसमोर भारत माता चौक सावनेर हायवे येथून रस्ता ओलांडत असताना कार क्रमांक एम. एच. ४०, पी. क्यू-४०७९ च्या चालकाने आपल्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवून तृप्तीला धडक देऊन तिला गंभीर जखमी केले.
जखमी तृप्तीला धडक दिलेल्या कारचालकाने मेयो रुग्णालयात दाखल करून तिच्या कुटुंबीयांना घटनेची माहिती दिली. कोराडी ठाण्याचे उपनिरीक्षक संतोष ओवाळकर यांनी कार चालकाविरुद्ध कलम २७९, ३३७, ३३८ नुसार गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे.